साधी राहणी, उच्च विचार, कार्यकर्त्यांविषयी अपार आत्मीयता आणि वनवासी बांधवांच्या उन्नतीसाठी समर्पित जीवन यामुळे कै. रामचंद्र गोविंद (रामभाऊ) ताम्हाणे हे महाराष्ट्रातील सामाजिक आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान बनले.
रामभाऊंचे मूळ गाव पनवेल असले तरी त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरचा. त्यांचे वडील रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून कार्यरत होते. नोकरी स्थिर असली तरी घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अशा परिस्थितीतही शिक्षण आणि स्वावलंबनाचा ध्यास त्यांनी कायम ठेवला. सन १९३३ मध्ये शिक्षण आणि उपजीविकेच्या शोधात ते कल्याण येथे आले. त्यांच्या मनात वास्तुविशारद होण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतले. दळणवळण खात्यात नोकरी करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नोकरी करत असताना सचोटी, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांमुळे त्यांनी अनेकांना प्रेरित केले.
कल्याणमध्ये आल्यानंतर १९४१ पासून त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निकटचा संबंध आला. संघकार्याची विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या. संघाच्या कार्यातून समाजसेवेची प्रेरणा मिळालेल्या रामभाऊंनी पुढे आपले संपूर्ण आयुष्य वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यासाठी वाहून घेतले. साठ वर्षांहून अधिक काळ ते वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यात अक्षरशः बुडालेले होते. महाराष्ट्रातील अनेक वनवासी केंद्रांच्या उभारणीत त्यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम मोलाचे ठरले. यावल, कोठिंबे, डोंबिवली पूर्व, भंडारदरा यांसारखी अनेक केंद्रे त्यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली विकसित झाली.
रामभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील एक विशेष गुण म्हणजे त्यांची आत्मीयता. त्यांच्या आईची इच्छा होती की त्यांना पूजनीय श्रीगुरुजी यांचे दर्शन घडावे. रामभाऊंनी कल्याण रेल्वे स्थानकावर श्रीगुरुजींच्या प्रवासादरम्यान ही भेट घडवून आणली. ही घटना त्यांच्या कुटुंबवत्सल आणि संस्कारक्षम स्वभावाची साक्ष देते. स्वतःचे राहते घर 'सुनिकेतन' आणि त्याभोवतालची सुंदर बाग त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाला समर्पित केली. केवळ वेळ किंवा श्रमच नव्हे तर स्वतःची संपत्तीही समाजकार्यासाठी अर्पण करण्याची वृत्ती दुर्मीळ असते. रामभाऊंनी ती कृतीतून दाखवून दिली.
ते भारतमाता पूजन समारोह समितीच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्षही होते. समाजातील विविध संस्था, व्यक्ती आणि कार्यकर्त्यांना जोडण्याचे विलक्षण कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था वनवासी कल्याण आश्रमाशी जोडल्या गेल्या. सडपातळ शरीरयष्टी, शुभ्र सदरा, धोतर, डोळ्यांवर चष्मा, हातात काठी आणि रस्त्यावरून भरभर चालणारे रामभाऊ हे दृश्य डोंबिवली-कल्याण परिसरातील अनेकांच्या स्मरणात आजही जिवंत आहे. त्यांची साधी राहणी हीच त्यांची खरी ओळख होती.
रामभाऊ स्वतः एक कुशल वास्तुविशारद होते. मात्र त्यांचे खरे कार्यक्षेत्र होते वनवासी समाजाचे उत्थान. वनवासी कल्याण आश्रमाचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. आश्रमाच्या कार्यासाठी ते सतत प्रवास करत असत. विविध केंद्रांना भेटी देणे, नवीन उपक्रम सुचविणे, प्रकल्पांसाठी निधी उभा करणे, दानशूर व्यक्तींना भेटणे, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन करणे अशा असंख्य कामांमध्ये त्यांचा दिवस व्यतीत होत असे. निधी संकलनातील त्यांची पारदर्शकता विशेष उल्लेखनीय होती. एखाद्या प्रकल्पासाठी मिळालेला निधी कसा वापरला गेला, प्रकल्पाची प्रगती किती झाली, त्याची छायाचित्रे यासह संपूर्ण माहिती ते पत्राद्वारे निधी देणाऱ्या व्यक्तींना पाठवत असत. त्यामुळे त्यांच्या कार्यावर समाजाचा अपार विश्वास निर्माण झाला.
रामभाऊंच्या नियोजनक्षमतेचा आणि कार्यपद्धतीचा उपयोग संघपरिवारातील ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे तसेच भास्करराव कळंबी यांनीही प्रभावीपणे करून घेतला. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे अनेक योजना यशस्वी झाल्या. वनवासी क्षेत्रात काम करताना त्यांनी वनवासी बांधवांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. वनवासी समाज ही राष्ट्राची मोठी शक्ती आहे; त्यांच्या गुणांचा आणि परंपरांचा सन्मान केला पाहिजे, असे ते नेहमी सांगत. दुर्गम डोंगरदऱ्यांतील वनस्पती, औषधी वनौषधी आणि स्थानिक ज्ञान यांचा त्यांना विशेष अभ्यास होता. वनवासी समाजाच्या जीवनशैलीतील सकारात्मक पैलू समाजासमोर आणण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.
रामभाऊंनी संपूर्ण आयुष्य व्रतस्थपणे जगले. त्याग, निष्ठा आणि सेवाभाव हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ होते. त्यामुळेच ते अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत बनले. जीवनाच्या उत्तरार्धात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांची प्रकृतीही खालावत गेली. डॉ. खटकुळ यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी आपले मृत्युपत्र तयार केले. आपल्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेचे दान वनवासी कल्याण आश्रमाला करून त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या विचारांची अंतिम साक्ष दिली. २५ सप्टेंबर २००३ रोजी रामभाऊंचे निधन झाले.
मात्र त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि वनवासी समाजासाठी त्यांनी केलेले योगदान आजही अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे. कै. रामभाऊ ताम्हाणे हे केवळ एक कार्यकर्ते नव्हते; ते एक चालते-बोलते संस्कारकेंद्र होते. त्यांनी आयुष्यभर जपलेला सेवाभाव, समाजनिष्ठा आणि राष्ट्रकार्याची तळमळ हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख आहे.