जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ने आयोजित केलेल्या ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल अॅवॉर्ड फॉर स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स - २०२६’ या पुरस्कार सोहळ्यात १८ वनसंवर्धकांचा सन्मान केला जाणार आहे. सोमवार, दि. ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज प्रा. लि.’ आहेत, तर सहप्रायोजक ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभीकरण’ आहेत. सहयोगी संस्था म्हणून ‘आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशन’ आणि ‘महाराष्ट्र स्टेट को. बँक’ सहभागी झाले असून ‘एबीपी माझा’ हे टेलिव्हिजन पार्टनर, ‘रेडिओ सिटी ९१.१ एफएम’ हे रेडिओ पार्टनर आणि ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ हे रिसर्च पार्टनर आहेत. या सोहळ्यात खालील पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे.
जीवनगौरव पुरस्कार
कुशल पर्यावरणीय अभियंता
डॉ. दिपक कांटावाला हे भारतातील ज्येष्ठ पर्यावरण अभियंता आणि पर्यावरण सल्लागार म्हणून ओळखले जातात. औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, नदी प्रदूषण अभ्यास, सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय नियोजन या क्षेत्रांत त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून पर्यावरण आणि सॅनिटरी अभियांत्रिकीमध्ये ‘एमएस’ व ‘डीएस्सी‘ पदवी संपादन केली. त्यांनी भारतातील, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यामध्ये Central Pollution Control Board (CPCB), World Health Organization,World Bank आणि USAID यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया, औषधनिर्माण आणि कीटकनाशक उद्योगांतील प्रदूषण नियंत्रण, कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स (CETPs), महानगरपालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नदी खोरे आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना या विषयांवर त्यांनी व्यापक काम केले आहे.
जीवनगौरव पुरस्कार
बटरफ्लायमॅन
निसर्गाच्या अद्भुत कथा लेखणीतून पानांवर उतरविण्याकरिता निसर्गाचा वरदहस्त असावा लागतो. या माणसावर जन्मत: निसर्गाचा वरदहस्त होता. लिखाणाच्या निमित्ताने त्यांची फुलपाखरांशी गट्टी जमली आणि त्यांच्या रंगीबेरंगी विश्वात हा ’माणूस’ रममाण झाला. निसर्गवाचनाची सवय लावली. ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेने (बीएनएचएस) निसर्गमय जगण्याचे शिक्षण दिले. ’जीवशास्त्र’ विषयातील शिक्षणाचा गंध नसताना त्यांनी स्वशिक्षणाने निसर्गविद्या प्राप्त केली. आज हा माणूस भारताचा ’बटरफ्लायमॅन’ म्हणून ओळखला जातो. या माणसाचे नाव आयझॅक केहिमकर. १९९० साली त्यांचे सहलेखक म्हणून ’बटरफ्लाईज आफ इंडिया’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. भारतातील फुलपाखरांचा सर्वव्यापी आढावा घेणार्या ’बुक ऑफ इंडियन बटरफ्लाईज’ या पुस्तकाने केहिमकरांना खरी ओळख मिळवून दिली. ७३५ प्रजातींच्या फुलपाखरांची ओळख करुन देणार्या या पुस्तकाचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी दहा वर्ष खर्ची घातली. ’बीएनएचएस’मधील आपल्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी फुलपाखरांवरील तीन, रानफुलांचे एक आणि सागरी जीवांची ओळख करुन देणार्या पुस्तकाचे लिखाण केले आहे. ’बीएनएचएस’मधील सेवानिवृत्तनंतर त्यांनी ’आयनेचर फाऊंडेशन’ची स्थापना केल असून यामाध्यमातून ते आता निसर्ग शिक्षणाचे धडे देत आहेत.
बर्डींग नॅचरलिस्ट पुरस्कार
लॉरिस मॅन
ग्रामीण भागात राहून किंवा योग्य शिक्षण न घेतल्यास करिअर घडत नाही, अशा बाबींना फाटा देणारा हा मुलगा. मकरंदसोबत तिलारीच्या खोर्यात गेल्यावर आपण दुर्मीळ वनमानव पाहिला नाही, असं कधीच होत नाही. वन्यजीवांच्या अनुषंगाने सिंधुदुर्गाकरिता काही महत्त्वपूर्ण नोंदी करणारा. मलबारी कर्णा, मलबार ट्री टोड, फ्लाईंग लिझर्ड यांसारख्या दुर्मीळ प्रजातीच्या सिंधुदुर्गातील पहिल्या महत्त्वपूर्ण नोंदी त्याने केल्या असून त्यासंबंधीचे संशोधन निबंधदेखील प्रकाशित केलेत. तिलारी खोर्याची ही जैवविविधता पाहण्यासाठी सध्या देशभरातील अनेक मोठ्या शहरातील वन्यजीवप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांची पाऊले इथे वळत आहेत. या लोकांना ही जैवविविधता उलगडून दाखवण्याचे काम मकरंद हिरिरीने करत आहेत.
बर्डींग नॅचरलिस्ट पुरस्कार
नांदूरचे गाईड
खर्या अर्थाने महाराष्ट्रातील पक्ष्यांचे माहेरघर म्हणजे नाशिकचे नांदूर-मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य. गोदावरी आणि कादवा नदीमुळे तयार झालेल्या पाणलोट क्षेत्रात वसलेले हे अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दूरदेशातून लाखोंच्या संख्येत येणारे स्थलांतरी पक्षी. आपल्याला या पक्ष्यांचे दर्शन घडवतात इथले नेचर गाईड. अभयारण्याच्या आसपास असणार्या गावकर्यांनाच प्रशिक्षित करून त्यांना नेचर गाईड म्हणून अभयारण्यात नेमण्यात आल आहे. आठ नेचर गाईड याठिकाणी कार्यरत असून एखाद्या पक्षीतज्ज्ञाप्रमाणेच ते इथल्या पक्ष्यांची आणि अभयारण्याची सखोल आणि नेमकेपणाने माहिती देतात. यामुळे स्थानिक रहिवासी असणार्या नेचर गाईड यांनाच उपजीविकेची संधी मिळाली आहे.
यंग रिसर्चर पुरस्कार
गोगलगायींचा संशोधक
वाघ-बिबट्यांच्या वलयांकित वन्यजीव संशोधनापेक्षा हा माणूस अपृष्ठवंशीय सूक्ष्म जीवांच्या प्रेमात पडला. गोगलगायीसारख्या सहज दिसणार्या जीवांचे वैविध्य त्यांना भावले. त्यामुळे या संथ जीवांचा पाठलाग करून त्यांची विविधता जगासमोर उलगडण्याचा प्रयत्न तो करत आहे. या कामामध्ये त्याला यशही मिळत असून सह्याद्रीच्या दर्यांतून त्याने गोगलगायीच्या सहा नव्या प्रजाती आणि एका पोटजातीचा शोध लावला. शिवाय, एक विंचू आणि दोन बेडकांच्या नव्या प्रजातींचा उलगडा त्याने केला आहे. गोगलगायीसारख्या दुर्लक्षित जीवांवर जगभरात काम करणार्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संशोधकांमध्ये त्याचा समावेश होतो. ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’मधील हा संशोधक म्हणजेच डॉ. अमृत भोसले.
यंग रिसर्चर पुरस्कार
समुद्राची लेक
महाराष्ट्रात दुर्लक्षित राहिलेल्या सागरी संशोधनासारख्या क्षेत्रात या मुलीने काम करण्याचा निर्णय घेतला. किनारे फिरत असताना अनेक प्रकारचे ‘पॉलीक्ल्याड’ दिसू लागले. त्यामुळे याच जीवावर संशोधन करण्याचे त्यांनी ठरवले. सागरी जीवांमधील ‘फ्लॅटवर्म’ म्हणजेच ‘पॉलीक्ल्याड’ वर्गासंबंधी काम करणारी ती भारतामधील एकमेव शास्त्रज्ञ आहे. या जीवांवर संशोधन करण्याच्या ध्येयाने तिने भारतामधील अनेक समुद्रकिनारे पालथे घातले आहेत. या शोधात तिने ‘पॉलीक्ल्याड’मधील ३१ प्रजातींची भारतामधून प्रथम नोंद केली आहे. शिवाय, तीन प्रजातींचा नव्याने शोधदेखील लावला आहे. प्लॅटवर्मसारख्या दुर्लक्षित सागरी जीवांचा ठेवा आपल्यासमोर उलगडणारी ‘समुद्राची लेक’ म्हणजे सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. रेश्मा पितळे.
यंग रिसर्चर पुरस्कार
ब्रह्मपुरीचा नायक
विदर्भातील मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढलेल्या घटना गंभीर आहेत. या घटनांमध्ये मार्ग दाखवणारा विदर्भातील एक संशोधक आहे, राकेश आहुजा. गेल्या १२ वर्षांपासून तो विदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहे. ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्ये ‘बायोलॉजिस्ट’ म्हणून कार्यरत असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमधील वन्यप्राण्यांचे Real-time monitoring, Movement tracking, Location prediction आणि Capture operations मध्ये सहभाग ही त्याची जबाबदारी आहे. १८ हून अधिक मानवहानीच्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव आणि २० हून अधिक प्रॉब्लेमॅटिक वाघांच्या रेस्क्यू कार्यात त्याने सहभाग नोंदवला आहे.
कॉन्झर्वेशन कॉन्ट्रीब्युटर पुरस्कार
सड्यांची ‘कॅटलिस्ट’
सह्याद्री आणि कोकणातील पडीक किंवा नापीक समजल्या जाणार्या सड्यांचा सजीवपणा ज्या व्यक्तीने जगासमोर मांडला ती व्यक्ती आहे डॉ. अपर्णा वाटवे. आपले आजवरचे आयुष्य सड्यांसाठी वाहिलेल्या. पाचगणी ‘पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका राहिली आहे. कारण, हा निर्णय घेण्याच्या प्रकियेमध्ये उच्च न्यायालयानेच त्यांची ‘इकालॉजिस्ट’ म्हणून नियुक्ती केली होती. घाटमाथा आणि कोकणातील जांभा दगडाच्या कातळ सड्यांची जैवविविधतेच्या नोंदणीचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. सध्या त्या ‘आययूसीएन’च्या ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप’च्या समन्वयक म्हणून काम करत आहेत.
कॉन्झर्वेशन कॉन्ट्रीब्युटर पुरस्कार
धुळ्यातील लांडग्यांचे रक्षक
धुळ्यातील गवताळ प्रदेशाच्या सर्वांगीण संवर्धनासाठी काम करणारी संस्था आहे, ‘गोल्डन अर्थ बायोप्रिझर्व्ह फाऊंडेशन, धुळे’ आणि साक्री तालुक्यातील गवताळ प्रदेश आणि लांडग्याच्या संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत आहे. वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून सध्या ते जिल्ह्यातील माळरांनावरील लांडग्याच्या जलर्लीरिपलूचा अभ्यास करत आहेत. तसेच लांडगा-कुत्रा संकरासारख्या पर्यावरणीय आव्हानांवर जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. धुळे वनविभागासोबत झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत तालुक्यात गवताळ प्रदेशावर होणारी वृक्षलागवड थांबवत त्याठिकाणी स्थानिक गवताच्या प्रजातींची लागवड संस्थेमार्फत होत आहे. या माध्यमातून गवताळ अधिवासाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम संस्था करत आहे.
कॉन्झर्वेशन अॅक्टीव्हिझम पुरस्कार
संशोधनातून संवर्धनाकडे
‘संशोधनातून संवर्धनाकडे’ या ब्रीदवाक्यासह सह्याद्रीच्या खोर्यात काम करणारी संस्था म्हणजे ‘महादरे इकोलॉजिकल रिसर्च इंटरडिसिप्लिनरी ऑर्गनायझेशन.’ सह्याद्रीतील प्रजातींचे किंवा अधिवासांचे शास्त्रीयरीत्या अवलोकन करणे, त्यावर सखोल संशोधन करणे आणि शासनदरबारी त्याच्या संवर्धनासाठी पाठपुरावा करणे, हे संस्थेचे मुख्य काम. महत्त्वाचे म्हणजे, या कामात तरुण संशोधकांना सहभागी करून घेण्यात संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. तरुण होतकरू वन्यजीव संशोधकांना संशोधनाची संधी देऊन त्यांना आर्थिक पाठबळ पुरवून संशोधनाच्या वाटेवरच त्यांना मार्गस्थ करण्याचा दृष्टिकोन संस्थेचा आहे. दुर्लक्षित वन्यजीव प्रजाती आणि अधिवासाच्या संवर्धनाला सकारात्मकेचे वलय देऊन काम करणारी ही संस्था आहे.
हॅबीटॅट कॉन्झर्वेशन पुरस्कार
तणमोर संवर्धक फासेपारधी
'Foundation for Economic and Ecological Development'(फीड) या संस्थेअंतर्गत तणमोर मित्रांच्या सहकार्याने दरवर्षी तणमोराच्या उपस्थितीच्या नोंदी, निरीक्षणे आणि अधिवासाविषयीची नोंदणी करण्यात येते. अकोला जिल्ह्यातील वडाळा या पासेपारधी समाजाच्या गावात सुमारे २०० हेक्टर क्षेत्रामध्ये स्थानिक लोकांच्या सक्रिय सहभागातून गवताळ अधिवासाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आले. विशेष म्हणजे, हे क्षेत्र आजही स्थानिक लोकसमूह स्वतःच्या प्रयत्नांनी जतन आणि व्यवस्थापित करीत आहेत. हिंमत पवार, कुलदीप राठोड, सेवा पवार, योगेश पवार यांसारखे लोक या व्यापक लोकसमूहांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
इको-टुरिझम पुरस्कार
तारामुंबरीच्या कांदळवनांचे रक्षक
वन विभागाच्या ’कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने’अंतर्गत कोकणातील किनारी भागामध्ये निसर्ग पर्यटन व उपजीविका निर्मितीचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. यामधील निसर्ग पर्यटन उपक्रमाअंतर्गत देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावात कांदळवन निसर्ग पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे. या गावामध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून त्यामार्फत ’जलकन्या निसर्ग पर्यटन’ गटाअंतर्गत कांदळवन सफारीबरोबरच सुरू आहे. यामध्ये पर्यटकांना तारामुंबरी खाडीची सफर घडवली जाते. २०२२ ते आजतागायत समितीने कांदळवन निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
फॉरेस्ट स्टाफ पुरस्कार
वनविभागातील पक्षीमित्र
वन विभागात रुजू झाल्यानंतर लागलेला पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासून त्यांनी पक्ष्यांचे जग लोकांसमोर मांडण्यास सुरुवात केली. पक्ष्यांची ओळख आणि त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी धडपड केली. या धडपडीतून हिंगोली जिल्ह्याचे पक्षीवैभव जगसमोर उलगडले. जिल्ह्यात आढळणार्या पक्ष्यांची यादी तयार केली. शिवाय जिल्ह्यात प्रथमच दिसलेल्या पक्ष्यांच्या नोंदी केल्या. या नोंदी आपल्यापाशी न बाळगता त्यावर शास्त्रीय निबंध लिहून ते प्रकाशित केले. पक्ष्यांसोबत फुलपाखरे आणि उभयचरासंबंधी शास्त्रीय नोंदी करुन त्याचे शास्त्रीय शोधनिबंध प्रकाशित केले. एक सामान्य पक्षीनिरीक्षक ते पक्ष्यांची शास्त्रीय नोंद करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. पक्ष्यांचा मित्र असलेला हा वनरक्षक म्हणजे गणेश कुरा.
फॉरेस्ट स्टाफ पुरस्कार
सह्याद्रीचे व्याघ्र रक्षक
गेल्या सहा महिन्यात विदर्भातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघिणींचे यशस्वी स्थानांतरण करण्यात आले आहे. विदर्भातील वाघिणींना सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर इथल्या क्षेत्रीय कर्मचार्यांनी डोळ्यात तेल घालून वाघिणींच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली. त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रत्येक माहिती संवेदनशीलता बाळगून वन्यजीवप्रेमींना समाज माध्यमाद्वारे सांगितली. आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रत्येक वाघाने लोकांच्या मनात सहद्य स्थान निर्माण केले आहे. स्थानांतरित केलेल्या तिन्ही वाघिणी या प्रकल्पात स्थिरावल्या असून इथल्या नर वाघांसोबत त्यांचे मिलन देखील झाले आहे. हेच स्थानांतरणात सहभागी असणार्या क्षेत्रीय कर्मचार्यांचे यश आहे.
मरीन कॉन्झर्वेटर पुरस्कार
गिटारफिश संवर्धक
‘दक्षिण फाऊंडेशन’च्या ‘मरिन फ्लॅगशिप प्रकल्पा’अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बर्याच वेळा मासेमाराची जाळ्यात मुशी (शार्क) आणि पाकटसारख्या (स्टिंग रे) संकटग्रस्त आणि संरक्षित प्रजाती अनावधानाने अडकल्या जातात. ज्याला ‘बायकॅच’ असे म्हटले जाते. अशा बायकॅच स्वरूपात येणार्या मत्स्यप्रजातींचे प्रमाण तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच वाईड नॉज्ड गिटारफिश प्रजातीच्या संवर्धनासाठी सर्वप्रथम तिची संख्या मोजण्याचे कामही या प्रकल्पाअंतर्गत आचरा ते मालवण या पट्ट्यात सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे गिटारफिशसारख्या दुर्लक्षित आणि संरक्षित सागरी प्रजातींबाबत मच्छीमारांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वाचे या प्रकल्पातून होत आहे.
मुंबई वॉरियर्स पुरस्कार
मुंबईचे पक्षीनिरीक्षक
‘मुंबई बर्डवॉचर्स क्लब.’ मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पक्षीतज्ज्ञांचा एक सक्रिय अनौपचारिक गट आहे. या गटामार्फत वेळोवेळी मोफत बर्ड वॉक आणि जनजागृती मोहिमांचे आयोजन केले जाते. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृतीचे काम करण्यात येते. या मोहिमांच्या माध्यमातून मुंबईकरांना पक्ष्यांची इत्यंभूत आणि शास्त्रीय माहिती अवगत करून देण्याचा क्लबमधील सदस्यांचा प्रयत्न असतो. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना शहरातील पक्षी विविधतेची जाणीव करून देण्याचे ध्येय क्लब समोर आहे. मुंबईत सातत्यपूर्ण एकत्रित पक्षीनिरीक्षणाचे दौरे, संपर्क, ज्ञानाची देवाणघेवाण आणि माहिती गोळा करण्यासाठी केलेला हा एक सामुदायिक प्रयत्न आहे.
मुंबई वॉरियर्स पुरस्कार
पाणथळींचा रक्षक
नवी मुंबईतील फ्लेमिंगोचे हक्काचे ठिकाण म्हणजे ‘एनआरआय’, ‘टी. एस. चाणक्य’ आणि ‘डीपीएस’ तलाव. या तलावांवर जेव्हा गदा येण्याची वेळ आली, तेव्हा या तलावांना वाचवण्यासाठी इथले नागरिकच उभे राहिले. त्यासाठी पुढाकार घेतला, याच तलावांच्या शेजारी राहणार्या सुनील अग्रवाल या एका सामान्य नागरिकाने. ‘सेव्ह नवी मुंबई वेटलॅण्ड्स’ या मोहिमेचे प्रणेते म्हणून ओळखले जातात.२०१६-१७ पासून ते आणि त्यांची पत्नी श्रुती अग्रवाल हे नवी मुंबईतील महत्त्वाच्या पाणथळ जागा आणि खारफुटी वाचवण्यासाठी अविरत लढा देत आहे. न्यायालयीन लढा दिल्याने आता या पाणथळींना संरक्षणदेखील मिळाले आहे.
श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार
निसर्ग अभ्यासक
आयटी क्षेत्रामधील आपली नोकरी सांभाळून मकरंद केतकर यांनी विंचवांच्या २० नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. एका विंचवाच्या प्रजातीला त्यांचे नावही देण्यात आले आहे. दक्षिण भारत आणि पश्चिम घाटातील खडकाळ व डोंगराळ भागातून ‘आयसोमेट्रस’ व ‘स्कॉर्पिओप्स’ वंशातील विंचवांच्या प्रजातींवर महत्त्वपूर्ण पद्धतशीर अभ्यास त्यांनी केला आहे. मात्र, संशोधनापेक्षा वन्यजीवांप्रति असलेल्या अनेक मिथकांना दूर करण्यासाठी त्यांच्यामार्फत सुरू असणारे प्रयत्न वाखणण्याजोगे आहेत. प्रसंगी परखड मत मांडून वन्यजीवांप्रति चुकीचे वार्तांकन करणार्या माध्यमांनादेखील ते धारेवर धरतात. निसर्गभ्रमंतीचे आयोजन करून लोकांना वन्यजीवांप्रति त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांविषयी जागृत करतात.