मुंबई : (Madhya Pradesh Transgender Community) मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील ब्यावरा शहरात पहिल्यांदाच किन्नर समाजाच्या वतीने भव्य आणि ऐतिहासिक किन्नर महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील वल्लभा परिसरात पार पडलेल्या या धार्मिक व सामाजिक मेळाव्यात देशभरातून किन्नर महामंडलेश्वर आणि संत सहभागी झाले होते. ५० हून अधिक किन्नरांनी केलेली घरवापसी हा या महासंमेलनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.
या बहुआयामी कार्यक्रमात पट्टाभिषेक, भव्य शोभायात्रा तसेच विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. भोपाळच्या जगद्गुरू काजल ठाकुर माँ यांच्या सान्निध्यात राजगड तसेच इतर शहरांतून आलेल्या ५० हून अधिक किन्नरांची विधीवत शुद्धीकरण करून सनातन धर्मात घरवापसी करण्यात आली.
घरवापसीच्या या धार्मिक विधीनंतर ब्यावरा शहरात पारंपरिक उत्साहात आणि वाद्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील नागरिकांनी विविध ठिकाणी या मिरवणुकीचे उत्साहाने स्वागत केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन राजगडच्या किन्नर गुरु माँ मीना नायक तसेच त्यांच्या सहकारी रूपाली, जन्नत, माधुरी आणि तुळसी नायक यांनी यशस्वीपणे सांभाळले.(Madhya Pradesh Transgender Community)
या ऐतिहासिक प्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जगद्गुरू काजल ठाकुर माँ यांनी स्पष्ट केले की, त्यांचा उद्देश कोणत्याही धर्माचा विरोध करणे नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, किन्नर समाजाचे ध्येय राजकारण करणे किंवा संपत्ती गोळा करणे नसून समाजसेवा आणि धर्मरक्षण हेच आहे.(Madhya Pradesh Transgender Community)
या संपूर्ण कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे जगातील दुसऱ्या किन्नर भागवत कथावाचिका हेमलता माँ कंठस्थ यांच्या श्रीमुखातून सुरू असलेले श्रीमद्भागवत कथावाचन. ही कथा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात भोपाल, उज्जैन, इंदूर, नागपूर, जबलपूर, अमरावती आणि सागर आदी ठिकाणांहून आलेले महामंडलेश्वर आम्रपाली माँ, संगीता माँ, गोलू माँ, मुस्कान माँ यांच्यासह किन्नर अखाड्याचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक