काँग्रेसला धक्का, राज्यसभा उमेदवाराचा अर्जच बाद! एकमेव जागा भाजपच्या पारड्यात!

    09-Jun-2026
Total Views |

Minakshi
 
 
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मध्य-प्रदेश राज्यसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या एकमेव उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज पडताळणीत बाद करण्यात आला आहे. आपल्या निवडणूक अर्जात हैदराबाद न्यायालयातील एका प्रलंबित खटल्याचा उल्लेख टाळल्याने ही कारवाई झाली आहे. परिणामी भोपाळची एकमेव असलेल्या या राज्यसभेची जागाच काँग्रेसच्या हातून निसटल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे. या जागेवर आता भाजपचे महेश केवट निवडून येणार आहेत.
 
नेमकं प्रकरण काय?
 
दि. ११ मे २०२५ रोजी तक्रारदार ए.श्रीलता यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यात २० ऑगस्टला तक्रार दाखल करण्यात आली. ए.श्रीलता यांनी मीनाक्षी यांच्यासह अन्य तिघांविरोधात तक्रार क्र.२०२५ दाखल केली होती. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३५६, ६१, ४५, ४६, ३५१ (२) आणि ७९ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले. १७ सप्टेंबरला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांना समन्स बजावण्यात आले होते. २४ ऑक्टोबरला नटराजन यांनी त्याला उत्तर दिले होते. त्यांनी वकिलांच्या माध्यमातून ही राजकीय सुडबुद्धीने तक्रार असल्याचा आरोप केला. १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने खटला कायम ठेवत उलट सुनावणी प्रक्रीया सुरू केली.
 
निवडणूक प्रक्रियेतूनच बाद
 
मिनाक्षी यांना ही माहिती देऊन आपल्या अर्जापुढे येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता आल्याही असत्या. मात्र, त्यांनी माहिती लपवली. नियमानुसार, फौजदारी खटल्याची माहिती निवडणूक अर्जात देणे गरजेचे आहे. हा खटला २०२५मध्ये सुरू असला तरही त्यात मिनाक्षी यांनी आरोपी म्हणून आपले म्हणणे मांडले आहे. त्यामुळे ही चूक अजाणतेपणी झाली, असेही म्हणता येऊ शकत नाही, असा स्पष्ट निष्कर्ष यातून निघतो. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. नामांकन रद्द झाल्यानंतर मिनाक्षी यांनी लोकशाही पायदळी तुडवल्याचा आरोप केला आहे.