मुळातच कमजोर पायावर उभी असलेली ‘इंडी’ आघाडी तामिळनाडू आणि प. बंगाल विधानसभा निवडणुकांतील पराभवामुळे, आपल्या अस्तित्वासाठी चाचपडत आहे. दिल्लीत सोमवारी या आघाडीची बैठक होत असतानाच, तृणमूलचे लोकसभेतील निदान 12 खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंह यांच्या घरी जमले होते. तृणमूलमधील या फुटीमुळे आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नवी दिल्लीत ‘इंडी’ आघाडीची बैठक सुरू असतानाच, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील तब्बल 12 खासदार केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांच्या बंगल्यावर जमले होते. काही पत्रकारांच्या मते, तेथे सुमारे 20 खासदार होते. त्याची छायाचित्रेही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाली. ‘इंडी’ आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी मोदी सरकारविरोधात एक फळी उभी करण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांच्याच पक्षाचे लोकसभेतील खासदार भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्यावर उघडपणे जमतात, यावरूनच या आघाडीची दांडी गुल झाल्याचे स्पष्टपणे जाणवते.
लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल दोन वर्षांनी ‘इंडी’ आघाडीची बैठक दिल्लीत होत होती, तीसुद्धा ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून. कारण, पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. त्या पक्षाच्या आमदारांची संख्या 215 वरून 80 वर घसरली असून, त्यांच्यातही आता फूट पडली आहे. 80 पैकी निदान 60 आमदारांनी त्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यांनी ममतांना आपला नेता मानले नसून, आपल्या गटाच्या नेत्याला ‘विरोधी पक्षनेता’ म्हणून मान्यता द्यावी, यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिले आहे. राज्यात ही स्थिती असताना, आता लोकसभेतील 29 पैकी निदान 12-15 खासदार भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना भेटत आहेत, तेही ममता बॅनर्जी दिल्लीत असताना. यावरूनच तृणमूल काँग्रेसमध्ये किती सखोल फूट पडली आहे, ते स्पष्ट होते. लवकरच राज्यसभेतीलही खासदार आपला वेगळा मार्ग स्वीकारतील, हे उघड आहे. परिणामी, ममता बॅनर्जी यांना आता ‘इंडी’ आघाडी हाच एकमेव आधार राहिला आहे. त्यासाठीच त्यांनी या आघाडीची बैठक बोलाविली होती. पण, सद्यस्थितीत या आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.
‘इंडी’ आघाडीचे काँग्रेस वगळता दोनच प्रमुख आधार होते. ते म्हणजे तृणमूल काँग्रेस व द्रमुक हे पक्ष. कारण, या दोन्ही पक्षांना आपापल्या राज्यात भक्कम आधार होता. पण, या दोन्ही पक्षांची राज्यातील सत्ता आता गेली आहे. तामिळनाडूत तर निकालाच्या दिवशीच काँग्रेसने द्रमुकशी असलेली दीर्घकालीन युती मोडत, अभिनेते विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाशी हातमिळवणी केली. त्यामुळे द्रमुकने काँग्रेसशी असलेले सर्व संबंधच तोडले. लोकसभेतही त्यांच्या पक्षाचे खासदार आता काँग्रेसपासून दूरच्या जागांवर बसतील. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, द्रमुक हा पक्षही या आघाडीतून बाहेर पडला आहे.
आम आदमी पक्ष हा तर केव्हाच या आघाडीतून बाहेर पडला. त्याचा प्रमुख विरोधक हा काँग्रेस पक्षच असल्याने, त्याचे या आघाडीतील अस्तित्वच हे अर्थशून्य होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या जबरदस्त पराभवानंतर, आम आदमी पक्षाच्या अस्तित्वावरही तलवार टांगली गेली आहे. तशातच त्या पक्षाच्या राज्यसभेतील 10पैकी सात खासदारांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीतही, या पक्षाची सत्ता जाण्याचीच शक्यता अधिक दिसत आहे.
आता प. बंगालमधील पराभवाने ‘तृणमूल काँग्रेस’ हा आणखी एक महत्त्वाचा खांबही कोसळला आहे. एरव्ही, ममता बॅनर्जी यांनीही या आघाडीला कधीच फारसे महत्त्व दिले नव्हते. कारण, त्यांना प. बंगालमध्ये भक्कम जनाधार होता. पण, हा जनाधार फसवा आणि दहशतीवर आधारित होता, हे ताज्या निकालांनी दाखवून दिले. आता सत्ता गेल्यावर ममतांना या आघाडीची आठवण झाली आहे. पण, जर त्यांचा पक्षच जागेवर राहात नसेल, तर त्यांची भूमिका आणि वक्तव्ये निरर्थक ठरतात. केरळम्मध्ये काँग्रेस मोठ्या बहुमताने सत्तेवर आला खरा पण, त्यानंतर राहुल गांधी यांनी केरळम्चे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून टीका केली. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही काँग्रेसवर टीका केली. म्हणजे, या आघाडीच्या घटकपक्षांमध्येच अंतर्गत वाद आणि हेवेदावे आहेत. खरेतर या आघाडीतील प्रत्येक पक्ष, हा राज्यस्तरावर काँग्रेसचा विरोधी पक्ष आहे. अशा कमकुवत आणि अंतर्विरोधाने भरलेल्या या ‘इंडी’ आघाडीला महत्त्व किती द्यायचे? हा प्रश्नच आहे. थोडक्यात, भाजपविरोधातील ही ‘इंडी’ आघाडीच तुटत चालली आहे.
आणखी एक विशेष बाब अशी की, या आघाडीच्या सोमवारच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ठिकठिकाणी काही पोस्टर लावली गेली. त्यात या आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांच्या नावाने आणि त्यांच्या छायाचित्रासह, काँग्रेस व राहुल गांधी यांच्याविरोधात वक्तव्ये छापलेली आहेत. अर्थात, हे फलक कोणी लावले ते कळायला मार्ग नसला, तरी त्यातील वक्तव्ये ही खरोखरच या घटक आघाडीच्या नेत्यांनी केलेली होती. यावरूनही या आघाडीतील दुही स्पष्ट होते.
द्रमुक आणि आम आदमी पक्षही या आघाडीत नाही आणि तृणमूलचे अस्तित्वच शिल्लक राहते की नाही, अशी स्थिती आहे. इतर जे पक्ष या आघाडीत आहेत, त्यांचा प्रभाव जेमतेम त्यांच्या राज्यापुरताच आहे. त्यातही जम्मू-काश्मीरमधील ‘नॅशनल कॉन्फरन्स’सारखा पक्ष, केवळ काश्मीर खोऱ्यापुरता मर्यादित आहे. जम्मूत त्याला फारसा आधार नाही. काँग्रेसबद्दल बोलायलाच नको. तो पक्षही दर विधानसभा निवडणुकीनंतर त्या-त्या राज्यातून विलुप्त होत चालला आहे. अशा या कमकुवत पक्षांच्या आधारावर असलेली ही आघाडी, आता केवळ कागदावर शिल्लक राहिली आहे. या आघाडीच्या नेत्यांनी आता मोदी सरकारविरोधात कोणतीही वक्तव्ये केली, तरी त्यांना काही अर्थ उरणार नाही. सोमवारची बैठक ही आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठीच घटकपक्षांकडून बोलाविली गेली असावी, असे दिसते. त्यातील घटकपक्षांचा जनाधार ढासळत असून, काहींनी या आघाडीतूनच आधीच माघार घेतली आहे. त्यामुळे ‘इंडी’ आघाडीची दांडी गुल झाली असून, ती आता अखेरची घटका मोजत आहे, हे दिसून येते.