वात्सल्याची ‌‘रोशनी‌’

    09-Jun-2026
Total Views |

गरिबीच्या अंधारातून समाजसेवेच्या प्रकाशाकडे असा जीवनप्रवास असलेल्या पालघरच्या रोशनी सुलाखे यांची प्रेरणादायी कहाणी...

भारतीय संस्कृतीत निःस्वार्थी भावनेने समाजाची सेवा करणाऱ्यांना खऱ्या अर्थाने ‌‘कर्मयोगी‌’ म्हटले गेले आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने धडपडणारे अनेक समाजसेवक आपल्या अवतीभवती वावरत असतात. हेच समाजसेवक खऱ्या अर्थाने भारतभूमीचे आणि महाराष्ट्राचे ‌‘खरेखुरे सेवक‌’ आहेत. ‌‘भगवद्गीते‌’तील लोकाप्रमाणे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, केवळ आत्मसमाधानासाठी अहोरात्र कष्ट उपसणारे हेच ते आदर्श व्यक्तिमत्त्व, ज्यांच्याकडून आजच्या पिढीने आदर्श घेतला पाहिजे. असाच एक ‌‘कर्मयोगी‌’ आदर्श पालघरच्या मातीत आकाराला आला आहे, ज्यांचे नाव आहे- रोशनी काशिनाथ सुलाखे!

पालघर जिल्ह्यातील माकूणसार या एका छोट्याशा गावात दि. 1 जुलै 1968 रोजी लक्ष्मण आणि लक्ष्मीबाई चौधरी यांच्या अत्यंत गरीब कुटुंबात रोशनी यांचा जन्म झाला. गरिबीचे चटके लहानपणापासूनच सोसावे लागल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. आईला हातभार लावण्यासाठी त्यांनी धुणीभांडी करून उदरनिर्वाह केला. घरातील मोठी बहीण म्हणून जबाबदारी अंगावर आल्यामुळे पालघर येथील एका कंपनीत नोकरी पत्करली.

याच कंपनीत काम करत असताना त्यांची भेट काशिनाथ सुलाखे यांच्याशी झाली, जे पुढे त्यांचे जीवनसाथी बनले. लग्नानंतर या दाम्पत्याने केवळ मेहनतीच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पालघर येथे स्वतःचे एक दुकान सुरू केले आणि कुटुंबाला सुस्थितीत आणले.

पैसा आणि स्थैर्य आले, तरी रोशनी यांनी आपले बालपण, गरिबीत सोसाव्या लागलेल्या यातना आणि गरिबांची अपरिहार्यता विसरल्या नाहीत. जेव्हा माणसाला स्वतः दुःखाची झळ बसते, तेव्हाच तो दुसऱ्याचे दुःख समजू शकतो. याच जाणिवेतून आणि संवेदनशीलतेतून एका खऱ्या समाजसेविकेचा जन्म झाला. जिथे-जिथे गरिबीमुळे हतबल झालेले कुटुंब किंवा व्यक्ती आढळली, तिथे-तिथे रोशनी स्वतः धावून गेल्या.

त्यांच्या समाजकार्याची सुरुवात अत्यंत हृदयस्पश आहे. कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा, कार्तिक साहू याला हृदयाचा गंभीर आजार होता. रोशनी यांनी स्वतः पुढाकार घेऊन तब्बल साडेचार लाख रुपयांची मदत मिळवून दिली आणि त्याला जीवदान दिले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी कार्तिकचे ‌‘हॉटेल मॅनेजमेंट‌’पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली आणि आज तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आहे. कृतज्ञतेने कार्तिक म्हणतो, “मी कमवायला लागलो की, रोशनीताईंप्रमाणेच इतरांना मदत करेन.” म्हणजेच, रोशनी यांच्या एका कार्यातून समाजात आणखी एक नवा समाजसेवक जन्मला आला. ‌‘गीते‌’मध्ये सांगितलेला हाच तो कर्माचा दिव्य सिद्धांत आहे, जो एका दिव्याने दुसरा दिवा पेटवत जातो. रोशनी यांच्या दातृत्वाची यादी अत्यंत मोठी आणि वंदनीय आहे. त्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला मदतीचा हात दिला आहे:

धुकटण गावातील आदिवासी गरीब मुलगी स्वाती काकरा हिला दक्षिण कोरियातील ‌‘पोल‌’ (खेळ) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आर्थिक बळ दिले. पालघर येथील दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेला फैजान मणियार आणि सातपाटी येथील कर्करोगबाधित चिमुरडा हितार्थ पाटील यांना वैद्यकीय उपचारांसाठी मोठी मदत केली. आईविना पोरके झालेल्या आदेश आणि पंकज पाटील या भावांना आधार दिला. ‌‘ब्लाईंड व कॅन्सर फाऊंडेशन‌’ला अंध विद्यार्थ्यांसाठी सहकार्य केले. वेढीगावातील आईवडिलांची कर्करोगबाधित मुलगी लोका दुमाडा आणि दांडेकर महाविद्यालयातील अंध विद्याथ रामदास याला शिक्षणासाठी मदत केली. मोखाड्यासारख्या दुर्गम भागातील कुपोषण असो, गरिबीमुळे फी भरू न शकणारे विद्यार्थी असोत, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण असोत, नवोदित खेळाडू की, परिसरातील प्राणी; रोशनी सुलाखे या प्रत्येकासाठी ‌‘माऊली‌’ बनून उभ्या राहतात. विशेष म्हणजे, स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्या हे सगळे कार्य करतात. त्यांच्या या पारदर्शक आणि प्रामाणिक कामावर विश्वास ठेवून अनेक देणगीदारांनी (डोनर्स) त्यांना मोठी साथ दिली आहे. समाजातील जास्तीत-जास्त गरजूंना संघटितपणे मदत मिळावी, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी ‌‘पालघर सेवाभावी संस्था‌’ स्थापन केली असून, याद्वारे आता त्यांच्या कार्याची व्याप्ती अधिकच विस्तारली आहे.

स्वतः गरिबीच्या आणि संकटांच्या दरीतून तावूनसुलाखून निघत, आपला संसार आणि व्यवसाय सांभाळत, आपले पती काशिनाथ व मुलगा गिरीश यांचा भक्कम पाठिंबा, विश्वास व साथीने दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या खऱ्याखुऱ्या जनसेविका आणि कर्मयोगी रोशनी काशिनाथ सुलाखे यांच्या ध्येयवादाला आणि अलौकिक कार्याला दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’तर्फे अनंत शुभेच्छा!

- कमलेश संखे