‘एल निनो‌’चे सागरी बळी

    08-Jun-2026
Total Views |

हवामानबदलाचे एक द्योतक म्हणजे ‌‘एल निनो.‌’ या ‌‘एल निनो‌’चा परिणाम ज्याप्रमाणे मान्सूनवर होतो, तसाच तो सागरी परिसंस्थेवरदेखील होतो. या परिसंस्थेतील अनेक प्रजाती आणि अधिवासावर ‌‘एल निनो‌’चा परिणाम होत असल्याने सागरी परिसंस्थेचेही जीवनचक्र बिघडते. त्याविषयी सविस्तर भाष्य करणारा हा लेख...

समुद्रकिनार्‍यावरील परिसंस्था ही केवळ मासेमारी, पर्यटन किंवा सौंदर्यापुरती मर्यादित नाही. ही परिसंस्था लाखो सागरी जीवांचे आश्रयस्थानदेखील आहे. या परिसंस्थेतील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे, सागरी कासवांची विणीची ठिकाणे आणि समुद्री गवताळ कुरणे. परंतु, वाढते तापमान, ‌‘एल निनो‌’सारख्या अनियमित हवामान घटना आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे या दोन्हीवर सध्या गंभीर परिणाम होत आहे.

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर नोव्हेंबर ते मार्च हा साधारण सागरी कासवांच्या विणीचा हंगाम, असे जुने संशोधन सांगते. पण, गेल्या पाच वर्षांत हा काळदेखील बदललेला दिसतो. आता नोव्हेंबरचा हंगाम डिसेंबरपर्यंत पुढे सरकला आहे आणि अंडी घालण्याची घरटी फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत उशिरा मिळत आहेत. ‌‘वेळास कासव महोत्सवा‌’चा अनुभव घेतल्यास, 2002 साली नोव्हेंबरमध्येच अंडी सापडायला सुरुवात व्हायची. पण, आता जानेवारीपासून घरटी सापडू लागली आहेत. याचा अर्थ सागरी कासवांची विणी एक महिना उशिरा होताना दिसते. अंडी उबवून पिल्ले बाहेर पडण्याचा काळही पुढे जात आहे. ज्यामुळे फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारा ‌‘कासव महोत्सव‌’ आता उशिरा सुरू होतो. कासवांच्या अंड्यांचा उबवणीचा काळ 45 ते 55 दिवसांचा असतो. मात्र, सुरुवातीला कासवांच्या घरट्यांमधून 60 दिवसांनी जन्मास येणारी पिल्लं, आता 70 दिवसांनी जन्मास येत आहेत. हे बदल हवामानबदलाचा आणि तापमानातील वाढीचा स्पष्ट संकेत देणारे आहेत.

सागरी कासवांचे जीवनचक्रही अत्यंत संवेदनशील असते. वाळूमधील तापमान हे अंड्यांमधून बाहेर येणाऱ्या पिल्लांचे लिंग ठरवते. संशोधनानुसार, जास्त उष्ण वाळूतून प्रामुख्याने मादी पिल्ले बाहेर पडतात, तर तुलनेने थंड तापमानात नर पिल्लांचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या थंडीच्या महिन्यांमध्ये होणाऱ्या घरट्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, यामधून नर कासवांची पैदास होण्याची शक्यता असते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये सर्वाधिक घरटी फेब्रुवारी महिन्यात झाली आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या घरट्यांमधून मादी कासवांची पैदास होते. साधारण घरट्यामध्ये 31.5 सेल्सिअस तापमान राहिल्यास अंड्यांमध्ये मादी कासवांचे भ्रूण विकसित होते. विणीचा हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे, अंडी उबवण्याचा काळ उन्हाळ्यात येत आहे. ज्यामुळे मादी कासवांचे प्रमाण अत्यंत वाढत आहे आणि नर-मादीचे संतुलन बिघडत आहे.

‌‘एल निनो‌’च्या काळात किनाऱ्यांवरील तापमान सामान्यापेक्षा जास्त असते, ज्यामुळे अंड्यांच्या उबवणुकीचा वेग वाढतो. पण, अतिउष्णतेमुळे अंडी नष्ट होण्याची शक्यता वाढते, पिल्लांची जगण्याची क्षमता कमी होते आणि नर-मादीचे असंतुलन निर्माण होऊन भविष्यातील प्रजननक्षम संख्या घटते. वादळ, त्सुनामी, किनारपट्टीची धूप आणि समुद्रपातळीतील वाढ ‌‘एल निनो‌’च्या काळात अधिक तीव्र होतात, ज्यामुळे अनेक पारंपरिक विणीची ठिकाणे नष्ट होतात. समुद्री गवताळ कुरणे म्हणजे सागरी परिसंस्थेची हिरवी फुप्फुसे! ही कुरणे समुद्रतळाला स्थिरता देतात, पाण्याची गुणवत्ता सुधारतात, किनारी धूप कमी करतात आणि अनेक मासे, कासवे, समुद्री घोडे, तसेच सूक्ष्म जीवांसाठी आश्रयस्थान ठरतात. ‌‘एल निनो‌’मुळे समुद्राच्या तापमानात वाढ झाल्यास गवताची वाढ मंदावते, प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होतो, पाण्यातील गढूळपणा वाढल्यास सूर्यप्रकाश कमी पोहोचतो आणि वादळे आणि अतिवृष्टीमुळे गवताळ कुरणे नष्ट होतात.

विशेषतः हिरव्या सागरी कासवांशी समुद्री गवताचे नाते अत्यंत जवळचे आहे. कासवे गवत खातात, पण ‌‘एल निनो‌’मुळे गवताळ कुरणे कमकुवत झाल्यास कासवांना अन्न शोधणे कठीण होते. याचवेळी निरोगी गवताळ कुरणे कासवांना अन्न, निवारा आणि किनारी परिसंस्थेतील स्थैर्य देतात. त्यामुळे कासवे आणि समुद्री गवत यांचा संबंध संघर्षाचा नसून, संतुलनाचा आहे. ‌‘एल निनो‌’मुळे भारतात पाऊस कमकुवत झाल्यास महाराष्ट्रातील किनारी भागात पाण्याचा खारटपणा वाढू शकतो, ज्यामुळे गवताळ कुरणांवर प्रतिकूल परिणाम होतो.

विणीचा हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे सागरी कासवांच्या अन्नसाखळीवरही परिणाम होतो. जेव्हा कासवे डिसेंबर-जानेवारीमध्ये किनाऱ्यावर येतात, तेव्हा समुद्री गवताळ कुरणे ‌‘एल निनो‌’मुळे आधीच तापमानाच्या ताणामुळे कमकुवत झालेली असतात. यामुळे कासवांना अन्न शोधण्यासाठी जास्त प्रवास करावा लागतो आणि त्यांच्या शरीरशक्तीवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे, उशिरा सुरू झालेल्या विणीमुळे पिल्ले बाहेर पडण्याचा काळ उन्हाळ्यात पडतो. उन्हाळ्यात समुद्राचे तापमान जास्त असते, ज्यामुळे पिल्लांना समुद्रात पोहण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात आणि त्यांची जगण्याची क्षमता कमी होते.

हवामानबदल आणि ‌‘एल निनो‌’मुळे सागरी कासवांची विणी उशिरा सुरू होणे, नर-मादीचे संतुलन बिघडणे आणि समुद्री गवताळ कुरणे नष्ट होणे, याचे संकट गंभीर आहे. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत विणीचा हंगाम सरकल्यामुळे अंडी उबवण्याचा काळ उन्हाळ्यात पडत आहे, ज्यामुळे मादी कासवांचे प्रमाण वाढत आहे आणि भविष्यातील प्रजननक्षम गणसंख्या धोक्यात येत आहे. वादळ आणि त्सुनामीमुळे किनाऱ्यावरील वाळूचे स्वरूप बदलते, ज्यामुळे नवीन घरटी कोणत्या जागेत घालावीत, यावर परिणाम होतो. किनारपट्टीची धूप होत असल्याने कासवांना जुनी विणीची ठिकाणे सोडून नवीन जागा शोधाव्या लागतात, ज्या योग्य नसतात. समुद्री गवताळ कुरणे नष्ट झाल्यास फक्त कासवांवरच नव्हे, तर संपूर्ण किनारी अन्नसाखळीवर परिणाम होतो. माशांचे प्राथमिक वासी, समुद्री घोडे आणि इतर अनेक जीवांवर याचा परिणाम होतो, ज्यामुळे मासेमारी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येतो. आज सागरी कासवे आणि समुद्री गवताळ कुरणे ही केवळ जैवविविधतेची चिन्हे नाहीत, तर समुद्रकिनाऱ्यांच्या आरोग्याची सूचक आहेत. ‌‘एल निनो‌’सारख्या घटनांमुळे हे संकट वाढत असल्याने किनारी परिसंस्था अधिक संवेदनशील बनत चालली आहे.

- प्राची हाटकर
(लेखिका सागरी जीवशास्त्रज्ञ आहेत.)
9892327417