राष्ट्रवादीची राज्यसभा उमेदवारी मिळविलेले राजेंद्र जैन कोण आहेत ?

    08-Jun-2026
Total Views |
Rajendra Jain
 
मुंबई : (Rajendra Jain) राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. याबाबतची घोषणा रविवार दि. ७ रोजी रात्री राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. २००४ ते २०१६ पर्यंत राजेंद्र जैन भंडारा - गोंदिया या मतदार संघातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विधानपरिषद आमदार होते.
 
खासदार प्रफुल्ल पटेल यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात तसेच प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे.पूर्व विदर्भ आणि गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एक वजनदार नेते आहेत.
 
"पक्षाने मला राज्यसभेवर जाण्याची जी संधी दिली ती फार गौरवाची गोष्ट असून छगन भुजबळ हे मला वडिलांसारखे आहेत. त्यांचा मला आशीर्वाद असून आमच्यातील नाराजीचा कुठेही प्रश्न नाही." अशी प्रतिक्रिया राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांनी सोमवार दि.८ रोजी दिली.
 
 
भंडारा - गोंदिया या पटेल यांचे वर्चस्व असलेल्या भागात राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी पक्ष बळकटीचे काम केले आहे. तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी जवळपास २५ वर्षे भूषविले असून गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले आहे.राज्यसभेच्या जागेसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील इच्छुक होते पण त्यांनी काही अटी घातल्या होत्या.
 
ज्यात पुतणे समीर भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन आणि मंत्रीपद अशी प्रमुख अट होती असे बोलले जाते. तसेच मध्यंतरी खासदार पार्थ पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील टेंडर वॉर सुद्धा चर्चेत होते.पण शेवटी राजेंद्र जैन यांनी बाजी मारली.(Rajendra Jain)