नवी मुंबई विमानतळामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी; नवी मुंबई विमानतळावर नोकरीच्या संधी; प्रकल्पग्रस्त युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण

Total Views |
Airport Jobs India
 
नवी मुंबई : (Airport Jobs India) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमुळे परिसराच्या विकासाला नवी गती मिळत असताना, या प्रकल्पाचा थेट लाभ स्थानिक युवकांनाही मिळावा यासाठी सिडकोने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रकल्पग्रस्त युवक-युवतींना विमानतळ आणि विमानवाहतूक क्षेत्रातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
 
सिडकोने महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला असून, विमानतळाशी संबंधित विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून स्थानिक युवकांना आधुनिक उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्ये प्राप्त करून रोजगारक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
विमानतळ क्षेत्रातील करिअरसाठी सुवर्णसंधी
 
या प्रशिक्षणामध्ये ग्राहक सेवा कार्यकारी, एअरलाईन्स बॅगेज हँडलर, विमानतळ टर्मिनल ऑपरेशन्स, कार्गो ऑपरेशन्स तसेच ग्राउंड स्टाफ यांसारख्या पदांसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. वाढत्या विमानवाहतूक उद्योगामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याने युवकांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.(Airport Jobs India)
 
तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत
 
प्रकल्पग्रस्त युवकांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असून, प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना या संधींसाठी तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.
 
विकासाचा लाभ थेट स्थानिकांपर्यंत
 
मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे होणाऱ्या विकासाचा लाभ प्रकल्पग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या नव्या दालनांमध्ये स्थानिक युवकांचा सहभाग वाढावा यासाठी कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे.
 
नोंदणीसाठी संपर्क
 
इच्छुक प्रकल्पग्रस्त युवक-युवतींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करून अधिक माहितीसाठी मेर्सर्स विपा स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सेक्टर-1, न्यू पनवेल (पूर्व), नवी मुंबई येथे संपर्क साधावा. तसेच 7021752324 या मोबाईल क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क करून अधिक माहिती मिळवता येईल.(Airport Jobs India)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.