‘जंतरमंतर’वर ‘कॉकरोच जनता पार्टी’ने पुकारलेले आंदोलन पूर्णपणे फसले असून, त्याचा प्रभाव समाजमाध्यमांपुरताच मर्यादित राहिला आहे. ‘जेन-झी’ने याकडे पूर्णपणे पाठ फिरवली, या आंदोलनात काहींनी आझादीच्या घोषणा दिल्या, तर अनेकांना आंदोलनाचा उद्देशच माहीत नव्हता. त्यामुळे हा एक निव्वळ फसलेला प्रयोग ठरला.
राजधानी दिल्लीतील ‘जंतरमंतर’ हे देशातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांचे ऐतिहासिक केंद्र मानले जाते. या ठिकाणी होणार्या आंदोलनांना एक गांभीर्य आणि वजन असते, असे म्हणतात. मात्र, अलीकडच्या काळात काही स्वयंघोषित राजकीय आणि सामाजिक संघटनांनी, या जागेचे महत्त्वच संपुष्टात आणले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाने नुकतेच करण्यात आलेले आंदोलन हा, या राजकीय नौटंकीचा एक केविलवाणाच अंक ठरला. समाजमाध्यमांवर कोट्यवधी पाठीराख्यांचा टक्का गाठल्याचा, खोटा आभास निर्माण करणार्या या पक्षाचे प्रत्यक्ष जमिनीवरील अस्तित्व शून्य असल्याचे वास्तव या आंदोलनाने देशासमोर उघड केले.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या, या कथित आंदोलनाची मोठी हवा निर्माण केली जात होती. ‘अल्गोरिदम’चा पद्धतशीर गैरवापर करून आणि काही विशिष्ट अजेंडा राबवणार्या ‘इन्फ्लुएन्सर्स’चा आधार घेत, देशात जणू मोठी क्रांतीच होणार असल्याचे भ्रामक चित्रही उभे केले गेले. मात्र, प्रत्यक्ष आंदोलनाचा दिवस उजाडला, तेव्हा समाजमाध्यमांवरील तो खोटा फुगा क्षणात फुटला. ‘जंतरमंतर’च्या मैदानावर केवळ मूठभर लोक जमा झाले आणि या पक्षाच्या आभासी ताकदीचे पितळ उघडे पडले. समाजमाध्यमांवर ट्रेंड चालवणे आणि प्रत्यक्षात लोकांचा पाठिंबा मिळवणे, यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. आभासी जगातील लाईस आणि रिट्विट्सच्या जोरावर जनमताचा कौल मिळवता येत नाही, हा धडा या निमित्ताने सर्वांनाच मिळाला आहे.
या आंदोलनाचे सर्वांत मोठे आणि स्वागतार्ह वैशिष्ट्य कोणते असेल, तर ते म्हणजे आजच्या तरुण पिढीने, म्हणजेच ‘जेन-झी’ने याकडे फिरवलेली पाठ! ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि त्यांच्या सूत्रधारांना वाटले होते की, भावनिक आवाहनामुळे आजचा तरुण रस्त्यावर उतरेल. पण ‘जेन-झी’ अत्यंत व्यावहारिक, सजग आणि माहितीच्या बाबतीत अद्ययावत आहे. त्यांना विकासाचे राजकारण हवे आहे, त्यांना रोजगार आणि करिअरमध्ये रस आहे. भरकटलेल्या अराजकवादी आंदोलनांमध्ये आपला वेळ वाया घालवण्यास आजची नवी पिढी अजिबात तयार नसल्याचेच, तरुणांनी आपल्या अनुपस्थितीतून ठणकावून सांगितले. आजचा तरुण डिजिटलदृष्ट्या साक्षर असल्यामुळे, त्याला खोट्या प्रचार आणि वास्तव अचूक ओळखता येते. त्यामुळेच या भंपक क्रांतीच्या भूलथापांना बळी न पडता, तरुणाईने दाखवलेली प्रगल्भता देशाच्या उज्ज्वल भविष्याचीच नांदी ठरते.
या आंदोलनाला उपस्थित होते तरी कोण, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. या मंचावर आणि मैदानावर काही विशिष्ट राजकीय पक्षांचे भाडोत्री कार्यकर्ते उपस्थित होते. सामान्य जनतेचा तर, या आंदोलनाशी कोणताही दुरान्वयाने संबंध नव्हता. इथे राजकीय पक्षांचे झेंडे लपवून कार्यकर्तेच वावरत होते. ‘विरोधासाठी विरोध’ या एकमेव उद्देशाने पछाडलेल्या राजकीय पक्षांनी, आपल्या कार्यकर्त्यांना या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली जमा केले होते. हा सरकारला कोंडीत पकडण्याचा आणि देशात अस्थिरता असल्याचे भासवण्याचाच, हा एक केविलवाणा राजकीय प्रयोग होता, जो पूर्णपणे फसला. ज्यांच्याकडे जनाधार नाही, ते दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला अजेंडा रेटण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
या आंदोलनातील संतापजनक प्रकार म्हणजे, तिथे उपस्थित असलेल्या काहीजणांकडून दिल्या गेलेल्या ‘आझादी’च्या घोषणा. देशाच्या राजधानीत बसून कोणाकडून आणि कशापासून आझादी हवी आहे, याचे उत्तर या घोषणाबहाद्दरांकडे कधीच नसते. जेव्हा जेव्हा असे डाव्या किंवा पुरोगामी विचारसरणीचे गट एकत्र येतात, तेव्हा त्यांची मूळ प्रवृत्ती उफाळून येतेच आणि ते देशविघातक घोषणाबाजीकडे वळतात. यावरून या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनामागचा खरा हेतू काय होता आणि त्यांच्या पडद्यामागे कोणती देशविघातक शक्ती काम करत आहे, हेही स्पष्ट झाले. अशा प्रकारची घोषणाबाजी म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक असून, देशाच्या अखंडतेला नख लावणार्या प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढणे किती आवश्यक आहे, हेही यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे.
या संपूर्ण राजकीय नाटकाचा कळस म्हणजे, तेथील उपस्थितांना आपण तिथे कशासाठी आलो आहोत, याची साधी कल्पनाही नव्हती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा काही आंदोलकांना त्यांच्या मागण्यांबद्दल विचारले, तेव्हा त्यांना साधा एक मुद्दाही धडपणे सांगता आला नाही. काहींना तर ‘कॉकरोच जनता पार्टी’ म्हणजे काय, हेही माहीत नव्हते! म्हणजेच, जे कोणी मूठभर तिथे जमा केले गेले होते, ते पैशांच्या जोरावर गोळा केलेले होते. ज्या आंदोलनाला वैचारिक अधिष्ठान नसते आणि ज्यातील कार्यकर्त्यांना आपला उद्देशच माहीत नसतो, ते आंदोलन कधीही यशस्वी होऊ शकत नाही, हा इतिहास आहे.
प्रशासनाचा आणि पोलिसांचा असा नाहक वेळ आणि ऊर्जा वाया घालवणार्या या आंदोलनांवर, आता खर्या अर्थाने गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. परंतु, या अधिकाराचा गैरवापर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी करणार्या प्रवृत्तींवर, कायद्याचा वचक असणेही गरजेचे आहे. ‘जंतरमंतर’सारख्या ठिकाणी जेव्हा असे भाडोत्री आंदोलक जमा होतात, तेव्हा राजधानीतील व्यवस्थेवर ताण येतो, पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करावी लागते. पर्यायाने सामान्य करदात्यांच्या पैशांचाच चुराडा होतो. ‘कॉकरोच जनता पार्टी’सारख्या संघटनांना ना जनतेच्या प्रश्नांशी देणे-घेणे आहे, ना देशाच्या हिताशी. त्यांना केवळ अस्थिरता पसरवून, स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे.
आपले हे तथाकथित आंदोलन सर्वार्थाने फसल्याचे लक्षात आल्यावर, आयोजकांनी आपली उरलीसुरली लाज वाचवण्यासाठी भविष्यात याहून मोठे आंदोलन करण्याची पोकळ घोषणा केली. या घोषणेतूनच त्यांची हतबलता आणि राजकीय दिवाळखोरीच दिसून येते. सामान्य जनतेने आणि विशेषतः तरुणांनी अशा खोट्या आणि देशविघातक प्रवृत्तींना, त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे. आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ने कितीही मोठ्या घोषणा केल्या, तरी देशातील सुज्ञ नागरिक त्यांच्या या दिशाभूल करणार्या राजकारणाला बळी पडणार नाहीत, हेच या फसलेल्या आंदोलनाचे सर्वांत मोठे सत्य आहे.