दादर प्लाझाला बेस्ट बसचा अपघात; चार ते पाच वाहनांना धडक ; १ मृत्यू तिघे जखमी

Total Views |
BEST Bus Accident Mumbai
 
मुंबई : (BEST Bus Accident Mumbai) दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बस अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला. बसचे नियंत्रण सुटल्यामुळे बसने तीन ते चार गाड्यांना धडक दिली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बेस्ट बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही बेस्ट बस धारावीकडून-दादरकडे येत होती. बसचे चालक आणि वाहक दोघेही जखमी झाले आहेत.
 
सोमवार, दि.८ जून रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बेस्टची 463 क्रमांकाची बस धारावीकडून-दादरकडे प्लाझा सिनेमा जवळून असताना या बसचे नियंत्रण सुटले. या अनियंत्रित बसची मोटार सायकल सह काही चारचाकी गाडयांना धडक बसली आहे. बसने सुरुवातीला नियंत्रण गमावल्याने ट्रेलरला धडक दिली आणि अपघात झाला.
 
हेही वाचा :  साहेबराव कांबळेंचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हातात घेतला धनुष्यबाण
 
बेस्ट बसचा ज्या ठिकाणी अपघात झाला, तो वर्दळीचा भाग आहे. दादरच्या प्लाझा टॉकीज आणि आसपासच्या परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. भाजीवाले, व्यापारी, नोकरदार वर्ग यांच्या येण्या-जाण्याने हा भाग गजबजलेला असतो.
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस चौकात प्रवेश करताना दिसते. त्यानंतर ती नियंत्रण गमावून वाहनांना धडक देते. धडकेमुळे कार आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस, वाहतूक विभागाचे अधिकारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. (BEST Bus Accident Mumbai)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.