लाटांशी लढणारे ‌‘हिरवे योद्धे‌’

    08-Jun-2026
Total Views |

महाराष्ट्रातील कांदळवने ही हवामानबदलाच्या परिणामांविरुद्धची पहिली संरक्षणरेषा. परंतु, समुद्रपातळीतील वाढ, क्षारता वाढ, चक्रीवादळे आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे कांदळवनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यानिमित्ताने हवामानबदलाशी लढणाऱ्या या ‌‘हिरव्या योद्ध्यां‌’विषयी माहिती देणारा हा लेख...

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली आपली स्वप्नांची नगरी मुंबई आणि पुढे विस्तीर्ण पसरलेली कोकणपट्टी. एका बाजूला अथांग पसरलेला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला वेगाने धावणारी, कधीही न थांबणारी मुंबई महानगरातील जीवनशैली. पण, जेव्हा याच समुद्रात ‌‘निसर्ग‌’ किंवा ‌‘तौक्ते‌’सारखी भयंकर चक्रीवादळे अचानक उभी राहतात किंवा मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात अचानक अवकाळी पावसाचे काळेकुट्ट ढग दाटून येतात, तेव्हा आपल्याला हवामानबदलाची (Climate Change) खरी धडकी भरते. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची वाढणारी पातळी आणि निसर्गाचा पूर्णपणे बिघडलेला समतोल आता केवळ आंतरराष्ट्रीय परिषदांमधील किंवा विज्ञानाच्या पुस्तकातील विषय राहिलेला नाही; तर तो थेट आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. या बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या पाणीपातळीचा सर्वांत पहिला आणि मोठा फटका किनारपट्टीवरील आपल्या स्थानिक कोळी बांधवांना आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला बसतो. अशा या अस्मानी संकटात, समुद्रात बांधलेल्या कोणत्याही सिमेंटच्या महाकाय भिंतीपेक्षा किंवा टेट्रापॉड्सपेक्षा आपल्याला गेली अनेक दशके कोणी निस्वार्थपणे वाचवले असेल, तर ती आहे, किनाऱ्यावरील चिखलात अत्यंत शांतपणे उभी असलेली आपली ‌‘खारफुटी‌’ (Mangroves). ही कथा आहे, त्या अदृश्य, निस्वार्थ आणि कणखर हिरव्या सैनिकांची, जे रोज समुद्राच्या खऱ्या-खोट्या लाटांशी दोन हात करतात.

अलीकडच्या काळातील जागतिक आधुनिक संशोधनाने आणि अनेक वैज्ञानिक प्रबंधांनी खारफुटीचे एक अत्यंत थक्क करणारे आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे रूप जगासमोर आणले. आपण आजवर फक्त जमिनीवरील जंगलांना ‌‘पृथ्वीची फुप्फुसे‌’ मानत आलो. पण, खारफुटीची जंगले ही त्याहूनही कितीतरी पटींनी अधिक शक्तिशाली आहेत. विज्ञानाच्या आणि पर्यावरणशास्त्राच्या भाषेत सांगायचे, तर जमिनीवरील कोणत्याही सामान्य आणि घनदाट जंगलापेक्षा खारफुटीची झाडे वातावरणातील घातक कार्बन डायऑक्साईड चार ते पाच पटींनी अधिक वेगाने शोषून घेतात. एवढेच नाही, तर हा शोषलेला कार्बन ती हजारो वर्षांसाठी आपल्या मुळांच्या खालील खोल मातीत साठवून ठेवतात. या अद्भुत नैसर्गिक प्रक्रियेला ‌‘ब्ल्यू कार्बन‌’ असे म्हटले जाते. यासोबतच तितक्याच पटीने जास्त प्राणवायूदेखील ती आपल्याला देतात. वैज्ञानिक अभ्यासानुसार, खारफुटी केवळ वादळांचा वेग 70 ते 80 टक्क्यांनी कमी करत नाही, तर ती हवामानबदलावरील सर्वांत प्रभावी ‌‘निसर्गाधारित उपाययोजना‌’ (Nature-based Solutions - NbS) आहे. खारफुटीची गुंतागुंतीची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे किनाऱ्यांची धूप थांबते. हे चिखलाचे साम्राज्य हजारो मासे, खेकडे आणि जलचरांसाठी हक्काचे प्रजनन केंद्र असते. एकप्रकारे, ही झाडे आपल्याला कोट्यवधी रुपयांची पर्यावरणीय आणि आर्थिक सेवा (Ecosystem Services) अगदी मोफत देत आहेत.

खारफुटीचे हे अफाट वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि भौगोलिक महत्त्व ओळखून तिच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्यात आपले महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. देशातील पहिला स्वतंत्र आणि समर्पित ‌‘कांदळवन कक्ष‌’ (Mangrove Cell) स्थापन करण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राने घेतला. एवढेच नव्हे, तर सरकारी जमिनीवरील सर्व खारफुटीला ‌‘राखीव वने‌’ (Reserve Forest) म्हणून कायदेशीर दर्जा देत, तिला वनकायद्याचे कडक संरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. याच सकारात्मक आणि प्रशासकीय दूरदृष्टीच्या धोरणाचा एक अत्यंत सुंदर परिणाम आपण ठाण्याच्या खाडीत पाहू शकतो. या खाडीचे पर्यावरणीय महत्त्व ओळखून तिला देशातील पहिले ‌‘फ्लेमिंगो अभयारण्य‌’ म्हणून घोषित करण्यात आले. आज याच ठाणे खाडीला ‌‘रामसर स्थळ‌’ असा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

मात्र, निसर्गसंवर्धनाची ही अभिमानाची गोष्ट सांगत असतानाच, आपण एका अत्यंत कठीण, नाजूक आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या वास्तवाच्या वळणावर उभे आहोत. एकीकडे आपण संवर्धनाचा आदर्श ठेवतो, तर दुसरीकडे प्रशासनाचा गोंधळ उडताना दिसतो. याच महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली ‌‘खारफुटी‌’ नामक या अमाप संपत्तीचे दहन होत आहे. आपली शहरे वेगाने वाढत आहेत, लोकसंख्या विस्तारत आहे आणि रोजच्या जीवघेण्या वाहतुककोंडीतून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला आधुनिक पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. वेगाने धावणाऱ्या जगासोबत चालण्यासाठी विकासाची चाके थांबवून चालणार नाही. पण, नुकतेच मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतुककोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी ‌‘वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड‌’ या भव्य प्रकल्पासाठी सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 45 हजार खारफुटीची झाडे तोडण्यास कायदेशीर परवानगी दिली आहे.

हा निर्णय एक अत्यंत मार्मिक आणि गंभीर प्रश्न उभा करतो. वाहतुककोंडी सोडवणे, इंधन वाचवणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे, हे शहराच्या प्रगतीसाठी नक्कीच महत्त्वाचे आहे. पण, ज्या खारफुटीने कित्येक दशके, किंबहुना शतके, अखंडपणे उभे राहून या शहराला पुरापासून आणि वादळांपासून आपल्या कुशीत सुरक्षित ठेवले, तिचे हे अमूल्य योगदान आपण एका पायाभूत प्रकल्पासाठी इतक्या सहज कसे विसरू शकतो? 45 हजार झाडे ही केवळ एक कागदावरील संख्या नाही, तर ती एक जिवंत परिसंस्था आहे. ही झाडे नष्ट झाल्यास आसपासच्या सखल भागात पुराचा धोका अनेक पटींनी वाढेल. मुंबईसारख्या बेटावर, जिथे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दरवष भेडसावते, तिथे या नैसर्गिक स्पंजचा बळी देणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आज हे ‌‘हिरवे योद्धे‌’ स्वतःच्याच अस्तित्वासाठी मानवी विकासाशी एक अत्यंत विषम संघर्ष करत आहेत.

जेव्हा आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाने दिलेली ही हक्काची ढाल तोडतो, तेव्हा आपण शाश्वत विकासाच्या मूळ तत्त्वालाच कुठेतरी छेद देत असतो. निसर्गाचा समतोल आणि विकास यांच्यातील हा संघर्ष अत्यंत विषम आहे; कारण यात निसर्गाचा आवाज नेहमीच मूक राहतो. येथे आपला उद्देश कोणालाही चुकीचे ठरवण्याचा किंवा केवळ विकास प्रकल्पांवर दोषारोप करण्याचा नक्कीच नाही. मानवी प्रगती आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या शत्रू नसून, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज जगातील अनेक विकसित शहरे निसर्गाला सोबत घेऊन पायाभूत सुविधा उभारत आहेत. आपणही असे आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरले पाहिजे, ज्यामुळे खारफुटीच्या मुळांना हानी पोहोचणार नाही आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित होणार नाही.

मनात एक अत्यंत प्रबळ आणि सकारात्मक आशा आहे की, भविष्यात जेव्हा असे महाकाय प्रकल्प आखले जातील, तेव्हा आपले सन्माननीय सर्वोच्च न्यायालय, देशाचे धोरणकर्ते आणि शहर नियोजक ‌‘हवामानबदलाचे भीषण वास्तव‌’ अधिक गांभीर्याने लक्षात घेतील. कोणताही पूल किंवा रस्ता कितीही भव्य असला, तरी तो निसर्गाने दिलेल्या ‌‘सुरक्षा कवचा‌’ची जागा कधीच घेऊ शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण विकास आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे साध्य करू शकतो. प्रगतीची आणि विकासाची स्वप्ने साकारताना आपल्या किनाऱ्यांवर उभ्या असलेल्या या ‌‘हिरव्या सैनिकां‌’चा नाहक बळी जाणार नाही, याचीही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, जोपर्यंत किनारपट्टीवर खारफुटीची ती अदृश्य आणि अभेद्य भिंत भक्कम उभी आहे, तोपर्यंतच आपली शहरे, आपली गावे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे!

- डॉ. शीतल पाचपांडे
(लेखिका कांदळवन अभ्यासिका आहेत.)