सुवर्ण मंदिर परिसरात पुन्हा ‌‘भिंद्रनवाले‌’ समर्थकांचे फलक!

    09-Jun-2026   
Total Views |

खलिस्तानी विचारसरणीला अंकुश लावण्यासाठी राबवण्यात आलेले ‌‘ऑपरेशन ब्लू स्टार‌’चे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या इतिहासात वेगळेच स्थान आहे. मात्र, आजही या विचारसरणीचे समर्थक आपल्याला दिसतात. जसे ते भारतात आहेत, तसेच ते परदेशातही आहेत. अलीकडेच दि. 6 जून रोजीही खलिस्तानी समर्थकांनी विषवमन केल्याचे समोर आले आहे.

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांच्या विरुद्ध, तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला लष्करी कारवाई करणे भाग पडले! जनरल सुंदरजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत, तेथे लपून बसलेले जर्नेलसिंह भिंद्रनवाले याच्यासह अनेक अतिरेकी मारले गेले. या कारवाईत शीख समाजास अत्यंत पवित्र असणाऱ्या सुवर्ण मंदिर परिसराची आणि ‌‘श्री अकाल तख्त साहिब‌’ची मोठ्या प्रमाणात हानी झाली. सुवर्ण मंदिरात जी कारवाई करण्यात आली, ती ‌‘ऑपरेशन ब्लू स्टार‌’ या नावाने ओळखली जाते. ‘ऑपरेशन ब्लू स्टार‌’ला गेल्या दि. 6 जून 2026 रोजी 42 वर्षे पूर्ण झाली. शीख समाजात खलिस्तानी विचारांची काही अतिरेकी मंडळी अजूनही सक्रिय असून, ते अशा प्रसंगांच्या निमित्ताने आपल्या समाजबांधवांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. गेल्या दि. 6 जूनला असेच काहीसे घडले!

जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे समर्थक असलेल्या काहींनी, गेल्या दि. 6 जून रोजी अमृतसरच्या ‌‘अकाल तख्त साहिब‌’ परिसरात जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे चित्र असलेले फलक झळकविले. 42 वर्षांपूव दि. 6 जून रोजी हाती घेण्यात आलेल्या ‌‘ऑपरेशन ब्लू स्टार‌’मध्ये, सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना घालविण्यासाठी भारतीय लष्कराने ही मोहीम हाती घेतली होती. लष्कराने केलेल्या त्या कारवाईच्या निषेधार्थ, अकाल तख्त परिसरात उपस्थित ‌‘भिंद्रनवाले‌’ समर्थकांनी घोषणा दिल्या. दि. 6 जूनचा दिवस लक्षात घेऊन, पंजाब पोलिसांनी सुवर्ण मंदिराच्या बाहेर कडक बंदोबस्त ठेवला होता. माजी खासदार सिमरणजीत सिंह मान यांच्या समर्थकांनी यावेळी, खलिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. ‌‘खदूर साहिब‌’चा खासदार अमृतपाल सिंह याचे समर्थकही, त्याचे छायाचित्र असलेले फलक घेऊन तेथे उपस्थित होते. सिमरणजीतसिंह मान हे एकेकाळी मुंबई पोलीस आयुक्त होते. ‌‘ऑपरेशन ब्लू स्टार‌’च्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने, ‌‘दल खालसा‌’ या संघटनेने ‌‘अमृतसर बंद‌’ची हाक दिली होती. त्यामुळे शहरातील काही महत्त्वाच्या बाजारपेठांमधील दुकाने बंद होती. ‌‘ऑपरेशन ब्लू स्टार‌’च्या आठवणीचे निमित्त साधून, काही शीख अतिरेकी गट शीख समाजास भडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसून आले. कॅनडासारख्या देशातही खलिस्तान समर्थक उजळ माथ्याने वावरताना दिसत आहेत. त्या देशातील खलिस्तानवादी विचारांचे अतिरेकी, भारतातील खलिस्तानवादी तत्त्वांना सर्वप्रकारची रसद पुरविण्यात आघाडीवर असतात, हे जगजाहीर आहे.

‌‘ऑपरेशन ब्लू स्टार‌’ होऊन 42 वर्षे झाली, तरी त्याच्या जखमा अजून पुसल्या गेल्या नाहीत. याच ‌‘ऑपरेशन ब्लू स्टार‌’चा बदल घेण्यासाठी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत हजारो शीख बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. दि. 6 जूनच्या निमित्ताने, अतिरेकी तत्त्वे अजूनही शीख समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, पंजाबमधील सुजाण शीख समाज आणि अन्य जनता त्यांना भीक घालत नाही, हेही वरचेवर दिसून आले आहे. आम्ही भारताचाच एक अविभाज्य घटक आहोत, यावर पंजाबमधील जनतेची दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे फुटीर शक्तींचे असे कारनामे फारकाळ चालणार नाहीत. शिवाय, यशस्वी तर मुळीच होणार नाहीत!

कुतुब मिनार : हिंदू-जैन संस्कृतीच्या खुणा!

दिल्लीमधील कुतुब मिनारचे बांधकाम 12व्या शतकाच्या अखेरीस, कुत्ब-उद-दिन-ऐबक याने सुरू केले. ते बांधकाम त्याच्यानंतर सत्तेवर आलेल्यांनी पूर्ण केले, असे इतिहासाच्या पुस्तकातून शिकविले गेले. अलीकडील काळात पुरातत्त्व अभ्यासकांनी, इतिहासाच्या अभ्यासकांनी हे मत खोडून काढले असून, कुतुब मिनार परिसरामध्ये हिंदू आणि जैन मंदिरे आधीपासूनच अस्तित्वात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तर भारतात इस्लामचे आक्रमण झाल्यानंतर, त्यांनी अनेक मंदिरांचा विध्वंस केला. कुतुब परिसरातील हिंदू-जैन मंदिरांचे अवशेष हे त्याचेच द्योतक. कुतुब मिनार परिसरात फेरफटका मारणाऱ्या कोणाही व्यक्तीला, तेथील वास्तुरचना ही इस्लामी वास्तुरचनेपेक्षा खूपच भिन्न असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही. ‌‘कुव्वत-अल-इस्लाम‌’ मशिदीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपांचे खांब, हे हिंदू-संस्कृतीच्या खाणाखुणा दाखविणारे आहेत. कमळ, घंटा, देवतांच्या मूत, तसेच या खांबांवरील नक्षीकाम, हे हिंदू-जैन मंदिरांमधील कोरीव कामाशी मिळते-जुळते असल्याचेही त्वरित लक्षात येते. तसेच, ते मशिदीच्या रचनेशी अजिबात सुसंगत नसल्याचेही दिसते.

भारतीय उपखंडात शतकानुशतके रुजलेल्या शिल्पकलेचे दर्शन कुतुब मिनार परिसरात होते. ते सर्व पाहता, त्या परिसरात ज्या इस्लामी वास्तू उभारण्यात आल्या आहेत, त्या-त्या ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असलेली मंदिरे पाडूनच उभारण्यात आल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे. इतकेच नाही, तर तेथील ‌‘कुव्वत-अल-इस्लाम‌’ मशिदीच्या परिसरातील शिलालेखावरही अनेक हिंदू आणि जैन मंदिरांचे साहित्य वापरून, ही मशीद उभारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर ‌‘युनेस्को‌’ने या परिसराची माहिती देताना, अनेक मंदिरांचे साहित्य वापरून या परिसराची उभारणी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

कुतुब परिसरातील एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, त्या परिसरात उभा असलेला लोह स्तंभ! इस्लामचे आक्रमण होण्याआधी कितीतरी काळापासून हा स्तंभ त्याजागी उभा आहे. ‌‘गुप्त‌’ राजवटीत हा स्तंभ उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. इस्लामचे आक्रमण होण्याच्या आधीपासूनच या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व होते, हे तेथे विद्यमान असलेल्या वास्तूंवरून लक्षात येते. मशीद किंवा मिनार उभारला जाण्याच्या कितीतरी आधीपासून, हा सर्व परिसर हिंदू धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून अस्तित्वात होता, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. कुतुब मिनार हा पूव हिंदू किंवा जैन संस्कृतीचा स्तंभ होता की, इस्लामी आक्रमकांनी मशिदीच्या लगत उभारलेला मिनार आहे, याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. असे असले, तरी मंदिरे पाडून आणि त्या मंदिरांचे साहित्य वापरूनच हा सर्व परिसर उभारण्यात आला, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. भारतातील अनेक मंदिरे आक्रमकांनी कशी नष्ट केली किंवा त्यांचे मशिदींमध्ये कसे रूपांतर केले, याची अनेक उदाहरणे देशाच्या विविध भागांमध्ये विद्यमान आहेत. त्यामुळे कुतुब मिनार परिसरात इस्लामी आक्रमकांनी हिंदू-जैन मंदिरे तोडून त्याठिकाणी आपले प्रभुत्व दाखविणारा परिसर उभारला, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

चार हजार, 800 घुसखोरांची परत पाठवणी!

प. बंगालमध्ये सत्तांतर झाले आणि सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली, त्या राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्या सरकारने लगेच बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई करण्यास प्रारंभ केला. प. बंगाल राज्यात जे बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यातील चार हजार, 800 घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवल्याची माहिती, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी अलीकडेच दिली. त्याचबरोबर सीमेवर कुंपण घालण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री अधिकारी यांनी सांगितले. राज्याच्या सीमावत जिल्ह्यांमध्ये उघडण्यात आलेल्या केंद्रांमधून, चार हजार, 800 बेकायदेशीर घुसखोरांना बांगलादेशात परत पाठविण्यात आले. तसेच 836 घुसखोरांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प. बंगालमधील बेकायदेशीर घुसखोरांची समस्या, प्रदीर्घ काळापासून आहे. पण, आधीच्या ममता सरकारने त्याकडे डोळेझाक केली होती. आता सुवेंदू अधिकारी सरकारने, या बेकायदेशीर घुसखोरांना परत पाठविण्यासाठी सुयोग्य यंत्रणा उभारली आहे. बेकायदेशीर विदेशी नागरिकांचा शोध घेणे, त्यांना ताब्यात घेणे आणि त्यांना परत पाठविणे, यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेद्वारे त्यांचा शोध घेतला जात आहे. राज्य सरकार केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्यानुसारच कृती करीत आहे, असे मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले. घुसखोरी ही प. बंगालला भेडसावणारी मोठी समस्या आहे. सीमेवर ज्या सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत, त्यांच्या सहकार्याने भविष्यात घुसखोरी होऊ नये, यासाठी आम्ही कार्य करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

9869020732





दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.