हवामानबदलामुळे वाढणाऱ्या तापमानाच्या झळा केवळ माणसांनाच नव्हे, तर वन्यप्राण्यांनाही सहन कराव्या लागतात. उन्हाळ्यात आटणारे जलस्रोत, वाढते वणवे आणि एकूणच उष्णतेमुळे बदलणारे वाघांचे वर्तन, यामुळे मानव-व्याघ्र संघर्षाची तीव्रता वाढली आहे. विशेषतः विदर्भातील व्याघ्र क्षेत्रांमध्ये अतिउष्णतेच्या काळात वाघ आणि माणूस यांच्यातील अनपेक्षित समोरासमोर येण्याच्या घटना वाढताना दिसतात. वाघांच्या आक्रमकतेमागे केवळ ‘नरभक्षक’ हा शिक्का नसून, हवामानबदलामुळे त्यांच्या शरीरावर आणि अधिवासावर होणारे परिणामही तितकेच जबाबदार असल्याचे वैज्ञानिक वास्तव उलगडणारा हा लेख...
महाराष्ट्रात गेल्या काही दशकांत मानव-वन्यजीवसंघर्ष हा वन्यजीव संवर्धन आणि ग्रामीण विकासासमोरील गंभीर आव्हान म्हणून उदयास आला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील वनालगतच्या भागांमध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, नीलगाय आणि माकडे यांच्यामुळे मानव मृत्यू, पाळीव जनावरांचे मृत्यू आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सामान्यतः या संघर्षाचे कारण वन्यजीवांची वाढती संख्या किंवा अधिवासाचा ऱ्हास मानले जाते. तथापि, उपलब्ध घटनांचे विलेषण केल्यास संघर्षाची मुळे गरिबी, बेरोजगारी, वनसंसाधनांवरील अवलंबित्व, अपुरी ग्रामीण पायाभूत सुविधा आणि मर्यादित पर्यायी उपजीविका यामध्ये दडलेली असल्याचे दिसून येते. यात आता हवामानबदल आणि तापमानवाढ या मुद्द्यांचादेखील समावेश झाला आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष हा केवळ वन्यजीव व्यवस्थापनाचा विषय नसून, तो ग्रामीण अर्थव्यवस्था, सामाजिक विकास आणि स्थानिक उपजीविका यांच्याशीही निगडित आहे. वनालगत राहणाऱ्या गरीब कुटुंबांचा इंधन, चारा, लघू वनउत्पादने आणि पशुधनाचा मोठ्या प्रमाणात आधार असतो. परिणामी, जंगलातील मानवी वावर वाढतो आणि वन्यजीवांशी संपर्काची शक्यता अधिक होते. बेरोजगारीमुळे ग्रामीण युवकांना जंगलाधारित उपजीविकेवर अवलंबून राहावे लागते. चारा संकलन, लाकूड गोळा करणे, वनमजुरी आणि इतर कामांसाठी जंगलात वारंवार जावे लागते. हीच वेळ वन्यजीवांच्या सक्रिय हालचालींची असल्याने अपघाती संघर्ष आणि मानव मृत्यूंचे प्रमाण वाढते.
हवामानबदलामुळे वाढणारे तापमान हे केवळ पर्यावरणीय संकट नसून, ते वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढविणारे महत्त्वाचे कारण ठरत आहे. विशेषतः वाघांच्या अधिवासावर, भक्ष्यसाखळीवर आणि पाण्याच्या उपलब्धतेवर होणारे परिणाम मानव-व्याघ्र संघर्षाला चालना देत आहेत. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटतात. त्यामुळे वाघ आणि त्यांचे भक्ष्य प्राणी पाण्याच्या शोधात गावांच्या परिसरातील तलाव, शेततळी आणि जलाशयांकडे वळतात. यामुळे माणूस आणि वाघ यांचा संपर्क वाढून संघर्षाची शक्यता निर्माण होते. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि वनस्पतींवरील परिणामांमुळे हरीण, सांबर, रानडुक्कर यांसारख्या भक्ष्य प्राण्यांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक भक्ष्य कमी झाल्यास वाघ गावांजवळील पाळीव जनावरांवर हल्ले करण्यास प्रवृत्त होतात. तापमानवाढीमुळे जंगलातील वनस्पती रचना बदलते. काही भाग कोरडे पडतात, तर काही ठिकाणी वनाग्नींचे प्रमाण वाढते. परिणामी, वाघांना नवीन अधिवास शोधावा लागतो. या स्थलांतरादरम्यान ते मानवी वस्त्यांच्या जवळ येतात.
अत्यंत उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे जंगलात वनाग्नींच्या घटना वाढत आहेत. वनाग्नीमुळे वाघ आणि इतर वन्यप्राणी सुरक्षित क्षेत्राच्या शोधात जंगलाबाहेर पडतात, ज्यामुळे संघर्षाची शक्यता वाढते. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील लोक पाणी, तेंदूपत्ता, मोहफूल, सरपण आणि गुरे चारण्यासाठी जंगलात अधिक जातात. त्याच काळात वाघही मर्यादित जलस्रोतांभोवती फिरत असल्याने दोघांचा सामना होण्याची शक्यता वाढते.
सुंदरबन परिसरात समुद्रपातळी वाढ, खारफुटी क्षेत्रातील बदल आणि चक्रीवादळांच्या वाढत्या तीव्रतेमुळे वाघांच्या अधिवासावर परिणाम होत आहे. परिणामी, काही भागांत मानव-व्याघ्र संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. ताडोबा अंधारी, बोर आणि नवेगाव नागझिरा यांसारख्या व्याघ्र प्रकल्पांच्या परिसरात उन्हाळ्यात जलस्रोतांभोवती वाघांची हालचाल वाढते. चंद्रपूर, गडचिरोली आणि ब्रह्मपुरी परिसरात तेंदूपत्ता व मोहफूल संकलनाच्या हंगामात वाढलेले तापमान आणि मानवी जंगलातील वावर यामुळे वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ दिसून येते.
अतिउष्णता - ‘हायपरथर्मिया’ बिथरलेले वर्तन - एक दुर्दैवी संघर्ष
चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळ्यात घडणाऱ्या मानव-व्याघ्र संघर्षाला उष्णतेचाही एक कंगोरा आहे. हा संघर्ष वाघ ‘नरभक्षक’ झाल्यामुळे नसून, अतिउष्णतेमुळे त्यांच्या शरीरावर आणि वर्तनावर झालेल्या दुष्परिणामांचा वैज्ञानिक दाखला आहे. वाघ हे ‘होमियोथर्मिक’ प्राणी आहेत. म्हणजेच त्यांना त्यांच्या शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवावे लागते. मात्र, त्यांच्या शरीरशास्त्रात मानवासारख्या घामाच्या ग्रंथी नसतात. वाघ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने ‘पेंटिंग’ (तोंडाने वेगाने श्वास घेणे) आणि पाण्यात बसून राहणे, या पद्धतींचा वापर करतात. जेव्हा बाहेरील तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा वातावरणातील उष्णतेचा प्रवाह प्राण्याच्या शरीराच्या आत जातो. जर प्राण्याला पाण्याचा स्रोत मिळाला नाही, तर त्याची उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता संपते, ज्याला ‘हायपरथर्मिया’ किंवा ‘हिट स्ट्रेस’ म्हणतात. शरीराचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास प्राण्याच्या मध्यवत मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो. तीव्र उष्णतेमुळे शरीरात ‘स्ट्रेस हार्मोन्स’ अचानक वाढतात. यामुळे प्राण्यामध्ये ‘हायपर-इरिटेबिलिटी’ आणि ‘फ्रस्ट्रेशन-ॲरोशन सिंड्रोम’ निर्माण होतो. अशा स्थितीत वाघ अत्यंत लहान कारणानेही उद्दिपित होतो आणि हिंसक बनतो. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात तेंदूपत्ता संकलनाचे काम चालते. तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी वाघ ज्या घनदाट सावलीच्या किंवा ओढ्यांच्या भागात आश्रय घेतात, त्याच भागात अनेकदा तेंदूची झाडे असतात. त्यामुळे वाघ आणि मानव एकाच ‘मायक्रो-हॅबिटॅट’मध्ये समोरासमोर येतात. तेंदूपत्ता गोळा करताना महिला जमिनीकडे वाकलेल्या असतात. वाघाची दृष्टी प्रामुख्याने हालचाली आणि आकृतीवरून लक्ष्य ठरवते. वाकलेली मानवी आकृती ही वाघाला चार पायांचा नैसर्गिक भक्ष्य असल्याचा संभ्रम निर्माण करू शकते, ज्यामुळे त्याची ‘प्रिडेटरी अझे’ (शिकार करण्याची प्रवृत्ती) तीव्र होते. तीव्र उन्हाळ्यात वाघांच्या शरीरात ‘कॉर्टिसोल’ (स्ट्रेस हार्मोन) प्रचंड वाढते. घामाच्या ग्रंथी नसलेल्या वाघांमध्ये यामुळे ‘हायपरथर्मिया’ (मज्जासंस्थेवरील ताण) निर्माण होतो, ज्यामुळे ते कमालीचे चिडचिडे आणि हिंसक बनतात. जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्यामुळे वाघ पाण्याच्या शोधात मानवी वस्त्या व शेतांकडे येतात. विशेषतः आईपासून वेगळे झालेले अननुभवी, तरुण वाघ मुख्य पाणवठ्यांवर अधिकार न मिळाल्याने जंगलाच्या टोकाला राहतात, ज्यामुळे मानवासोबत थेट संघर्ष वाढतो.
तापमानवाढ आणि मानव-वाघ संघर्ष यांचा संबंध अप्रत्यक्ष असला, तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढते तापमान, जलस्रोतांची कमतरता, अधिवासाचा ऱ्हास, वणवा आणि भक्ष्य प्राण्यांवरील परिणाम, यांमुळे वाघ मानवी वस्तींकडे आकर्षित होतात. त्यामुळे हवामानबदलाचे परिणाम कमी करण्याबरोबरच जंगलातील जलव्यवस्थापन, अधिवास संवर्धन, भक्ष्य प्रजातींचे संरक्षण आणि स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. मानव-वाघ संघर्षाचे प्रभावी व्यवस्थापन हे भविष्यात हवामानबदलाशी जुळवून घेण्याच्या धोरणांचा अविभाज्य भाग ठरणार आहे.
- डॉ. रविकांत खोब्रागडे
(लेखक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) पदावर कार्यरत आहेत.)
8668221009