मराठी अस्मितेचा वैश्विक गौरव! इस्रायलमध्ये झळकणार छत्रपती शिवरायांचे स्मारक

    09-Jun-2026   
Total Views |
Statue of Shivaji Maharaj in Israel
 
मुंबई : (Statue of Shivaji Maharaj in Israel) भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक व सांस्कृतिक संबंध नेहमीच दृढ राहिले आहेत. मात्र आता या दोन्ही देशांच्या इतिहासाला जोडणारी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिमानास्पद बाब समोर आली आहे. लवकरच इस्रायलच्या भूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अदम्य शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत यानीव्ह रेवाच यांनी याची घोषणा केली.
 
इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय हा या ऐतिहासिक निष्ठेला आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर दिला जाणारा सन्मान मानला जात आहे. हा उपक्रम दर्शवितो की, शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि त्यांची विचारधारा केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती, तर मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या आणि तिच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला त्यात सन्मानाचे स्थान होते.
 
यानीव्ह रेवाच यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान वारशाला साजेसा हा स्मारक प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहकार्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ या प्रस्तावाला संमती दिली. यानिव रेवाच यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, “इस्रायलमध्ये उभारण्यात येणारा हा पुतळा भारत आणि इस्रायलमधील दृढ आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रभावी प्रतीक ठरेल. महाराष्ट्र आणि भारतीय ज्यू समुदाय यांच्यातील ऐतिहासिक नातेसंबंध लक्षात घेता या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त होईल.”
 
ते पुढे म्हणाले, “हा उपक्रम आपल्या दोन्ही देशांतील नागरिकांमधील मैत्री अधिक बळकट करेल. तसेच शौर्य, नेतृत्व आणि परस्पर आदर यांसारख्या सामायिक मूल्यांना ही एक चिरंतन आदरांजली ठरेल. ही मूल्ये महाराष्ट्र आणि इस्रायल या दोघांच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत.”
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रस्तावाचे स्वागत करत यानिव रेवाच यांचे आभार मानले. ते म्हणाले, “ही अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घटना आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आलेल्या या घोषणेसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. महाराष्ट्र शासन या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेरुसलेम दौऱ्यानंतर भारत-इस्रायल संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. या पुतळ्याच्या स्थापनेमुळे भारतीय आणि इस्रायली नागरिकांमधील सांस्कृतिक व भावनिक बंध अधिक मजबूत होतील, असेही त्यांनी नमूद केले. (Statue of Shivaji Maharaj in Israel)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक