विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा
09-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Chandrakant Patil) "राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया , शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रिया संदर्भात अचूक माहिती योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी सेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे." अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवार दि.९ रोजी केली.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते. बैठकीत सर्व जिल्ह्यातील सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्राचा आढावा घेण्यात आला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह माहिती, अचूक मार्गदर्शन सहजपणे त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कामांसाठी वारंवार मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता भासू नये, त्यांना प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती, विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती तसेच आवश्यक मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, या हेतूने ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात येत असून मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे असतील. यापैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्रेही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत."(Chandrakant Patil)