निसर्ग पर्यटन विकासासाठी ४८.४० हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याला यश

    08-Jun-2026
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) नागपूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने निसर्ग पर्यटन विकासासाठी विशेष प्राधान्य दिले असून ४८.४० हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात निसर्ग पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार आहे.
 
यामध्ये नौजा बेल्लोरी (खु.) येथील सर्व्हे क्रमांक ८१ मधील ३०.४० हेक्टर आर क्षेत्र तसेच चांपा येथील सर्व्हे क्रमांक ११६ (पहाड खडक) मधील १८.०० हेक्टर आर क्षेत्राचा समावेश आहे. सदर जमीन उपवनसंरक्षक, नागपूर वन विभाग, नागपूर यांच्या नावे भोगवटा मूल्यरहित व महसूलमुक्त स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे.
 
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे या जमिनी वनविभागाकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
शासनाच्या आदेशानुसार संबंधित संस्था ही जमीन भोगवटादार वर्ग-२ या अधिकाराने धारण करणार आहे. महसूल विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन विकणे, गहाण ठेवणे, बक्षीस देणे अथवा तिचे पोट-विभाजन करणे प्रतिबंधित राहणार आहे. तसेच जमिनीचा वापर केवळ निसर्ग पर्यटन विकासासाठीच करणे बंधनकारक राहील.
 
 
जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत निसर्ग पर्यटन प्रकल्प कार्यान्वित करणे आवश्यक असून, सर्व विकासकामे स्थानिक नियोजन प्राधिकरणाच्या नियमांनुसार आणि संबंधित शासकीय विभागांच्या पूर्वपरवानगीनेच करावी लागतील. अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास सदर जमीन शासनजमा करण्याचा अधिकार सरकारकडे सुरक्षित राहील. (Chandrashekhar Bawankule)
 
या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षमता वाढण्यास मदत होणार असून, पर्यावरण संवर्धनासह स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. (Chandrashekhar Bawankule)