प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक २४ तास ‘मान्सून डिजास्टर कंट्रोल रूम’ सुरू
08-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Monsoon Help Center) मुंबईतील मान्सून काळात उद्भवणाऱ्या पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे आणि शॉर्ट सर्किट यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक ‘२४x७ मान्सून डिजास्टर कंट्रोल रूम’ सुरू करण्यात आली आहे. नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून ‘मदद का ठिकाणा - तेजिंदर सिंग तिवाना’ अभियानांतर्गत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या विशेष कंट्रोल रूमचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता मलाड लिंक रोड मेट्रो स्थानकाखालील महाराणा प्रताप गार्डनजवळ संपन्न झाले. भाजप मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी आणि माजी नगरसेविका जया सतनाम सिंग तिवाना यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युवा नेतृत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दूरदर्शी विचारांतून प्रेरणा घेऊन हा नागरिककेंद्रित उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभागातील पाणी साचण्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा ६ ठिकाणी अत्याधुनिक वाय-फाय आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याद्वारे कंट्रोल रूममधून परिसरावर रिअल-टाइम लक्ष ठेवले जाईल. समस्येचा वेळेपूर्वी अंदाज घेऊन मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाशी थेट समन्वय साधत तात्काळ कारवाई केली जाईल.
प्रभाग ४७ साठी स्वतंत्र, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची समर्पित टीम आणि आवश्यक यंत्रसामग्री २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे. "समस्या समजण्यापासून प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंतचा वेळ कमी करणे आणि नागरिकांना संकटकाळात सुरक्षिततेचा विश्वास देणे, हाच आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे," असे तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले. या उपक्रमामुळे मान्सून काळातील मदतकार्य अधिक जलद आणि प्रभावी होणार असून स्थानिक नागरिकांनी या सुविधेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.(Monsoon Help Center)