होर्मुझ बंद झाली तरी 60 दिवस पुरेल इतका इंधनसाठा; पेट्रोलियम मंत्र्यांचा ऊर्जासुरक्षेबाबत विश्वास
09-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली : (Strait Of Hormuz) अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, तरीही पुढील महिना ते दोन महिन्यांपर्यंतचा राखीव इंधनसाठा भारताकडे असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी दिली. जागतिक अनिश्चितता कायम असतानाच, भारत हे संकट हातळण्यास सज्ज असल्याचेही केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितले.
अमेरिका-इराण युद्धामुळे इंधन आणीबाणी लागू झाली असून, त्याचे पडसाद जगावर उमटले आहेत. गेले चार महिने सुरु असलेला हा संघर्ष सातत्याने नव्याने चिघळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतासारख्या इंधनासाठी आयातीवर अवलंबून असलेल्या देशालाही याची झळ बसली आहे. भारताकडे सध्या असलेला अतिरिक्त इंधनसाठा हा एक ते दोन महिने पुरणारा आहे. त्यामुळे नजीकच्या काळात होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास, भारत त्या संकटाचाही सामना यशस्वीपणे करु शकतो, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला आहे. (Strait Of Hormuz)
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीर्घकाळ सुरु असलेल्या या संघर्षाचे दुष्परिणाम जगावर होणार असल्याची भीतीही पुरी यांनी व्यक्त केली, तर भारताकडे साठा असल्याचे सांगतानाच, भारताने इंधन पुरवठादारांमध्ये विविधता आणल्याचेही पुरी यांनी स्पष्ट केले. ऊर्जासुरक्षेच्या निकषांविषयी सांगताना पुरी यांनी 60 दिवसांचा निकषही स्पष्ट केला. कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजी यांचा प्रत्येकी साठ दिवसांचासाठी माझ्याकडे असल्याच मी त्याला ऊर्जासुरक्षा मानत असल्याचे पुरी यांनी स्पष्ट करतानाच, सध्या देशाकडे एवढा साठा उपलब्ध असल्याचेही अधोरेखित केले.
भारताने अलीकडे समोर आलेल्या दोन सर्वात मोठ्या ऊर्जासंकटांमधून यशस्वीपणे मार्ग काढल्याचेही पुरी यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच, भारतात इंधनदरवाढ देखील इतर देशांप्रमाणे न झाल्याकडेही पुरी यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारने देशाची ऊर्जासुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांवरही प्रकाश टाकला.
रशियाकडून तेलखरेदी सुरुच!
जागतिक अनिश्चिततेच्या काळात अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियाकडून तेलखरेदी सुरु ठेवली असून, एप्रिल महिन्यात रशियाचा वाटा 38 टक्क्यांवर पोहोचला होता. सध्याची रशियाकडची आयात प्रतिदिन सुमारे 2 ते 2.5 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये ही आयात प्रतिदिन 1.65 दशलक्ष बॅरल इतकी होती. (Strait Of Hormuz)