पक्षी स्थलांतरावर होणारा हवामानबदलाचा परिणाम

    08-Jun-2026
Total Views |

 Climate Threatens Bird Migration
 
दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येणारे स्थलांतरित पक्षी हे निसर्गातील सर्वांत अद्भुत चमत्कारांपैकी एक आहेत. मात्र, हवामानबदलामुळे जगभरातील ऋतुचक्र, तापमान आणि अधिवासांमध्ये होत असलेल्या बदलांचा परिणाम आता या पक्ष्यांच्या स्थलांतरावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. काही पक्षी उशिरा पोहोचत आहेत, काहींचे मार्ग बदलत आहेत, तर काही प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित पक्ष्यांपुढे उभ्या राहिलेल्या आव्हानांचा वेध घेणारा हा लेख.
 
जैवविविधतेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आकर्षक भाग घटक म्हणजे पक्षी. पक्ष्यांचे स्थलांतर हे त्याहूनही रंजक. दरवष लाखो पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या प्रजनन, खाद्य आणि सुरक्षित अधिवासांच्या शोधात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात. परंतु, गेल्या काही दशकांपासून वाढते जागतिक तापमान, बदलणारे पर्जन्यमान, समुद्रपातळीतील वाढ आणि तीव्र वादळे यांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामानबदल हा आज स्थलांतरित पक्ष्यांसमोरील सर्वांत गंभीर पर्यावरणीय धोका ठरला आहे.
 
भारतात दरवष मध्य आशिया, सायबेरिया, मंगोलिया, युरोप आणि हिमालयातून अनेक पक्षी स्थलांतर करून दाखल होतात. त्यामध्ये पाणथळ अधिवासात येणारे बदक, वेडर्स व क्रौंच या गटातील ‌‘बार-हेडेड गूज‌’, ‘रफ‌’, ‘नॉर्दर्न पिंटेल‌’, ‘गार्गनी‌’, ‘कॉमन टील‌’, ‘ब्लॅक-टेल्ड गॉडविट‌’, ‘डेमोइझेल क्रेन‌’ अशा अनेक प्रजातींचा समावेश आहे. भारतात मोठी धरणे, तलाव, नद्या, तसेच समुद्रकिनारे याची मुबलक उपलब्धता असल्याने, या पाणथळ ठिकाणी लाखोंच्या संख्येत हे पक्षी दरवर्षी येत असतात. पक्षी स्थलांतर मुखत्वे खाद्यपूर्तता व प्रतिकूल हवामान टाळण्यासाठी होत असते.
 
जागतिक तापमानवाढीमुळे जगभरात ऋतूंच्या कालावधीत बदल, उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ, अतिवृष्टी व दुष्काळाचे प्रमाण वाढणे, हिमनद्या वितळणे, समुद्रपातळी वाढणे, चक्रीवादळे आणि वादळांची तीव्रता वाढणे असे परिणाम दिसत आहेत. याचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम स्थलांतरित पक्ष्यांवरसुद्धा होताना दिसतो. स्थलांतरित पक्षी दिवसाचा कालावधी, तापमान आणि पर्यावरणीय संकेतांच्या आधारे स्थलांतराची वेळ निश्चित करतात. परंतु, हवामानबदलामुळे ऋतुचक्रात बदल होत असल्याने अनेक पक्षी पूर्वी पेक्षा लवकर किंवा उशिरा स्थलांतर करू लागले आहेत.
 
यावर्षी आपल्या देशात जास्त तापमानाच्या दिवसात जशी वाढ झालेली दिसून आली, तशी युरोप व आर्क्टिक देशांमध्ये थंडीचे प्रमाण व थंड दिवसांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. गोठणबिंदूखाली असणाऱ्या ‌‘फ्रॉस्ट डेज‌’ १९८० पासून सातत्याने कमी होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणारे पक्षी त्यांच्या देशात सर्व परिसर बर्फाने झाकला गेला की, त्यांना अन्न मिळणे बंद होत असल्याने ते तेथून स्थलांतर करून अनुकूल वातावरण असलेल्या इतर देशांकडे मोर्चा वळवतात. आता हे दिवस कमी होत असल्याने, त्यांच्या स्थलांतराच्या वेळापत्रकात देखील बदल होताना दिसत आहेत.
 
हजारो वर्षांपासून पक्षी विशिष्ट स्थलांतर मार्गांचा वापर करत आले आहेत. हे मार्ग 'Flyways' म्हणून ओळखले जातात. भारत हा मध्य आशियाई स्थलांतर मार्गाचा (Central Asian Flyway) महत्त्वाचा भाग आहे. परंतु, बदलत्या हवामानामुळे अनेक पक्षी आपले पारंपरिक मार्ग बदलत आहेत. काही पक्षी नवीन प्रदेशांकडे वळत आहेत, तर काही प्रजाती स्थलांतराचे अंतर कमी करत आहेत. यामुळे भविष्यात परिसंस्थांमधील संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
 
कधी विपुलता, अनियमित पाऊस आणि वाढते तापमान यांमुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाच्या संख्येत आणि कालावधीत बदल दिसून येत आहेत. काही ठिकाणी पक्ष्यांचे आगमन उशिरा होत असल्याचे निरीक्षण मागील काही वर्षांत नोंदविले गेले आहे.
 
पक्ष्यांचे स्थलांतर ही केवळ एक रंजक घटना नसून, पृथ्वीवरील परिसंस्थांच्या आरोग्याचे ते महत्त्वपूर्ण निदर्शक आहेत. हवामानबदलामुळे स्थलांतराच्या वेळा, मार्ग, अन्नस्रोत, अधिवास आणि प्रजनन यांवर गंभीर परिणाम होत आहेत. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर अनेक स्थलांतरित पक्षी प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, हवामानबदलावर नियंत्रण ठेवणे, पाणथळ अधिवासांचे संरक्षण करणे आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे. पक्ष्यांचे संरक्षण म्हणजे केवळ एका प्रजातीच्या गटाचे संरक्षण नव्हे, तर संपूर्ण पर्यावरणाचे संवर्धन म्हणता येईल. भविष्यातील पिढ्यांना स्थलांतराची ही अद्भुत नैसर्गिक घटना अनुभवता यावी, यासाठी संपूर्ण जागतिक समुदाय व सरकार यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे.
 
युरोप आणि उत्तर अमेरिकेतील अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, काही पक्षी आता वसंत ऋतूमध्ये दोन ते तीन आठवडे आधी पोहोचतात. स्थलांतराची वेळ बदलल्यामुळे प्रजनन आणि अन्न उपलब्धतेमध्ये तफावत निर्माण होते. उदाहरणार्थ, एखादा पक्षी आपल्या प्रजनन क्षेत्रात पोहोचल्यावर त्याला कीटकांची विपुलता अपेक्षित असते. परंतु, वाढत्या तापमानामुळे कीटक आधीच बाहेर पडलेले असतात. त्यामुळे पक्ष्यांच्या पिल्लांना आवश्यक अन्न वेळेवर मिळत नाही. स्थलांतरित पक्षी प्रवासादरम्यान विशिष्ट ठिकाणी थांबून अन्न मिळवतात. परंतु, हवामानबदलामुळे कीटकांच्या जीवनचक्रातसुद्धा बदल होतो, जलाशयातील जैवविविधता कमी होते, तसेच फुलोरा आणि फळधारणेची वेळ बदलते. परिणामी, स्थलांतरित पक्ष्यांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नाही. ऊर्जा कमी पडल्याने त्यांचा प्रवास अधिक कठीण होतो आणि प्रवासादरम्यान मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

- डॉ. जयंत वडतकर
(लेखक ‌‘महाराष्ट्र पक्षिमित्र‌’चे अध्यक्ष आहेत.)
९८२२८७५७७३