तृणमूल काँग्रेसचा 'पुष्पा' जहांगीर खान अटकेत; एसटीएफने नेपाळ सीमेवरून घेतले ताब्यात

    08-Jun-2026   
Total Views |
Jahangir Khan
 
मुंबई : (Jahangir Khan) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान वादाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या ‘पुष्पा’ उर्फ जहांगीर खान याला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाने जहांगीर खान यास अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. फलता येथील हिंसाचार प्रकरणात त्याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
 
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फलता मतदारसंघातून जहांगीर खान तृणमूल काँग्रेसचा उमेदवार होता. निवडणुकीदरम्यान त्याच्यावर हिंसाचार घडवून आणणे आणि मतदारांना धमकावल्याचे आरोप झाले होते. निवडणुकीतील गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर या मतदारसंघात पुनर्मतदान घेण्यात आले आणि त्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला.
 
दरम्यान, जहांगीर खानचा पराभव झाला आणि तो चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. त्याच्याविरोधात फलता पोलीस ठाण्यात धमकावणे, खंडणी वसूल करणे, हिंसाचार, कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणे यांसह सात गुन्हे दाखल करण्यात आले होते. निवडणुकीनंतर तो फरार झाला होता आणि एसटीएफ त्याचा शोध घेत होती.
 
 
फलता परिसरातील त्याच्या वर्चस्वामुळे त्याला ‘पुष्पा’ या टोपणनावाने ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण परिसरात त्याची दहशत होती. एसटीएफला माहिती मिळाली होती की तो नेपाळमार्गे देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर सापळा रचून भारत-नेपाळ सीमेवर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या मते, जहांगीर खानची अटक ही मोठी यशस्वी कारवाई असून त्याची चौकशी केल्यानंतर राजकीय हिंसाचाराशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.(Jahangir Khan)
  
सुखेंदु शेखर रॉय यांचा राज्यसभा सदस्यत्वासह पक्षाचाही राजीनामा
 
बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका दिवसात दोन मोठे धक्के बसल्याचे दिसते आहे. जहांगीर खानची अटक आणि तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी दिलेला राज्यसभा सदस्यत्वासह पक्षाचा राजीनामा. सुखेंदु शेखर रॉय यांनी चार दिवसांपूर्वीच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. ४ जून रोजी त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील काही तृणमूल खासदार राजीनामा देऊ शकतात, असा दावा केला होता. त्यानंतर सर्वप्रथम स्वतः सुखेंदु शेखर रॉय यांनीच राजीनामा दिला.(Jahangir Khan)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक