गणेशोत्सवापूर्वी पालिकेची तयारी; विसर्जन स्थळांवर 'मरीन नॅव्हिगेशन बॉयज' आणि सोलर दिव्यांची व्यवस्था
08-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Civic News) मुंबईतील आगामी गणेशोत्सव आणि इतर सणां दरम्यान समुद्रातील विसर्जन स्थळांवर भाविक तसेच जीवरक्षकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विसर्जनाच्या वेळी समुद्रातील पाण्याचा अंदाज यावा आणि दुर्घटना टळाव्यात, यासाठी ओहोटीच्या रेषेवर 'मरीन नॅव्हिगेशन बॉयज' (समुद्री मार्गदर्शक तरंगते गोळे) आणि सौर कंदील (सोलर लँटर्न) बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेने याच्यावर तात्काळ काम सुरू केले आहे. या यंत्रणेचा पुरवठा करणे, देखरेख ठेवणे आणि विसर्जन प्रक्रियेनंतर ती काढणे या ३ वर्षांच्या कंत्राटासाठी पालिकेच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने ऑनलाईन ई-निविदा मागविल्या आहेत. (Mumbai Civic News)
गणेशोत्सवात चौपाट्यांवर आणि विसर्जन स्थळांवर लाखो भाविकांची गर्दी होते. अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा भरती-ओहोटीच्या काळात समुद्रातील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडण्याचा धोका असतो. समुद्रात बसवले जाणारे हे 'मरीन नॅव्हिगेशन बॉयज' विसर्जन कक्षाची आणि ओहोटीच्या रेषेची अचूक सीमा दर्शवतील.
त्यामुळे भाविकांना सुरक्षिततेची मर्यादित रेषा सहज ओळखता येईल. तसेच यावर बसवले जाणारे रात्री चमकणारे अत्याधुनिक सोलर दिवे काळोखातही विसर्जन करणाऱ्या कार्यकर्त्यांना, पालिकेच्या यंत्रणेला आणि नौकांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करतील. आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षकांना आणि नौदलाच्या बोटींना विसर्जन क्षेत्रात गस्त घालणे यामुळे अधिक सोपे होणार आहे.
या कामासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ मे २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक कंत्राटदारांना १६ जून पर्यंत आपले अर्ज सादर करता येतील. या संदर्भातील सविस्तर अटी व शर्ती महाराष्ट्र सरकारच्या आणि पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कंत्राटदारांनी अधिक माहितीसाठी घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर गॅरेज इमारतीमधील पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. (Mumbai Civic News)