सड्यांचे बदलते रंग...

    08-Jun-2026
Total Views |
 
Konkan Laterite Plateau Biodiversity
 
कोकणातील सडे हे वर्षातील बहुतांश काळ ओसाड दिसणारे. पण, पावसाळ्यात जैवविविधतेने बहरणारे हे सडे अनोख्या परिसंस्थेचा अधिवासदेखील आहेत. दुमळ वनस्पती, उभयचर प्राणी, जलस्रोत आणि पारंपरिक शेती यांचे जीवनचक्र पावसाशी घट्ट जोडलेले असताना, हवामानबदलामुळे पर्जन्यमानाच्या स्वरूपात होत असलेल्या अनिश्चित बदलांनी या संपूर्ण परिसंस्थेसमोर नवे संकट उभे केले आहे. त्यामुळे सड्यांचे संवर्धन म्हणजे, या अनोख्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याची काळाची गरज आहे.
 
कोकणाला कडे, खडकाळ व वाळूचे समुद्रकिनारे, पठारे, कांदळवने, नद्या आणि दऱ्यांमधील वनराई, अशा विविध भौगोलिक वैशिष्ट्यांचे वरदान लाभले आहे. यांपैकीच संपूर्ण प्रदेशात विखुरलेल्या आणि वर्षातील बहुतांश काळ ओसाड भासणाऱ्या; परंतु स्थानिक भाषेत ‌‘सडा‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिवासांचे विशेष महत्त्व आहे. सडे म्हणजे सह्याद्री आणि कोकण परिसरात आढळणारी विस्तीर्ण सपाट भूमी. लाखो वर्षांच्या अपक्षय प्रक्रियेमुळे बेसाल्ट खडकाचा वरचा थर झिजून गेल्याने हे सपाट प्रदेश तयार झाले आहेत. कोकणातील बहुतांश सडे जांभा (लेटराईट) खडकांनी बनलेले आहेत. पावसाने या भूभागांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली असून, आजही सड्यांवरील जैविक आणि सांस्कृतिक जीवनावर त्याचा मोठा प्रभाव आहे. मात्र, हवामानबदलामुळे पर्जन्यमानाच्या स्वरूपात होत असलेल्या बदलांमुळे सड्यांवरील जीवन अधिकाधिक अनिश्चित होत चालले आहे.
 
दरवर्षी मान्सूनचे आगमन होताच, हे ओसाड भासणारे प्रदेश पुन्हा जिवंत होतात आणि रंगीबेरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरून जातात. अनेक वनस्पतींचे संपूर्ण जीवनचक्र पावसावर अवलंबून असते. यांपैकी काही वनस्पती फक्त कोकणातच आढळतात आणि जगात अन्यत्र कुठेही नाहीत. उदाहरणार्थ, ‌‘कोकण डिपकॅडी‌’ (Dipcadiconcanense) आणि 'Aponogetonnateshii.' या वनस्पती विविध फुलपाखरे आणि कीटकांना आधार देतात. पर्जन्यमानाच्या स्वरूपात होणारे बदल या वनस्पतींच्या जीवनचक्रावर परिणाम करू शकतात, ज्याचे दुष्परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होऊ शकतात. विशेषतः येथे आढळणाऱ्या स्थानिक (एन्डेमिक) प्रजाती कायमस्वरूपी नष्ट होण्याच्या धोक्यात आहेत.
 
सड्यांवरच आढळणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, खडकातील पाणवठे आणि ओढे, ज्यांपैकी काही वर्षभर पाण्याने भरलेले असतात. विविध उभयचर आणि इतर जलचर जीव या अधिवासांवर अवलंबून असतात. विशेषतः उभयचर प्राणी हवामानबदलामुळे पर्जन्यमानात होणाऱ्या बदलांबाबत अत्यंत संवेदनशील असतात. कारण, त्यांचे संपूर्ण जीवनचक्र त्यावर अवलंबून असते. पावसाच्या स्वरूपावर विविध वनस्पतींच्या वाढीचा आणि फुलण्याचा कालावधी ठरतो. मान्सूनपूर्व सरींनंतर सर्वप्रथम ‌‘क्लोरोफायटम‌’ आणि ‌‘क्रिनम‌’ या वनस्पती दिसू लागतात. त्यानंतर पाऊस वाढत जातो तसे ‌‘एरिओकॉलॉन‌’ आणि ‌‘युट्रिक्युलारिया‌’ यांचे समुदाय संपूर्ण सड्यावर पसरलेले दिसतात. पाऊस ओसरू लागल्यावर सोनकीची फुले आणि उंच हिरवे गवत लहान फुलांची जागा घेतात. सड्यांमधील हा बदल शेतांमधील पिकांच्या कापणीची चाहूलही देतो. त्याचबरोबर गणेश चतुर्थीचा सण येतो आणि त्याकाळात सड्यावर उमलणारी फुले ‌‘माटवी‌’ सजवण्यासाठी वापरली जातात.
 
आश्चर्याची गोष्ट नाही की, हेच ऋतुचक्र मानवी जीवनालाही दिशा देते. भातशेतीसाठीची तयारी पावसाळ्यापूवच सुरू होते. ‌‘भाजावळ‌’ ही पारंपरिक प्रक्रिया सड्यांच्या विशिष्ट परिस्थितीशी जुळवून घेत विकसित झाली आहे. शेत तयार झाल्यानंतर भात पिकवण्यासाठी पाऊस हा मुख्य जलस्रोत असतो. पर्जन्यमानात बदल झाल्यास उत्पादनावर थेट परिणाम होतो. पावसाच्या दोन टप्प्यांतील दीर्घ खंडामुळे भातखाचरे कोरडी पडतात, तर अचानक पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करणे कठीण जाते.
 
कोकणातील सडे सह्याद्रीतील पर्जन्यनिर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावतात. सड्यांची विस्तीर्ण मोकळी जागा अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांना सह्याद्रीकडे जाण्यास मदत करते. सह्याद्री पर्वतरांगा या वाऱ्यांना अडवतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. हा पाऊस आपल्या गोड्या पाण्याच्या नद्यांना पोसतो. त्याचबरोबर सड्यांवरील जांभ्या खडकांमध्ये झिरपून भूजलसाठ्याची पुनर्भरण प्रक्रिया घडवून आणतो. हेच भूजल सड्यांच्या आसपासच्या गावांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देते. तसेच फळबागा आणि पावसाळ्यानंतरच्या इतर शेतीकामांसाठीही ते वापरले जाते. भूजलावर आधारित झरे वर्षभर वाहणारे किंवा अर्धवर्षभर वाहणारे ओढे तयार करतात. या ओढ्यांचा वापर पाळीव जनावरे पिण्यासाठी व अंघोळीसाठी करतात. कोल्हे, बिबटे, साळिंदर यांसारखे वन्यप्राणीही या जलस्रोतांवर अवलंबून असतात. मऊ कवचाची कासवे (Soft-shell Turtles) हिवाळी निद्रेसाठी या भागांचा वापर करतात. सड्यांवरील जीवन हे निसर्गातील आवत बदलांशी जुळवून घेण्याच्या मानवी कौशल्यावर शतकानुशतके उभे राहिले आहे. परंतु, हवामानबदलामुळे दरवष घडणारे अनिश्चित बदल आता इतके वाढले आहेत की, पूव यशस्वी ठरलेल्या पारंपरिक पद्धती टिकवणे कठीण होत आहे. या पद्धती कोकणच्या संस्कृती आणि परंपरांचा अविभाज्य भाग आहेत.
 
हवामानबदलाची चर्चा बहुतेक वेळा वाढते तापमान आणि अतिवृष्टीसारख्या टोकाच्या हवामान घटनांच्या संदर्भात केली जाते. मात्र, कोकणात त्याचे परिणाम आधीच बदलत्या पर्जन्यमानाच्या स्वरूपातून दिसू लागले आहेत. याचा परिणाम जैवविविधता, शेती आणि जलसुरक्षेवर होत आहे. त्यामुळे सड्यांचे संवर्धन हे केवळ एका अद्वितीय परिसंस्थेचे संरक्षण नसून, कोकणातील सांस्कृतिक परंपरा, लोकजीवन आणि नैसर्गिक वारसा जपण्याचेही महत्त्वाचे कार्य आहे.
 
कोकणाची ओळख असलेला हापूस आंबाही सड्यांच्या लाल मातीवरच अवलंबून आहे. त्याच्या योग्य फुलोऱ्यासाठी हिवाळ्यात तापमानात योग्य प्रमाणात घट होणे आवश्यक असते. मात्र, हिवाळा किंवा उन्हाळ्यात होणारा अवेळी पाऊस उत्पादनावर मोठा परिणाम करतो आणि अनेकदा मोठे नुकसान घडवतो.
 
- मनाली राणे
(लेखिका सड्यांवरील जैवविविधतेच्या अभ्यासक आहेत.)
8208287724