नवी मुंबई : (Navi Mumbai Port News) एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत ट्रेलर चालकांच्या कमतरतेमुळे आयात कंटेनर वेळेत बंदरातून हलविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे कंटेनर फ्रेट स्टेशन आणि डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी आयातदारांकडे कंटेनरची मोठ्या प्रमाणात साठवणूक झाली आणि बंदर टर्मिनलमध्ये कंटेनरचा मुक्काम कालावधी वाढला. या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने आयातदारांना मोठा दिलासा देत ग्राउंड रेंटमध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली आहे.
जेएनपीएने जारी केलेल्या व्यापार सूचनेनुसार, १ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यानंतर जहाजातून उतरविण्यात आलेले आणि २० जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंदरातून बाहेर काढण्यात आलेले आयात-भरलेले कंटेनर या सवलतीसाठी पात्र ठरणार आहेत. पात्र कंटेनरवरील नवव्या दिवसापासून आकारण्यात आलेल्या ग्राउंड रेंटपैकी ५० टक्के रक्कम आयातदारांना परत करण्यात येणार आहे.(Navi Mumbai Port News)
मात्र, १२ जून २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर बंदरात उतरलेले कंटेनर या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच सर्व पात्र कंटेनर दि. २० जून २०२६ पर्यंत बंदरातून हलविणे आवश्यक असेल. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आयातदारांनी ग्राउंड रेंट भरल्याच्या पावत्या, कंटेनरची माहिती, डिलिव्हरी ऑर्डरची प्रत आणि बँक खात्याचा तपशील जेएनपीएच्या वित्त विभागाकडे सादर करावा लागणार आहे. पात्रता तपासल्यानंतर संबंधित आयातदारांच्या खात्यात परताव्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
व्यापार क्षेत्रातील अडचणी लक्षात घेऊन आणि आयातदारांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे जेएनपीएने स्पष्ट केले आहे. बंदरातील कंटेनर साठा कमी करण्यास आणि मालवाहतुकीची गती वाढविण्यास या निर्णयामुळे मदत होणार आहे.(Navi Mumbai Port News)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.