महायुती सरकार श्रद्धास्थानांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पिंपळेश्वर देवस्थानाचा कृतज्ञता सोहळा उत्साहात,

मुख्यमंत्री फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती; महादेव भक्तांच्या संघर्षाला यश, पिंपळेश्वर मंदिराची जागा अखेर देवस्थानाला समर्पित

    09-Jun-2026
Total Views |

devendra fadanvis
 
डोंबिवली: (Government of Maharashtra) महायुती सरकार हे सनातन धर्माचा पुरस्कार करणारे सरकार आहे. हे सरकार कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र सनातन धर्मावर संकट येईल तेव्हा ते पाठीशी खंबीरपणे उभे राहील. महायुती सरकार श्रद्धास्थानांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
 
डोंबिवली पूर्वेतील सागाव परिसरातील श्री तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर महादेव देवस्थानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कृतज्ञता सोहळा आणि जाहीर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे,किसन कथोरे, सुलभा गायकवाड , कुमार आयलानी, अंबरनाथ नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक उपस्थित होते. मंदिराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी राज्य सरकारने नाममात्र दरात जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थानाच्या वतीने हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सागाव परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी भाविक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पिंपळेश्वर महादेव देवस्थानाच्या या कृतज्ञता सोहळ्यामुळे डोंबिवलीत धार्मिक आणि सामाजिक वातावरणाला विशेष रंग चढल्याचे पाहायला मिळाले.(Government of Maharashtra)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जागेसाठी सुरू असलेल्या दीर्घ संघर्षाचा उल्लेख करत हा विजय महादेव भक्तांचा असल्याचे सांगितले. सध्या जागेचे वाढत असलेले भाव यामुळे मंदिराच्या जागेवर कब्जा करण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र स्थानिक नागरिक आणि महादेव भक्तांनी मोठा संघर्ष करून ही जागा वाचवली. या संघर्षात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खंबीरपणे उभे होते असे त्यांनी नमूद केले. “आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. हे कार्य महादेवानेच घडवून आणले आहे. महादेवाने आम्हाला हे पुण्यकर्म करण्याची संधी दिली,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या वतीने महादेवाचे आभार मानले. उद्योग, महसूल आणि एमआयडीसी विभागांच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय अडचणी दूर करण्यात आल्याचे सांगत मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्यानंतर ही जमीन पिंपळेश्वर महादेव देवस्थानाला समर्पित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
 
दरम्यान पिंपळेश्वर मंदिर, परिसरातील आमराई आणि संतपरंपरेचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे सांगत त्यांनी मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक वैभव पुन्हा उभे करण्याचा संकल्प व्यक्त केला. श्रद्धास्थानांवर संकट आल्यास महायुती सरकार ठामपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
 
रवींद्र चव्हाण म्हणाले, पिंपळेश्वर मंदिराचा संघर्ष सुरू झाला तेव्हा मी नव्याने आमदार झालो होतो. एका कार्यक्रमा दरम्यान मंत्री उदय सामंत यांना मी या मंदिराबाबत बोललो होतो. मंदिराचा निर्णय लागण्यास उशीर झाला पण त्यांनी शब्द पाळला. महायुतीच्या मंत्री मंडळाने हा निर्णय घेऊन आम्हा शिवभक्तावर उपकार केले आहेत. या जिल्ह्याने नेहमीच महायुतीवर प्रेम केले आहे. शासन दरबारी जे विषय प्रलंबित आहेत ते देखील लवकरच मार्गी लावू असे ही त्यांनी सांगितले.(Government of Maharashtra)
 
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पिंपळेश्वर मंदिराच्या जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न महायुती सरकारने मार्गी लावल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे त्यांनी विशेष आभार मानले. मंदिराच्या जागेसोबतच विहिरीच्या प्रश्नाचाही सकारात्मक तोडगा निघणार असल्याची माहिती देताना त्यांनी मंदिर, श्रद्धा आणि अस्मितेशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. खिडकाळी मंदिर, अंबरनाथचे हजार वर्षे जुने शिवमंदिर, मलंगगड आणि दुर्गाडी किल्ला परिसरातील धार्मिक स्थळांच्या विकासकामांचा उल्लेख करत कल्याण-डोंबिवली परिसरात धार्मिक पर्यटनाला चालना देणारा ‘टेंपल कॉरिडॉर’ विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा परिसर ऐतिहासिक स्वरूपात विकसित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देत त्यांनी भविष्यात या विकासकामांसाठी अधिक निधीची आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री मदत करतील, असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय कल्याण लोकसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचा दावा करत त्यांनी मेट्रो, विविध पायाभूत सुविधा आणि शहरी विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. मुंबई मेट्रोचे जाळे बदलापूरपर्यंत विस्तारावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
 
तसेच मेट्रो आणि रेल्वेच्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमुळे परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असल्याचे सांगत मुंबईच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीत पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याची अपेक्षाही व्यक्त केली. सावळाराम स्मारकासाठी मंजुरी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानताना धार्मिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रकल्पांना महायुती सरकारकडून सातत्याने पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.(Government of Maharashtra)