श्रद्धेला ‘पूर्णत्व’ देणारी तृप्ती

Total Views |
Faith Meets Environmental Service 
 
‘सम्पूर्णम् सेवा फाऊंडेशन’च्या माध्यमातून एक प्रेरणादायी चळवळ उभारणार्‍या अ‍ॅड. तृप्ती गायकवाड यांच्याविषयी...
 
एखादा सण-उत्सव संपला की, शहरातील रस्त्यांवर, नद्यांच्या पात्रात अनेकदा मूर्ती, देवतांची चित्रे आणि जुन्या फोटोफ्रेम्स आणि निर्माल्य दिसते. भक्तिभावाने घरात आणलेल्या या मूर्तींचे ही अवस्था अनेकदा आपल्याला व्यथित करते. पण यावर उपाय शोधण्याचे धाडस फारच थोडे जण करतात. नाशिकच्या अ‍ॅड. तृप्ती गायकवाड यांनी याकडे केवळ ‘पर्यावरणीय संकट’ म्हणून न पाहता, मूर्तींची आणि प्रतिमांची अवहेलना टाळत एका अभिनव सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
 
तृप्ती यांचे बालपण येवल्यात गेले. त्यांचे पुढील शिक्षण आणि संपूर्ण जडणघडण मात्र नाशिकमध्येच झाली. त्यांचे वडील श्रीकांत गायकवाड हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असल्याने सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम, पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता आणि समाजकार्याचा वारसा त्यांना घरातूनच लाभला. घरातूनच मिळालेल्या या संस्कारांमुळे, समाजातील समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाली. पुढे यातूनच ‘सम्पूर्णम् सेवा फाऊंडेशन’सारख्या अनोख्या उपक्रमाचा जन्म झाला.
 
२०१९ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गोदावरी नदी दुथडी भरून वाहात होती. अशावेळी पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी तृप्ती नदीकाठी गेल्या असता, त्यांना एक व्यक्ती देवतांच्या फोटोफ्रेम्स नदीत विसर्जित करताना दिसली तृप्ती यांनी त्यांना तसे करण्यपासून थांबवले. मात्र, त्या व्यक्तीकडे या वस्तू विसर्जनाचा दुसरा पर्यायही त्यावेळी नव्हता. त्याक्षणी तृप्ती यांनी फ्रेममधील लाकूड आणि काच वेगळी करुन, छापील चित्र पाण्यात विरघळवून त्याची योग्य प्रकारे व्यवस्था लावण्याचा सल्ला दिला.
 
हीच घटना तृप्ती यांच्या मनाला चटका लावून गेली. त्यांनी विचार केला की, जर आज आपण एका व्यक्तीला योग्य मार्ग दाखवत आपल्या देवतांचे योग्य विसर्जन करण्यात यशस्वी झालो; आता याच मुद्द्यावर समाजात बदल घडवून आणता येईल. यातूनच धार्मिक वस्तूंच्या पुनर्वापर आणि पुनर्चक्रण विषयाचा अभ्यास त्यांनी सुरू केला. प्लास्टिक, प्लास्टर ऑफ पॅरिस, धातू, लाकूड, वस्त्रे यांसारख्या विविध साहित्यांचे पुनर्चक्रण कसे करता येईल, याचा तृप्ती यांनी सखोल अभ्यास केला. त्यातूनच पुढे जुलै २०२१ मध्ये ‘सम्पूर्णम् सेवा फाऊंडेशन’आकाराला आले.
 
तृप्ती यांनी या संस्थेची स्थापना करून, धार्मिक वस्तूंना ‘सन्मानपूर्वक आणि पर्यावरणपूरक पूर्णत्व’ देण्याचा वसा घेतला आहे. त्यांच्या मते, भग्नावस्थेतील मूर्ती आणि जुन्या धार्मिक वस्तूंचे पुनर्चक्रण करणे म्हणजेच, त्यांना ‘पूर्णत्व’ प्रदान करणे होय!
सुरुवातीला त्यांनी याबाबत समाज माध्यमांतून लोकांना आवाहन केले. घरात पडून असलेल्या जुन्या मूर्ती, देवतांची चित्रे किंवा फ्रेम्स इतरत्र ठेवण्याऐवजी, आमच्याकडे जमा करण्याबाबतही त्यांनी लोकांना सांगितले. याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. नाशिकसह पुणे, मुंबई, नागपूर आणि देशातील अनेक शहरांतून, लोकांनी धार्मिक वस्तू पाठवण्यास सुरुवात केली.
 
आज परदेशातही कस्टम ड्युटी भरून, नागरिक देवतांच्या मूर्ती आणि पूजासाहित्याच्या व्यवस्थित विसर्जनास प्राधान्य देतात. या वस्तूंच्या पुनर्चक्रणासाठी तृप्ती यांनी अत्यंत संवेदनशील पद्धत अवलंबली. प्रत्येक मूर्ती किंवा धार्मिक वस्तूवर प्रक्रिया करण्यापूर्वी, त्यांची उत्तरपूजा केली जाते. त्यामुळे श्रद्धा आणि पर्यावरण यांचा सुंदर समन्वय साधला जातो. यासाठी वर्षातून चारवेळा विशेष मोहिमा घेतल्या जातात. प्रतिकिलो वजनावर या वस्तूंची किंमत ठरते. आज या संस्थेच्या माध्यमातून, घरोघरी जाऊनही या वस्तूंचे संकलन केले जाते.
 
‘सम्पूर्णम् सेवा फाऊंडेशन’च्या कार्यपद्धतीत नावीन्य आहे. प्लास्टिक आणि धातूच्या मूर्ती वितळवून, त्यापासून खेळण्यांची निर्मिती होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची भुकटी करून, त्यात सिमेंट मिसळत भटकी जनावरे व पक्षांसाठी खाद्यपात्रे तयार केली जातात. काही साहित्यांपासून पक्ष्यांची घरटीही होतात. सर्वांत विशेष म्हणजे, तयार झालेल्या खेळण्यांचे नाशिकच्या झोपडपट्ट्यांमधील गरजू मुलांना मोफत वाटपही होते.
 
एका बाजूला पर्यावरणाचे संरक्षण आणि दुसर्‍या बाजूला वंचित मुलांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्याचे कार्यामुळे, या उपक्रमाला व्यापक जनसमर्थन लाभले आहे. आजवर हजारो मूर्ती आणि फोटोफ्रेम्स पुनर्चक्रित करून, त्यांना नवजीवन देण्यात आले आहे. हजारो लोक या मोहिमेशी जोडले गेले असून, देशाबाहेरूनही दररोज धार्मिक वस्तू पाठवल्या जात आहेत.
 
तृप्ती यांनी ‘आरास’ या उपक्रमाद्वारे, महिला आणि ऑटिझम असलेल्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे, तृप्ती पेशाने वकील असून कौटुंबिक न्यायालयात पूर्ण वेळ वकिली करतानाही, त्या सामाजिक कार्यासाठी वेळ काढतात. आज पर्यावरण संवर्धनाबाबत चर्चा मोठ्या प्रमाणावर होते; परंतु तृप्ती यांनी चर्चेपलीकडे जाऊन कृतीचा आदर्श घालून दिला आहे. यामुळेच तृप्ती यांची कथा ही जबाबदारीची, सामाजिक बांधिलकीची आणि परिवर्तन घडवण्याच्या जिद्दीची कथा ठरते. समाजात बदल घडवण्यासाठी मोठ्या साधनांचीच नव्हे, तर मोठ्या विचारांचीही गरज असते, हेच तृप्ती यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. श्रद्धेचा सन्मान, पर्यावरणाचे संरक्षण आणि गरजूंना आधार देणारे त्यांचे कार्य भविष्यातही अनेकांना नवी दिशा देत राहील. तृप्ती यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा.




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.