‘अधिक‌’ सांगणे न लगे...

    09-Jun-2026
Total Views |

सध्या ‌‘अधिक‌’ महिना सुरु असून, त्याअनुषंगाने केली जाणारी उपासना, व्रत, दान यांचेही महत्त्वचर्चेत येते. पण, आजच्या काळात आणखीन एक पुण्याचे काम आणि कर्तव्य म्हणजे पुढच्या पिढीसाठी निरोगी शरीर, शांत मन, चांगले संस्कार आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे. तेव्हा, नुकत्याच संपन्न झालेल्या ‌‘जागतिक पालक दिन‌’ आणि ‌‘जागतिक पर्यावरण दिना‌’च्या पार्श्वभूमीवर, पर्यावरण आणि स्वास्थ्याचा परस्पर संबंध उलगडून, आरोग्यदायी जीवनशैलीचा कानमंत्र देणारा हा लेख...

अधिक महिन्यात पुण्य साठवताना पुढच्या पिढीसाठी आपण नेमके काय ठेवून जात आहोत? संपत्ती, संस्कार, आरोग्य की हरित भविष्य?

एका संध्याकाळी आजोबा आणि नातू घरासमोरच्या अंगणात बसले होते. नुकत्याच कोसळलेल्या पावसाने मातीचा सुगंध दरवळला होता. समोरच्या झाडावर चिमण्यांची लगबग सुरू होती. नातवाने अचानक आजोबांना प्रश्न विचारला. “आजोबा, तुम्ही म्हणता ना की, तुम्ही आमच्यासाठी खूप काही करून ठेवले आहे. नेमके काय करून ठेवले आहे?” आजोबा हसले. त्यांनी घराकडे बोट दाखवले; “हे घर.” शेताकडे बोट दाखवले; “ही जमीन.” आणि मग अभिमानाने म्हणाले, “बँकेत थोडी बचतही आहे.” नातू काही क्षण शांत राहिला. मग त्याने पुन्हा विचारले, “पण आजोबा, माझ्यासाठी स्वच्छ हवा ठेवली आहे का? पिण्यासाठी शुद्ध पाणी ठेवले आहे का? झाडांची सावली ठेवली आहे का? आणि मला निरोगी राहता येईल, अशी पृथ्वी ठेवली आहे का?”

आजोबा निःशब्द झाले. खरे तर, हा प्रश्न त्या एका आजोबांना नव्हता. तो आपल्या सर्वांना होता. कारण, आपण मुलांसाठी घरे बांधतो, पैसा साठवतो, शिक्षणाची व्यवस्था करतो; पण त्यांच्यासाठी निरोगी जीवन साठवत आहोत का?

जून महिन्याच्या सुरुवातीलाच आपण दोन महत्त्वाचे दिवस साजरे केले. दि. 1 जून रोजीचा ‌‘जागतिक पालक दिन‌’ आणि दि. 5 जून रोजीचा ‌‘जागतिक पर्यावरण दिन.‌’ पहिला दिवस आपल्याला विचारतो, “तुम्ही मुलांना काय शिकवत आहात?” आणि दुसरा दिवस विचारतो, “तुम्ही मुलांसाठी कसे जग ठेवून जात आहात?” आणि याच काळात आलेला अधिक महिना जणू तिसरा प्रश्न विचारतो, “पुण्य साठवताना पुढच्या पिढीसाठी काय साठवत आहात?”

आपल्या संस्कृतीत अधिक महिना हा पुण्यसंचयाचा महिना मानला जातो. दान, जप, तप, व्रत, उपासना यांना या काळात विशेष महत्त्व असते. परंतु, आजच्या काळात सर्वांत मोठे पुण्य कोणते असेल, तर ते म्हणजे पुढच्या पिढीसाठी निरोगी शरीर, शांत मन, चांगले संस्कार आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे. वारसा फक्त मालमत्तेचा नसतो, आज अनेक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करतात. हे आवश्यकच आहे; पण वारसा फक्त संपत्तीचा नसतो. मुलांना आपल्या सवयींचा वारसा मिळतो. मुलांना आपल्या विचारांचा वारसा मिळतो. मुलांना आपल्या आहाराचा वारसा मिळतो. मुलांना आपल्या पर्यावरणाचा वारसा मिळतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मुलांना आपल्या जीवनमूल्यांचा वारसा मिळतो. आज आपण त्यांना मोठे घर देऊ शकतो; पण मोठे मन देऊ शकतो का? आपण त्यांना महागडी साधने देऊ शकतो; पण निसर्गावर प्रेम करायला शिकवू शकतो का? हा विचार करण्याची वेळ आली आहे.

पर्यावरणाचा प्रश्न म्हणजे, आरोग्याचा प्रश्न. पर्यावरण हा विषय अनेकांना वेगळा वाटतो आणि आरोग्य हा वेगळा. पण, प्रत्यक्षात हे दोन्ही एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. प्रदूषित हवा म्हणजे वाढता दमा. दूषित पाणी म्हणजे वाढते संसर्गजन्य आजार. रासायनिक अन्न म्हणजे कमी होणारी प्रतिकारशक्ती. वाढते. तापमान म्हणजे वाढणारे शारीरिक व मानसिक ताण.

पूवची मुले मातीत खेळत होती. झाडांवर चढत होती. पावसात भिजत होती. आजची मुले स्क्रीनसमोर बसतात. त्यांच्या बालपणात निसर्गापेक्षा तंत्रज्ञानाचे प्रमाण जास्त झाले आहे. तंत्रज्ञान आवश्यक आहेच, पण निसर्गाचा पर्याय नाही.

आयुर्वेदातील रसायन

जीवन समृद्ध करणारी संकल्पना आयुर्वेदात ‌‘रसायन‌’ ही अत्यंत सुंदर संकल्पना आहे. रसायन म्हणजे केवळ औषध नव्हे. शरीर, मन, बुद्धी आणि प्रतिकारशक्ती यांना दीर्घ काळ पोषण देणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे ‌‘रसायन.‌’ आवळा रसायन आहे. च्यवनप्राश रसायन आहे. गुळवेल रसायन आहे. पण, त्याचबरोबर, प्रेमळ कुटुंब हे एक रसायन आहे. आनंदी वातावरण हे रसायन आहे. शांत झोप हे रसायन आहे. निसर्गाचा सहवास हे रसायन आहे आणि चांगले संस्कार हेही रसायनच आहेत. आजच्या मुलांना ही रसायने देण्याची गरज आहे. मुलांच्या ताटातील अन्न म्हणजे त्यांच्या भविष्याची पायाभरणी. आयुर्वेद सांगतो, आहार हा महाभैषज्य आहे. म्हणजेच अन्न हे सर्वश्रेष्ठ औषध आहे. आज अनेक मुलांना ‌‘फास्ट फूड‌’ सहज उपलब्ध आहे; पण पौष्टिक अन्नाची सवय कमी होत चालली आहे.

मुलांच्या ताटात नियमितपणे असावेत असे काही पदार्थ :

बुद्धी आणि स्मरणशक्तीसाठी - भिजवलेले बदाम, अक्रोड, तूप, दूध, आवळा

रक्तवृद्धीसाठी - डाळिंब, बीट, खजूर, मनुका, गूळ, तीळ

प्रतिकारशक्तीसाठी - तुळस, हळद, सुंठ, आवळा, च्यवनप्राश

हाडांसाठी - नाचणी, तीळ, दूध, ताक

पचनासाठी - मूग, घरगुती अन्न, ऋतूनुसार भाज्या, ताक

पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कधीतरी चालू शकतात; पण ते दैनंदिन आहाराचा भाग होता कामा नयेत. पालकत्व म्हणजे उपस्थिती. ‌‘जागतिक पालक दिन‌’ आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. मुलांना महागडी खेळणी आठवत नाहीत. मुलांना ब्रॅण्डेड कपडे आठवत नाहीत. पण त्यांच्यासोबत बसलेले आई-वडील आठवतात. त्यांच्या गोष्टी ऐकून घेणारे कान आठवतात. अपयशात पाठीवर ठेवलेला हात आठवतो. आज मुलांना सर्वाधिक गरज आहे, ती उपस्थित पालकांची.

अधिक महिन्यातील काही अधिक संकल्प करूया. अधिक झाडे लावूया. अधिक चालूया. अधिक योग करूया. अधिक संवाद साधूया. अधिक वाचन करूया. अधिक घरगुती अन्न खाऊया. अधिक पाणी वाचवूया. अधिक कृतज्ञ राहूया. अधिक वेळ कुटुंबाला देऊया. खरे पुण्य कुठे साठते, तर अधिक महिन्यात आपण मंदिरात दान करतो; ते आवश्यक आहे. पण, त्याचवेळी एखादे झाड लावणे हेही दानच आहे. एखाद्या मुलाला पुस्तक भेट देणे हेही दानच आहे. पाण्याची बचत करणे हेही दानच आहे. मुलांना चांगल्या सवयी लावणे हेही दानच आहे. त्यांना निरोगी शरीर आणि संवेदनशील मन देणे हेही दानच आहे. आजच्या काळातील सर्वांत मोठे पुण्य म्हणजे पुढच्या पिढीसाठी निरोगी आणि सुंदर भविष्य निर्माण करणे. कारण, उद्या आपल्या मुलांना आपण किती पैसा दिला, हे कदाचित आठवणार नाही; पण आपण त्यांना दिलेले आरोग्य, दिलेला श्वास, दिलेला निसर्ग, दिलेली मूल्ये आणि दिलेले प्रेम ते आयुष्यभर जपतील. अधिक महिन्याचा संदेश कदाचित इतकाच, अधिक पैसा नव्हे, अधिक आरोग्य! अधिक सुविधा नव्हे, अधिक संस्कार! अधिक उपभोग नव्हे, अधिक जपणूक! अधिक वस्तू नव्हे, अधिक प्रेम! आणि मग... अधिक सांगणे न लगे!

डॉ. मधुरा कुलकर्णी
(लेख ‌‘आरोग्य भारती‌’ द्वारे प्रकाशित)