मणिपूरमध्ये सुरक्षा दलांची धडक कारवाई;शस्त्रसाठा, हेरॉईन जप्त; अनेक उग्रवादी अटकेत

    09-Jun-2026   
Total Views |
Manipur Security Forces
 
मुंबई : (Manipur Security Forces) मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी विविध कारवायांमध्ये मोठे यश मिळवले आहे. सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला असून अमली पदार्थांचा साठाही हस्तगत केला आहे. तसेच विविध उग्रवादी संघटनांशी संबंधित सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लामसांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामेंग मामांग लैकाई आणि आसपासच्या परिसरात राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान सुरक्षा दलांनी एक एके रायफल, एक इन्सास रायफल, सहा बोल्ट-अॅक्शन सिंगल बॅरल बंदुका, नऊ पिस्तुले, एक इन्सास एलएमजी मॅगझीन, १३ एके रायफलच्या गोळ्या, चार इन्सास काडतुसे तसेच .३८० बोरच्या ३१० काडतुशांचा साठा जप्त केला.
 
अशी माहिती आहे की, याच दिवशी इम्फाळ आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबविण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कियामगेई ओइनाम लौकों येथील दोन प्रवाशांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ४.०९ किलो संशयित हेरॉईन जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सय्यद साबिर अली आणि खुथेइबाम साबिर अहमद अशी आहेत. दरम्यान, मणिपूर पोलिसांनी मणिपूर रिवोल्यूशनरी आर्मी या उग्रवादी संघटनेच्या दोन सक्रिय महिला सदस्यांना अटक केली. फिजाम सोनिया देवी ऊर्फ थोईबी ऊर्फ लुखोईबी आणि युरेम्बाम मेइतेइलैमा ऊर्फ मचान ऊर्फ अबेम्मा अशी त्यांची नावे असून त्या सध्या ताक्येल लेन क्रमांक-९ परिसरात वास्तव्यास होत्या.(Manipur Security Forces)
 
याशिवाय पोलिसांनी स्वतंत्र कारवाईत एमआरएचा सक्रिय सदस्य खांगेम्बाम अमितकुमार सिंह ऊर्फ लामजिंगबा याला इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामेई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंगा माखोंग क्रॉसिंग परिसरातून अटक केली. सुरक्षा दलांनी युनायटेड रिवोल्यूशनरी फ्रंट या संघटनेचा सक्रिय सदस्य अंगोम इमो मैतेई ऊर्फ फादर याला इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील लामलाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांगला सांगोमशांग क्रॉसिंग परिसरातून अटक केली. त्यानंतर सावोम्बुंग खुंजाओ पुलाजवळील इरिल नदीच्या काठावर राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत एक एसबीबीएल रायफल, १७ काडतुसे, पाच एमके-८० बॉम्ब, एक वायरलेस संच, दोन अश्रुधूराचे गोळे, एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि एक बुलेटप्रूफ हेल्मेट जप्त करण्यात आले.
 
दुसऱ्या एका कारवाईत सुरक्षा दलांनी कांगलेई यावोल कान्ना लुप (केवायकेएल) या उग्रवादी संघटनेचा सक्रिय सदस्य सनासम सॅमसन याला इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हुइद्रोम नातुम चिंग परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक ३६ एचई हँड ग्रेनेड, चार रिकामी काडतुसे, चार प्रक्षेप्य तसेच अन्य आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. राज्यातील उग्रवादी कारवायांवर आळा घालण्यासाठी, अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सुरक्षा दलांच्या मोहिमा सातत्याने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(Manipur Security Forces)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक