‘सबका साथ, सबका विकास’ची तपपूर्ती

    08-Jun-2026
Total Views |
 
Twelve Years of the Modi Government
 
‘सबका साथ, सबका विकास’ही मोदी सरकारची ओळख झाली आहे. प्रत्येक समाजाला विकासाची समान संधी देतानाच, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे कार्य मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांमध्ये केले. यामुळेच, आज देशातील प्रत्येक समाज ‘विकसित भारत’ संकल्पनेशी जोडला गेला आहे. मुस्लीम समाजासाठी मोदी सरकारने केलेल्या कार्याचा तपपूर्तीच्या निमित्ताने घेतलेला आढावा...
 
भारताच्या लोकशाही इतिहासात गेल्या १२ वर्षांचा काळ हा परिवर्तन, विकास आणि आत्मविश्वासाचा काळ म्हणून ओळखला जातो. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची धुरा स्वीकारल्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र केवळ घोषवाय न राहता, तो शासनव्यवस्थेचा पाया झाला. आज मोदी सरकारची यशस्वी १२ वर्षे पूर्ण होत असताना, देश एका नव्या युगात प्रवेश करत असल्याची भावना सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. या १२ वर्षांच्या कालखंडात, भारताने अनेक क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व प्रगती केली. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, परराष्ट्र धोरण, संरक्षण, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या प्रत्येक क्षेत्रात मोदी सरकारने ठोस निर्णय घेत, देशाला नव्या उंचीवर नेले. एकेकाळी ‘विकसनशील देश’ म्हणून ओळखला जाणारा भारत, आज जगातील प्रभावशाली राष्ट्रांच्या यादीत आत्मविश्वासाने उभा आहे.
 
मोदी सरकारच्या कार्यकाळातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेल्या योजना. ‘जनधन योजना’, ‘उज्ज्वला योजना’, ‘आयुष्मान भारत’, ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘किसान सन्मान निधी’ यांसारख्या योजनांमुळे गरीब, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांना थेट लाभ मिळाला. शासनाची मदत थेट नागरिकांच्या खात्यात पोहोचविण्याची व्यवस्था निर्माण करून, भ्रष्टाचारावरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणण्यात आले. ‘डिजिटल इंडिया मोहिमे’मुळे, भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठीच झेप घेतली. गावागावांत इंटरनेट पोहोचले, ऑनलाईन व्यवहार वाढले आणि आज भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणार्‍या डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. ‘कोविड’ महामारीसारख्या कठीण काळातही, भारताने जगासमोर सक्षम नेतृत्वाचे उदाहरण ठेवले. मोफत लसीकरण, गरिबांना अन्नधान्य वितरण आणि आरोग्य व्यवस्थेतील सक्षम नियोजनामुळे देशाने या कठीण संकटावरही मात केली.
 
एक मुस्लीम समाजातील कार्यकर्ता म्हणून मला विशेष अभिमान वाटतो की, मोदी सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम महिलांना ‘तिहेरी तलाक’सारख्या अन्यायकारक प्रथेतून मुक्त करण्याचा घेतलेला निर्णय, हा महिलांच्या सन्मानासाठीचा ऐतिहासिक निर्णयच होता. शासनाच्या अनेक योजनांचा लाभ आज मुस्लीम समाजातील युवक, महिला आणि गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे विकासाच्या राजकारणात, धर्मापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी नवी विचारधारा देशात बळकट होताना दिसते. भारतीय जनता पक्षानेदेखील, संघटनात्मक पातळीवर देशभरात सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिली. त्यामुळेच बूथ स्तरापासून, राष्ट्रीय स्तरापर्यंत पक्षाची मजबूत यंत्रणा उभी राहिली आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून, भाजपने जनतेमध्ये विश्वास निर्माण केला. आज अनेक तरुण देशसेवेच्या भावनेने भाजपशी जोडले जात आहेत, हीच पक्षाच्या कार्यपद्धतीची मोठी शक्ती आहे.
 
मोदी सरकारची ही १२ वर्षांची तपपूर्ती केवळ सत्तेचा उत्सव नसून, राष्ट्रनिर्माणासाठी केलेल्या अथक परिश्रमांचा गौरव आहे. देशहित सर्वोच्च मानून घेतलेले निर्णय, गरिबांच्या कल्याणासाठी असलेली बांधिलकी आणि ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी सुरू असलेली धडपड, यांमुळेच पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व जनमानसांत अधिक दृढ झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मुस्लीम समाजाशी संवाद वाढवण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘सूफी संवाद अभियान’च्या माध्यमातून, तसेच ‘सौगात-ए-मोदी’सारखे उपक्रम, सामाजिक एकात्मतेचे प्रभावी उदाहरण ठरले. या उपक्रमांमुळे मुस्लीम कुटुंबांच्या मनात विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली.
‘सूफी परंपरा’ ही प्रेम, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा मानली जाते. या विचारांना प्रोत्साहन देत, मोदी सरकारने समाजातील सलोखा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. ‘सौगात-ए-मोदी’ उपक्रमाच्या माध्यमातून, गरीब आणि गरजू मुस्लीम कुटुंबांपर्यंत मदतीचा हातही पोहोचविण्यात आला. त्यामुळे शासन हे केवळ एका समाजासाठी नसून, सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असल्याचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला. आज अनेक मुस्लीम युवक आणि कुटुंबे विकास, शिक्षण आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करू लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा संदेश, प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे. त्यामुळेच भारत हा विविधतेत एकता जपणारा आणि सर्व धर्मांना समान सन्मान देणारा देश असल्याचे, पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
 
मुस्लीम समाजातील तरुण पिढी आज शिक्षण, रोजगार, उद्योग आणि डिजिटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनांमुळे, अनेक युवकांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली. ‘मुद्रा योजना’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ यांसारख्या उपक्रमांमुळे छोट्या व्यवसायांना चालना मिळाली असून, मुस्लीम समाजातील अनेक युवक उद्योजकतेकडेही वळताना दिसत आहेत. विकासाच्या या नव्या प्रवाहामुळे समाजात आत्मविश्वास वाढला आहे. मोदी सरकारने देशातील महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले. मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी घेतलेला ‘तिहेरी तलाक’विरोधातील निर्णय, हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला. अनेक मुस्लीम महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि शासनाने महिलांच्या सन्मानासाठी घेतलेली भूमिका देशभरात चर्चेचा विषय ठरली. आज मुस्लीम समाजातील महिला शिक्षण, रोजगार आणि सामाजिक क्षेत्रात अधिक सक्षमपणे पुढे येताना दिसत आहेत.
 
केंद्र सरकारने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना, कौशल्य प्रशिक्षण आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या. मदरसा आधुनिकीकरणासोबतच, आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्नही करण्यात आले. त्यामुळेच मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांमध्ये, स्पर्धात्मक शिक्षणाबाबत जागरूकता वाढली असून, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची भावनाही अधिक दृढ होत आहे. आज देशातील सामान्य नागरिकांच्या मनात ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना अधिक मजबूत झाली आहे. जातिधर्माच्या राजकारणापेक्षा विकास, सुरक्षा आणि स्थिर नेतृत्वाला प्राधान्य देणारा मतदार निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील विविध समाजघटकांचा वाढता विश्वास, हेच या परिवर्तनाचे मोठे उदाहरण आहे.
 
आगामी काळात ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करण्यासाठी, समाजातील प्रत्येक घटकाची साथ आवश्यक आहे. सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वसमावेशक विकास या तत्त्वांवर भारत अधिक वेगाने प्रगती करेल, असा विश्वास आज देशातील कोट्यवधी नागरिकांच्या मनात आहे. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील निर्यणाने, या विश्वासाला अधिक दृढ केले आहे.
 
एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला विश्वास आहे की, आगामी काळातही भारत विकास, सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे जाईल आणि ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न निश्चितच साकार होईल.
 
- आबिद अली यासीन चौधरी