फिफा वर्ल्ड कप २०२६’ म्हणजेच, फुटबॉलच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात. आजवरच्या ३२ संघांच्या पारंपरिक रचनेला छेद देत, यावेळी ‘फिफा’ने स्पर्धेचा विस्तार थेट ४८ संघांपर्यंत केला. मात्र, हा बदल केवळ इथपर्यंतच मर्यादित नाही. ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये आवडत्या संघाला, खेळाडूंना बघण्यासाठी जगभराचा प्रवास करून, महागातली टिकीटं खरेदी करत, चाहते येत असतात. हल्लीच्या ‘जेन-झी’चा कल, या गोष्टींची अनुभूती घेण्याकडे अधिक आहे. या पार्श्वभूमीवरच एक प्रेक्षक म्हणून, यावर्षीची अनुभूती वेगळी असणार आहे. कुठल्याही खेळाला अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्याकडेच आयोजकांचा कल असतो. याच अनुषंगाने यावर्षी, खेळामध्ये झालेले बदल लक्षात घेण्याजोगे आहेत.
४८ देश मैदानात उतरल्याने संघांचा विस्तार झाला. यामुळे सामन्यांची संख्या ६४ वरून, थेट १०४ वर पोहोचली आहे. ‘फिफा’ने यावर्षी ४८ संघांची विभागणी, प्रत्येकी चार संघांच्या १२ गटांमध्ये केली. प्रत्येक गटामधील सर्वोत्कृष्ट दोन संघ आणि तिसर्या क्रमांकावरील आठ सर्वोत्तम संघांना, पुढील फेरीत प्रवेश मिळणार आहे. यामुळे वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच, ‘राऊंड ऑफ ३२’ ही अतिरिक्त बाद फेरी जोडली गेली. म्हणजेच, कोणत्याही संघाला आता विजेतेपद मिळवण्यासाठी सातऐवजी आठ सामने जिंकावे लागतील.
फुटबॉलचा खेळ म्हणजे खेळाडूंच्या शारीरिक श्रमाची, संयमाची, लवचिकतेची कसोटीच. खेळामध्ये पंच आणि खेळाडूंमधला वाद ही ठरलेलीच गोष्ट! खेळाडू आणि पंचांमधील वाद मिटवण्यासाठी ‘अॅडव्हान्स्ड एसएओटी’ तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, याचा मुख्य भाग म्हणजे फुटबॉलच्या आत बसवण्यात आलेले ‘इनर्शियल मेझरमेंट युनिट’ अर्थात आयएमयू सेन्सर. यामुळे खेळातील हालचाली नेमकेपणाने टिपण्यास मदत होणार आहे. स्टेडियमच्या छताखाली १२ विशेष सिंक्रोनाईझ्ड कॅमेरे बसवण्यात आले असून, हे कॅमेरे प्रत्येक खेळाडूच्या शरीराचे २९ वेगवेगळे पॉईंट्स ट्रॅक करतात. यामध्ये त्यांचे हात, पाय, गुडघे आणि खांद्यांचा समावेश असतो. हे २९ पॉईंट्स सेकंदाला ५० वेळा स्कॅन केले जातात. यामुळे खेळाडूचे मैदानातील नेमके स्थान काय, याचा रिअल-टाईम डेटा मिळतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर उपयोग करून, अचूकता साधण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला आहे. जेव्हा एखादा खेळाडू आपल्या सहकार्याला पास देतो, तेव्हा चेंडूचा सेन्सर आणि ट्रॅकिंग कॅमेरे यांचा डेटा एकत्र करून ‘एआय’ काही सेकंदांतच त्याचे विश्लेषण करते. जर चेंडू पास करताना पुढचा खेळाडू ऑफसाईड पोझिशनमध्ये असेल, तर ‘एआय’ त्वरित ‘व्हीएआर’ (व्हिडिओ असिस्टंट रेफरी) रुमला सूचना देतो. याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता. जेव्हा एखादा ऑफसाईडचा निर्णय दिला जाईल, तेव्हा ‘एआय’ आणि कॅमेर्यांच्या डेटाचा वापर करून अवघ्या काही सेकंदांतच थ्रीडी अॅनिमेशन तयार होईल.
तंत्रज्ञानाचा वापर जरी वाढला असला, तरीसुद्धा पूर्णपणे तंत्रज्ञानावर विसंबून राहणार नसून, सहकार्याच्या भूमिकेचाच विस्तार असल्याचे दिसते. फुटबॉलमध्ये केवळ एका ‘ऑफसाईड’ किंवा ‘गोल’च्या चुकीच्या निर्णयामुळे, संपूर्ण देशाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगू शकते. मानवी डोळ्यांना ताशी ३०-४० किमी वेगाने धावणारे खेळाडू, त्याचवेळी हवेत उडणारा चेंडू आणि खेळाडूंच्या शरीराची नेमकी रेषा एकाच मायक्रोसेकंदात अचूकपणे टिपणे शक्य नसते. मानवी चुकांमुळे याआधी असंख्य तंटे-बखेडे उभे राहिले आहेत. खेळाडूंची कारकीर्द, देशाची प्रतिष्ठा आणि कोट्यवधी चाहत्यांचा विश्वास आदी गोष्टींना एका चुकीच्या निर्णयामुळे डाग लागू नये, म्हणूनच अशा पद्धतीचे बदल आवश्यकच म्हणावे लागतील.
‘एआय’ आता केवळ ‘कोड्स’ आणि ‘अल्गोरिदम’पुरते मर्यादित राहिलेले नाही. ‘ल्युव्र म्युझियम’मधील मोनालिसाच्या गूढ स्मितहास्याचा वेध घेण्यापासून ते ‘फिफा’च्या हिरवळीवर धावणार्या खेळाडूच्या मायक्रोसेकंदाच्या हालचाली टिपण्यापर्यंत, ‘एआय’ आज मानवी प्रतिभेची नवी सहप्रवासी बनले आहे. २०२६च्या ‘फिफा वर्ल्ड कप’मधील तांत्रिक क्रांती हे या आधुनिक युगाचे सर्वांत मोठे आणि जिवंत उदाहरण ठरावे. अर्थातच, याचसोबत लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, ‘एआय’ खेळाला पारदर्शकता देईल, पण त्यातील रोमांच हा मानवी चुका आणि चमत्कारांमधूनच
जन्माला येतो!