काशीत मांस कापण्यास मनाई; स्वच्छ काशीसाठी नगर निगमचे निर्णायक पाऊल; मांस विक्रीची दुकाने शहराबाहेर होणार स्थलांतरित

    08-Jun-2026
Total Views |
 
Varanasi Municipal Corporation Decision
 
 
मुंबई : (Varanasi Municipal Corporation Decision) उत्तर प्रदेशातील धार्मिक नगरी वाराणसीमध्ये (काशी) आता शहराच्या हद्दीत मांस, मासे आणि कोंबडी विक्रीची दुकाने चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही. या संदर्भातील महत्त्वपूर्ण प्रस्तावाला नगर निगमच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील सर्व मांस, मासे आणि कोंबडी विक्रीची दुकाने टप्प्याटप्प्याने नगर सीमेबाहेर विकसित करण्यात येणाऱ्या विशेष बाजारपेठांमध्ये स्थलांतरित केली जाणार आहेत.
 
नगर निगमच्या मते, ‘स्वच्छ काशी’ या उद्दिष्टासह शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात रामनगर, सूजाबाद, गणेशपूर, अवलेशपूर आणि शिवपूर या भागांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती आहे की, याठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा नियोजित मांस व मासळी बाजारपेठा उभारल्या जातील. व्यापाऱ्यांना या बाजारांमध्ये दुकाने वाटप करण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या बाजारांमध्ये स्वच्छता, सांडपाणी निचरा, वाहनतळ (पार्किंग) तसेच इतर आवश्यक सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात येईल.
 
 
नगर निगमचे मत आहे की, दाट लोकवस्तीच्या भागांतून अशा प्रकारची दुकाने बाहेर हलविल्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होईल आणि अनेक भागांतील वाहतूक कोंडीची समस्याही कमी होईल. नगर आयुक्त हिमांशु नागपाल यांनी सांगितले की, निवडलेल्या ठिकाणी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली असून ही योजना प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया लवकरच पुढे नेली जाणार आहे.(Varanasi Municipal Corporation Decision)
 
संतसमाजाकडून निर्णयाचे स्वागत
 
काशी विश्वनाथ मंदिराच्या दोन किलोमीटर परिसरात मांस व मासळी विक्रीवर बंदी घालण्याच्या वाराणसी नगर निगमच्या निर्णयाचे संतसमाजाने स्वागत केले आहे. अयोध्येतील संतांनी हा निर्णय धार्मिक स्थळांची पवित्रता जपण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगत अयोध्येतही अशाच प्रकारच्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
 
संत सीताराम दास महाराज यांनी वाराणसी नगर निगमच्या निर्णयाचे कौतुक करताना सांगितले की, काशी विश्वनाथाच्या पवित्रतेचे, पौराणिक महत्त्वाचे, शुद्धतेचे आणि सात्त्विकतेचे रक्षण करण्यासाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत प्रशंसनीय आहे. त्यांनी म्हटले की, सनातन धर्मात तीर्थक्षेत्रांच्या पवित्रतेला विशेष महत्त्व असून कोणत्याही धार्मिक कार्याच्या परिपूर्णतेसाठी त्यासंबंधित शुद्धता आवश्यक मानली जाते. काशीची पावनता कायम राखण्याच्या उद्देशाने उचललेले हे पाऊल संपूर्ण हिंदू समाज आणि साधू-संतांकडून स्वागतार्ह मानले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Varanasi Municipal Corporation Decision)