इंडिया आघाडीची बैठक, पण प्रमुख मित्रपक्षच गैरहजर; विरोधकांची एकजूट उघडी पडली : नवनाथ बन
08-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Maharashtra Politics) भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करत विरोधकांची एकजूट केवळ दिखावा असल्याचा दावा केला.अनेक प्रमुख घटक पक्ष बैठकीपासून दूर राहिल्यामुळे आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याचे बन यांनी म्हटले. सोमवार दि.८ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नवनाथ बन यांनी दावा केला की," पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला स्पष्ट बहुमत असून विरोधकांचे सरकार पाडण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी संजय राऊत यांना संधी न मिळाल्याने उबाठा गटातील अंतर्गत स्थिती स्पष्ट झाली आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर इंडिया आघाडीत एकमत नसून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या नावांवरून विविध घटक पक्षांत आणि उबाठा गटातच मतभेद आहेत."
"रामाच्या श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आता रामाचे नाव घेण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या नेतृत्वासोबत राज ठाकरे जाणार नाहीत." असा विश्वास बन यांनी व्यक्त केला. (Maharashtra Politics)
अतुल लोंढे यांच्या आरोपांना उत्तर देताना नवनाथ बन यांनी नागपूर विधान परिषद निवडणुकीत महायुती सक्षम स्थितीत असून कोणत्याही प्रकारच्या आमिषांची आवश्यकता नसून विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीतीलच अनेक नेते प्रश्न उपस्थित करत असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला. देशातील जनता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्यामुळे विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरणार असल्याचे बन म्हणाले. (Maharashtra Politics)