बर्लिनमध्ये उभे राहिले युरोपातील भव्य गणेश मंदिर; २१ वर्षांच्या तपश्चर्येनंतर स्वप्न पूर्ण

    09-Jun-2026   
Total Views |
 Berlin Ganesha Temple
 
मुंबई : (Berlin Ganesha Temple) बर्लिनच्या न्यूकोल्न भागातील श्री गणेश मंदिराचे ७ जून रोजी भव्य उद्घाटन करण्यात आले. अनेक दिवस चाललेल्या धार्मिक उत्सव आणि महाकुंभाभिषेक सोहळ्यानंतर विधिवत स्वरूपात हा सोहळा संपन्न झाला. युरोपमधील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर हॅझेनहायडे उद्यानाच्या परिसरात उभारण्यात आले असून त्याचा १७ मीटर उंच गोपुरम विशेष आकर्षण ठरत आहे. उद्घाटन सोहळ्यात भक्तांनी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मल्लखांबाच्या सादरीकरणाचा आनंद घेतला.
 
अशी माहिती आहे की, दि. २४ सप्टेंबर २००५ रोजी मंदिराचा पाया रचण्यात आला. त्यानंतर तब्बल २१ वर्षांच्या बांधकामानंतर ७ जून रोजी मंदिराचे विधिवत प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन झाले. मंदिराच्या उभारणीसाठी लागलेला सर्व निधी देणग्या आणि सेवाभावातून जमा करण्यात आला. आज हे मंदिर युरोपमधील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक मानले जाते. मंदिराचे व्यवस्थापन दहा स्वयंसेवी विश्वस्त आणि तीन पुजारी करतात. तसेच जर्मनीच्या कर विभागाकडून या संस्थेला नोंदणीकृत ना-नफा संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.
 
हॅझेनहायडे १०६ येथे असलेले मंदिर दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भक्तांसाठी खुले असते. सकाळी आणि संध्याकाळी आरतीचे आयोजन केले जाते. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर वैष्णव, शैव, शक्त, स्मार्ट अशा सर्व हिंदू परंपरांसाठी खुले आहे. तसेच बर्लिनमधील कुटुंबे, विद्यार्थी, विविध धर्मांचे जोडपे, स्थानिक नागरिक आणि शैक्षणिक गट यांनाही येथे स्वागत आहे. याआधी २०१४ मध्ये ब्रिट्झ परिसरात ‘श्री मयूरपती मुरुगन मंदिर’ सुरू झाले होते, जे बर्लिनमधील पहिले हिंदू मंदिर मानले जाते.(Berlin Ganesha Temple)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक