जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर नेत्रदान जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

    08-Jun-2026
Total Views |
Health Awareness Campaign
 
मुंबई : (Health Awareness Campaign) “नेत्रदान" हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. समाजामध्ये नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे दि. १० जून रोजी जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर नेत्रदान जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवार दि.८ रोजी सांगितले.
 
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना , उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये नेत्रदान जनजागृती उपक्रम तसेच नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
समाजातील दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांना नव्या आशा देण्याचे सामर्थ्य नेत्रदानामध्ये आहे. त्यामुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, या उद्देशाने हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे.
 
राज्यातील ३३ अनुदानित विद्यापीठे व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ५६६ महाविद्यालयांमध्ये तसेच ३४ विनाअनुदानित विद्यापीठे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १४७ महाविद्यालयांमध्ये १० जून रोजी नेत्रदान जनजागृती कार्यक्रम व नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे."
 
"नेत्रदान करा, जीवन उजळवा” हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. (Health Awareness Campaign)
 
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण केली जाणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः सहभागी होऊन समाजातील इतरांनाही या कार्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहनही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.(Health Awareness Campaign)