शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’, बाजार उघडताच पाचशे अंकांनी घसरला! ‘हे’ आहे कारण

    08-Jun-2026
Total Views |

Sensex
 
 
मुंबई : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धसावटामुळे सोमवार, दि. ८ जून रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पाचशे अंकांनी घसरला. सध्या तो ७३,७०० अंकांवर होता. निफ्टीतही दोनशे अंकांची घसरण झाली. निफ्टी २३, २०० अंकावर कामगिरी करत होता. आठवड्याच्या सुरुवातीलाच आयटी, धातू आणि रिअल्टी शेअर्समध्ये घसरण नोंदविण्यात आली.
 
इराण-इस्त्रायल हल्ल्याचा परिणाम
 
एप्रिलमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पहिल्यांदाच इराणने इस्त्रायलवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने सोमवारी इराणच्या पश्चिमी आणि मध्य इराणच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. तेहरान, तबरीज आणि इस्फाहानमध्ये हल्ल्याचे वृत्त आहे. या कारणास्तव आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव आहे. इराण-इस्त्रायल हल्ल्यामुळे अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या शांतीवार्ता प्रस्तावालाही धक्का पोहोचला आहे.
 
सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी गडगडले
 
सकाळी ११ वाजताच्या सुरुवातीलाच, निफ्टी ५० १४८.३० अंकांनी घसरून २३,२१८.४० वर कामगिरी करत होता. सेन्सेक्स ४७१.२३ अंकांनी म्हणजेच ०.६३ टक्क्यांच्या घसरणीसह ७३,७२२.११ इतक्या पातळीवर पोहोचला.
 
मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांवरही दबाव
 
बाजारातील कमजोरी केवळ मोठ्या समभागांपुरती मर्यादित राहिली नाही. व्यापक बाजारातही विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक सुमारे 1.51 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 1.52 टक्क्यांनी घसरून व्यवहार करत होते. यामुळे गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता कमी झाल्याचे स्पष्ट झाले.
 
रिअल्टी आणि मेटल समभागांमध्ये सर्वाधिक घसरण
 
सेक्टरनुसार, रिअल्टी आणि धातू क्षेत्रातील शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दुसरीकडे, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स तुलनेने मजबूत राहिले आणि बाजारातील एकूण घसरणीच्या पार्श्वभूमीवर चांगली कामगिरी करताना दिसले.

 
आयपीओ बाजारात राहणार हालचाल
 
प्राथमिक बाजारातही गुंतवणूकदारांचे लक्ष अनेक आयपीओंकडे लागले आहे. हेक्सागन न्यूट्रिशन आयपीओ दुसऱ्या दिवशीही गुंतवणूकदारांसाठी खुला असून, कंपनी या इश्यूद्वारे १३८.८७ कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. ‘जेनएक्सएआय अॅनालिटिक्स’ आयपीओ देखील दुसऱ्या दिवशी खुला राहणार आहे. कंपनीचे उद्दिष्ट प्राथमिक बाजारातून ५४. ८४ कोटी रुपये उभारण्याचे आहे. वाह केमिकल्स आणि यूएचएम वेकेशन आयपीओसाठी बोली लावण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या दोन्ही कंपन्यांच्या इश्यूचा आकार अनुक्रमे १३.४५ कोटी रुपये आणि ३६.०२ कोटी रुपये आहे. एकूणच, शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम असताना गुंतवणूकदारांचे लक्ष प्राथमिक बाजारातील नव्या आयपीओंकडेही केंद्रित राहणार आहे.