सायकल हा शब्द नाही, तसेच ते फक्त दळणवळणाचे साधनही नाही, तर ती एक भावना आहे. अनेकांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये सायकल बालमैत्रीण म्हणून येते. अशी सायकल हरवल्यावर अथवा पडल्यावर होणारे दु:ख मोठे! या सायकलच्या विविध कथा आहेत, तसेच तिच्या बदलत्या रुपाचाही इतिहास आहे. सायकलच्या इतिहासाचा मागोवा घेणारा हा लेख...
बुधवार, दि. ३ जून रोजी जागतिक ’सायकल दिन’ अर्थात इंग्रजीतला ‘बायसिकल-डे’ साजरा झाला. आपण जाणतोच की, सायकल हे अत्यंत साधे, परवडणारे, विश्वासार्ह, पर्यावरणाला पूरक असे साधन आहे. हे साधन सर्वसामान्य माणसाच्या आवायात असून, जागतिक स्तरावर त्याचे महत्त्व आहे. त्यामुळेच त्याच्या संबंधित दिवसाला ‘वर्ल्ड सायकल डे’ म्हटले जाते. एप्रिल २०१८ मध्ये ‘संयुक्त राष्ट्र महासभे’ने दि. ३ जून हा दिवस, ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून घोषित केला. अमेरिकेतील समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. लेझेक सिबिलस्की यांनी, त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत सायकलच्या प्रचारासाठी एका मोहीमेची सुरूवात केली. त्यानंतर तुर्कमेनिस्तानसह ५६ देशांच्या पाठिंब्यामुळे, संयुक्त राष्ट्राने याला अधिकृत जागतिक दिनाचा दर्जा दिला. काही वेळा ‘जागतिक सायकल दिन’चा संदर्भ दि. १७ सप्टेंबर या दिवशीदेखील घेतला जातो या दिवशी २०१७ मध्ये, सायकलच्या २००व्या वर्धापन दिनानिमित्त ‘जागतिक सायकलिंग सांस्कृतिक महोत्सव’ सुरू झाला होता. पर्यावरणाचे रक्षण, इंधनाची बचत आणि तंदुरुस्तीसाठी सायकल चालवण्याला जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा दिवस साजरा होतो.
जशा पिढ्या बदलल्या, तशा सायकलींच्याही पिढ्यांमध्ये बदल झाला. सायकलिंगचा रोमांचकारी अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानेच अनुभवला असेलच. यापुढच्या पिढ्याही तो अनुभवत राहतील. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत, पुरुषांपासून ते महिलांपर्यंत, प्रत्येकालाच सायकलचे हॅण्डल पकडून, पायडल मारत वेगाने सायकल चालवण्यास आवडते. यातही निसर्गरम्य मार्गांवर, शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर आणि शांत गल्ल्यांकडे वेगाशी स्पर्धा करण्याचा मजा काही औरच! सायकल ही प्रत्येकाचीच सखी असते, जिच्यासोबत फिरण्याचा अनुभव प्रत्येकानेच घेतला असेल. मग तुम्ही साधे गृहस्थी जीवन जगणारे असाल, व्यायामासाठी सायकलिंग करणारे असाल, निष्णात सायकलपटू असाल किंवा ऑलिम्पियन असाल; या मैत्रिणीने तुमची साथ कधीच सोडलेली नसणार हे नक्की.
पण एका जगप्रसिद्ध क्रीडापटूची ही मैत्रीण मात्र, एकदा साथ सोडून गेली होती. ही त्यांची झालेली ताटातूट, नंतर त्याला फायदेशीरच ठरली होती. कोण होता तो ऑलिम्पियन आणि ती घटना कशी घडली, ती कथा मी तुम्हाला येथे सांगणार आहे.
अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात मदत करणार्या फ्रान्सचा राजा ‘सोळावा लूई’ याच्या नावावरून ज्या शहराचे नामकरण झाले आले होते, त्या अमेरिकेच्या केंटकी राज्यातील जेफर्सन परगण्याची राजधानी व राज्यातील सर्वांत मोठे शहर असलेल्या लुईझव्हिल या ‘फॉल्स सिटी’तल्या एका युवकाची दंतकथा मी सांगणार आहे. आता आपल्याला या गावाच्या नावात ‘फॉल्स’चा म्हणजे ‘खोटे’ हा अर्थ अपेक्षित नसून, ‘फॉल्स’ म्हणजे धबधबा हा अर्थ अपेक्षित आहे.
ही कथा एका हरवलेल्या सायकलीपासून सुरू होते. १९६०च्या सुमारास लॅसियस ले हा जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा होता. त्या अमेरिकन बॉसरला या कथेतील सायकलने, सर्वश्रेष्ठ होण्याच्या मार्गावर आणले. जानेवारी १९४२ला अमेरिकेत जन्मलेला लॅसियस ले हा १९५५मध्ये जेव्हा १२ वर्षांचा होता, तेव्हा तो आपले मूळ गाव असलेल्या ‘कोलंबिया जिम’च्या जत्रेत आपल्या सवंगड्यांसमवेत सायकल चालवत गेला. तेव्हा त्याची सर्वांत प्रिय मैत्रीण एक लाल-पांढरी रंगसंगती असलेली ‘श्विन’ कंपनीची सायकल हरवते.
सध्या ‘पॅसिफिक सायकल्स्’ कंपनीने विकत घेतलेल्या आणि शिकागो येथे १८९५ साली इग्नाझ श्विन यांनी स्थापन केलेल्या ‘श्विन बायसिकल्स’चे उत्पादन असलेली ‘श्विन’ सायकल तेव्हा जगप्रसिद्ध होती. लॅसियस ले ती गहाळ झालेली सायकल शोधायचा प्रयत्न करतो. पण, सायकल सापडत नसल्याने तो प्रचंड वैतागतो आणि रागाने भडकतो. "माझी सायकल पळवून नेणारा जो कोणी असेल, एकदा का तो मला दिसला तर मी त्याला सोडणार नाही. त्याला चांगलाच बेदम ठोसे मारणार आहे.” लॅसियसच्या उद्रेकाने जो मार्टिन नावाच्या एका पोलीस अधिकार्याचे लक्ष वेधले जाते. मार्टिन लॅसियसला तुझा राग योग्य असल्याचे सांगत, तो योग्य दिशेने वळवण्यासाठत्याला आधी बॉसिंग शिकण्याचा सल्ला देतो. तसेच, आपल्या व्यायामशाळेत बॉसिंगच्या वर्गात प्रवेश घेण्याचेही आमंत्रण देतो. लॅसियसचे बॉसिंगचे पद्धतशीर शिक्षण घेऊन झाल्यावर, बाकीचा इतिहास सर्वांनाच माहीतच आहे. त्या अनपेक्षित भेटीतूनच या एका दंतकथेचा जन्म होतो. सहा आठवड्यांच्या आत, लॅसियसने आपली पहिली लढत जिंकली होती. म्हणजे, सहा वर्षांच्या आत, १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये लॅसियस लेच्या गळ्यात मुष्टियुद्धाचं सुवर्णपदक होते .
त्याचे चित्रकार-संगीतकार वडील कॅसियस मार्सेलस ले सीनियर, ज्यांना कॅसियस ले ज्युनियरने ‘लुईव्हिलचा सर्वांत आकर्षक नर्तक’ म्हटले होते, त्यांच्याप्रमाणेच हा अव्वल बॉसरही होता. पण त्याचे नृत्याचे मैदान म्हणजे बॉसिंगची रिंग होती. वयाच्या २२व्या वर्षी कॅसियस ले ज्युनिअरने इस्लाम धर्म स्वीकारून, आपले नाव बदलून मोहम्मद अली नाव धारण केले. व्हिएतनाम युद्धाचे कट्टर टीकाकार असलेल्या अलीने आपल्या भूमिकेवर ठाम राहात, किंबहुना ती भूमिका झुगारून देत, सैन्यात भरती होण्यास नकार दिला. या निर्णयाची त्याला मोठीच वैयक्तिक किंमत मोजावी लागली. यामुळे त्याच्या कारकिर्दीच्या ऐन भरातच, त्याला जवळपास चार वर्षे बॉसिंग करण्याची संधीच मिळाली नाही.
सायकल गायब झाल्यानंतर पोलीस आधिकारी लॅसियसला मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी ज्या कोलंबिया जिमला घेऊन गेला, त्या ऐतिहासिक वारसास्थळाच्या दर्शनी भागावर सध्या लाल सायकलीची प्रतिकृती लावलेली आहे. लॅसियसच्या सायकलीच्या आधीपासून ते आजपर्यंत सायकलींमध्ये जगात कस बदल झाले, याची माहिती घेऊया...
जगातील पहिल्या सायकलला पायडल नव्हते, चेन नव्हती अन् एवढेच नव्हे, तर ब्रेकही नव्हते.
१८१७मध्ये सुरुवात : कार्ल वॉन ड्राईस यांनी पहिले दोन चाकी वाहन तयार केले. लोक जमिनीवर पाय टेकवून ते वाहन पुढे ढकलत असत. अशा प्रकारे सायकलचा प्रवास सुरू झाला.
१८६०चे दशक : ‘द बोनशेकर’ सायकल चालवणे सोपे व्हावे, म्हणून अखेरीस पायडल जोडण्यात आले. पण खडबडीत रस्ते आणि लोखंडी फ्रेममुळे हा प्रवास गैरसोयीचा होत असे. लोक त्याला ‘द बोनशेकर’ म्हणजेच हाडे खिळखिळी करणारी असे म्हणत.
१८७०चे दशक : ‘पेनी-फार्थिंग’चा काळ. यात एक प्रचंड मोठे चाक आणि एक छोटे चाक असे. वेगवान, स्टायलिश, पण समतोल राखण्यास कठीण असे ते वाहन होते. त्यावर सायकलिंग हे एक धाडसीच कृत्य होते.
१८८०चे दशक : यात आधुनिक सायकलचा जन्म झाला. जॉन केम्प स्टारली यांनी ‘सेफ्टी सायकल’ सादर केली. समान चाके, उत्तम संतुलन, अधिक सुरक्षित प्रवास, ही त्याची वैशिष्ट्ये. अशा प्रकारे आधुनिक सायकलचा जन्म झाला.
भारतात तर सायकल ही एक वस्तू न राहता, एक भावना आहे. आधाराशिवाय घेतलेली ती पहिली स्वारी, मागे धावणारे पालक आणि मित्रमंडळी, पडणे, शिकणे आणि पुन्हा सायकल चालवणे अशा, प्रत्येक भारतीयाच्या बालपणीच्या आठवणी सायकलशी जोडल्या आहेत. अनेक भारतीयांसाठी सायकल हे स्वातंत्र्याचे पहिले पाऊल होते. शाळेत जाणे, घरचा किराणा आणणे, गल्ल्यांमध्ये शर्यती लावणे आणि स्वावलंबन शिकणे अशा कित्येक आठवणी भारतीयांच्या आहेत. सायकल हे भारतीयांसाठी केवळ वाहतुकीचे साधन न राहता, ती जीवनाचाच एक अविभाज्य भाग बनली.
आज सायकलिंगला अधिक व्यापक अर्थ प्राप्त झाला आहे. सकाळची रपेट, फिटनेसची उद्दिष्टे, आठवड्याच्या शेवटी जमणारे सायकलिंगचे गट आणि कामाच्या धावपळीनंतर मिळणारी शांतता असे विविध अर्थ आज सायकल शब्दाशी जोडले गेले आहेत. तसेच, ही सायकल पृथ्वीलाही मदत करते. कोणतेही इंधन नाही, प्रदूषण नाही; केवळ शुद्ध गती! एक छोटीशी फेरीही, मोठा बदल घडवून आणू शकते. लाकडी चाकांपासून ते प्रत्येक रस्त्यापर्यंत आणि लाखो प्रवासांपर्यंत साथ देणारी माझी मैत्रीण माझी सायकल असते. आपली सायकल चोरीला जाऊ नये, म्हणून आपणही खबरदारी घेत राहू आणि ती चिरंतन राहो, अशी प्रार्थना करू.
- श्रीपाद पेंडसे