राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक, निष्ठावान कार्यकर्ते, धाडसी राष्ट्रभक्त, सहृदय मित्र आणि कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून कै. भीमसेन सदानंद राणे यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण समाजकार्य आणि राष्ट्रकार्यासाठी समर्पित केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील लोरे हे भीमसेन राणे यांचे मूळ गाव. राणे कुटुंबात राष्ट्रनिष्ठा आणि हिंदुत्वाचे संस्कार घरातूनच मिळाले. त्यांचे वडील हिंदू महासभेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळे बालपणापासूनच हिंदू समाज, राष्ट्र आणि संस्कृती यांच्याबद्दल अभिमानाची भावना त्यांच्या मनात रुजली. त्यांची आईही अत्यंत कर्तृत्ववान, धार्मिक वृत्तीची आणि दानशूर होती. रामायण व महाभारत यांसारखे ग्रंथ त्यांच्या आईला अक्षरशः तोंडपाठ होते. तिच्या सहवासातून धर्म, संस्कृती, परोपकार आणि कर्तव्यनिष्ठा यांचे संस्कार भीमसेन यांच्यावर झाले. तथापि बालपणात ते अत्यंत खोडकर आणि धाडसी होते. गावातल्या मुलांमध्ये त्यांची मस्ती, साहसी वृत्ती आणि नेतृत्वगुण लहानपणापासूनच उठून दिसत. अन्याय सहन न करणे आणि प्रसंगी भिडण्याची तयारी ठेवणे हा त्यांचा स्वभाव पुढेही कायम राहिला.
गावातील शाळा सातवीपर्यंतच असल्याने सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांनी त्यांना शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांच्या आयुष्यात निर्णायक वळण आणणारे रघुवीर काका मदतीला धावून आले. त्यांनी पुढील शिक्षणासाठी भीमसेन यांना मुंबईला पाठवले. मुंबईतील जीवन संघर्षमय होते. दिवसा हॉटेलमध्ये काम आणि रात्री शाळेत शिक्षण असा त्यांचा दिनक्रम होता. कठीण परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. याच काळात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला आणि पुढे तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला.
उच्च शिक्षण पूर्ण करताना त्यांनी कीर्ती महाविद्यालयातून डी.एड. आणि बी.एड.चे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ बोरीवली येथील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून कार्य केले. त्यांच्या अध्यापनाची व्याप्ती मोठी होती. संस्कृत, इंग्रजी, विज्ञान अशा विविध विषयांचे अध्यापन ते करत. विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय शिक्षक होते. मात्र त्यांचे मन केवळ नोकरीत रमणारे नव्हते. राष्ट्रकार्यासाठी पूर्णवेळ आयुष्य अर्पण करण्याची प्रेरणा त्यांना संघातून मिळाली आणि त्यांनी प्रचारक होण्याचा निर्णय घेतला. सन १९७३ मध्ये त्यांनी पूर्णवेळ प्रचारक जीवन स्वीकारले. पुढील चार वर्षे त्यांनी गिरगाव, शिरूर, पंढरपूर आणि रत्नागिरी या भागांत संघकार्य केले. या काळात त्यांनी असंख्य स्वयंसेवक घडवले, शाखा वाढवल्या आणि संघविचार समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचवला. प्रचारक जीवनातील एक विशेष आठवण ते अत्यंत भावुकतेने सांगत असत. पूजनीय श्रीगुरुजी आजारी असताना एक संपूर्ण दिवस त्यांच्या सेवेत राहण्याची संधी त्यांना लाभली होती. त्या दिवसाला ते आपल्या जीवनातील अमूल्य ठेवा मानत.
१९७५ मध्ये देशावर आणीबाणीचे संकट आले. संघावर बंदी घालण्यात आली आणि हजारो स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. अशा कठीण काळात भीमसेन राणे यांनी अत्यंत धाडसाने संघकार्य सुरू ठेवले. संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली, संपर्क व्यवस्था आणि गुप्त नियोजन यामध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. पोलिसांच्या नजरेतून बचाव करण्यासाठी त्यांनी केवळ वेशच बदलला नाही, तर स्वतःचे नावही बदलले. ‘भीमसेन सदानंद राणे’ यांचे रूपांतर ‘बाळकृष्ण वासुदेव यादव’मध्ये झाले. भूमिगत राहून त्यांनी सोपवलेली कामे अत्यंत निष्ठेने पार पाडली. मात्र एका टप्प्यावर गुप्त माहिती फुटली आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना अटक करून ठाणे मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. राष्ट्रविचारासाठी कारावास भोगण्याची वेळ आली, तरी त्यांनी कधीही आपल्या भूमिकेपासून माघार घेतली नाही.
प्रचारक जीवनानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. विवाह करून संसाराची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली. नोकरीच्या चौकटीत न अडकता त्यांनी टेम्पो वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. कष्ट, प्रामाणिकपणा आणि धडाडी यांच्या बळावर त्यांनी व्यवसाय उभा केला. परंतु विविध कारणांमुळे प्रचंड मेहनतीने उभा केलेला उद्योग दीर्घकाळ टिकू शकला नाही. तरीही अपयशाने खचून जाणे त्यांच्या स्वभावात नव्हते. संकटांशी लढत पुढे जाणे हा त्यांचा जीवनमंत्र होता. व्यवसायातील चढउतारांदरम्यानही त्यांचे समाजकार्य कधी थांबले नाही. वंदे मातरम् संस्थेत त्यांनी अनेक वर्षे कार्य केले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विशेष काम केले. विविध वर्ग, संस्कारवर्ग, शिबिरे, स्पर्धा यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि संस्कारांची जपणूक केली. ‘कन्यारत्न’ योजनेत त्यांनी घरोघरी जाऊन सेवा दिली. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी मनापासून काम केले. कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्णत्वास नेल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.
भीमसेन राणे यांची हिंदुत्वनिष्ठा केवळ विचारांपुरती मर्यादित नव्हती; ती त्यांच्या जीवनशैलीत दिसत असे. त्यांच्या टेम्पोवर मोठ्या अक्षरांत “गर्व से कहो, हम हिन्दू हैं” आणि “भारत माता की जय” अशी घोषवाक्ये लिहिलेली असत. एकदा त्यांचा टेम्पो मुंबईतील भेंडीबाजार परिसरात गेला असता काही धर्मांध मुस्लीम गुंडांनी टेम्पोवर हल्ला केल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्याने ते घाबरले नाहीत. गाडीत असलेल्या मोठ्या स्क्रू-ड्रायव्हरच्या सहाय्याने त्यांनी प्रतिकार केला आणि प्रसंगावधान राखत वाहन सुरक्षित बाहेर काढले. “मार के मरूंगा” अशी आरोळी देत संकटाचा सामना करण्याची त्यांची वृत्ती त्या प्रसंगातून दिसून येते. अन्याय आणि दादागिरीसमोर न झुकणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
बाहेरून परखड आणि कठोर वाटणाऱ्या भीमसेन राणे यांच्या मनात अपार प्रेम आणि माया होती. मित्रांसाठी धावून जाणे, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर राहणे आणि कुटुंबीयांवर जीवापाड प्रेम करणे हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि अडचणीच्या काळात आधार दिला. आयुष्याच्या शेवटच्या काळात तीन-चार वर्षे प्रकृतीच्या असंख्य व्याधींशी झुंज देत अंथरुणाला खिळलेल्या या झुंजार व्यक्तिमत्त्वाने अखेर ७ एप्रिल २०२५ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, मुलगा सुदर्शन, कन्या प्रज्ञा व प्राजक्ता तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
कै. भीमसेन सदानंद राणे यांचे जीवन हे संघर्ष, समर्पण, राष्ट्रनिष्ठा आणि सेवाभाव यांचे सुंदर मिश्रण होते. एका छोट्या गावातून मुंबईसारख्या महानगरात येऊन शिक्षण पूर्ण करणे, शिक्षक म्हणून कार्य करणे, प्रचारक म्हणून जीवन अर्पण करणे, आणीबाणीच्या काळात कारावास भोगणे, समाजकार्यात सक्रिय राहणे आणि अखेरपर्यंत राष्ट्रविचाराशी एकनिष्ठ राहणे हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.