हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ यांचे परिणाम केवळ मानवापुरते मर्यादित नसून, पृथ्वीवरील सूक्ष्म जीवसृष्टीवरही गंभीर स्वरूपात दिसू लागले आहेत. पर्यावरणीय संतुलनाचा कणा मानल्या जाणाऱ्या कीटकांच्या जीवनचक्रात, स्थलांतरात आणि प्रजनन प्रक्रियेत अभूतपूर्व बदल घडत आहेत. फुलपाखरे, पतंग, चतुर-टाचण्या यांसारख्या महत्त्वाच्या कीटकांच्या घटत्या संख्येमुळे परागीभवन, अन्नसाखळी आणि जैवविविधतेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बदलत्या हवामानाच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी झगडणाऱ्या या कीटकांची कहाणी ही प्रत्यक्षात निसर्गाच्या ढासळत्या संतुलनाचीच धोक्याची घंटा ठरली आहे.
हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या दोन समस्यांनी सध्या संपूर्ण जगाला ग्रासले आहे. हवामानबदलाचा थेट परिणाम हा मानवजातीवर आणि पृथ्वीवरील लहान-मोठ्या सर्वच जीवांवर होत आहे. आकाराने लहान असणाऱ्या कीटकांवरही या दोन घटकांचा खूप मोठा प्रभाव पडतो आणि त्यातही नकारात्मक प्रभावाचे प्रमाण जास्त आहे. पृथ्वीवर कीटकांच्या लाखो ज्ञात-अज्ञात प्रजाती आहेत. त्यांचा आकार जरी लहान असला, तरी सर्व कीटकांचे एकत्रित ‘बायोमास’ हे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन ठेवण्यास मदत करते. मात्र, गेली अनेक वर्षे एका ठरावीक ऋतुचक्राला सरावलेले हे कीटक सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेताना झगडत आहेत.
कीटकांचे जीवनचक्र आणि त्यांच्या नैसर्गिक सवयी या थेट मानवाच्या जगण्याशी निगडित असतात. आपण जे अन्न खातो, ते तयार होण्यासाठी परागीभवनाची गरज असते. हे परागीभवन करण्यात कीटकांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे कीटकांच्या रोडावणाऱ्या संख्येचा परिणाम परागीभवनावर आणि पर्यायाने शेतीतून पिकणाऱ्या उत्पादनावर होतो. त्याचबरोबर अन्नसाखळीमध्ये कीटक ‘पोषणमूल्य असलेले जीव’ (creatures with nutritive value) व ‘ग्राहक’ (consumers) अशा दोन्ही भूमिका निभावतात. त्यामुळे कीटकांच्या संख्येत बदल झाल्यास अन्नसाखळी उद्ध्वस्त होण्याचा व त्यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडण्याचा मोठा धोका असतो. जगात फुलपाखरे-पतंग आणि चतुर-टाचण्या यांच्या अनेक प्रजाती आहेत, त्यांपैकी पतंगाच्या प्रजातींची संख्या तुलनेने जास्त आहे. रेशीम-किड्यासारखे काही पतंग हे व्यावसायिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असतात. फुलपाखरे परागीभवनामध्ये काही प्रमाणात मदत करतात. चतुर-टाचण्या हे कीटकांच्या जगातील सर्वोच्च शिकारी असल्याने इतर कीटकांची संख्या मर्यादित ठेवण्यात त्यांचा मोठा उपयोग होतो. हवामानबदलाचा या कीटकांच्या अधिवासावर थेट परिणाम होत असल्याने त्यांचा अधिवास मर्यादित होऊ लागला आहे आणि त्यांच्या संख्येतही घेट दिसून येऊ लागली आहे.
हवामानबदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी काही वर्षांपूव या बदलांची वारंवारता कमी होती. मात्र, मानवनिर्मित घटकांमुळे या बदलांची वारंवारता वाढली असून, स्थिर वातावरणाऐवजी टोकाच्या स्थितींचे (उदा. कोरडा दुष्काळ किंवा अतिपाऊस) प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक नाजूक परिसंस्थांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. हवामानबदलाची हल्लीची उदाहरणे घ्यायची झाल्यास, 2025 साली भारतात नैऋत्य मान्सूनचे आगमन जवळपास 15-20 दिवस आधीच झाले. ज्या काळात पूर्वमोसमी पाऊस पडतो, त्या काळात पावसाची संततधार सुरू राहिली आणि अनेक नद्यांना पूर आले. पूर्वमोसमी पावसाचा काळ हा साधारणपणे फुलपाखरांच्या कोष अवस्थेचा किंवा नवीन फुलपाखरे बाहेर येण्याचा काळ असतो. मात्र, बिगरमोसमी पावसामुळे अनेक जंगलांमध्ये पूरमय परिस्थिती उद्भवली व फुलपाखरांचे कोष त्यात खराब झाले. एकंदर 2025 वर्षात फुलपाखरांच्या संख्येत घट नोंदवली गेली. कर्नाटकमधील बेलवाई येथील संमिलन शेट्टी दरवष ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात फुलपाखरू निरीक्षणाचे कार्यक्रम आयोजित करतात. 2025 सालच्या जून-जुलै महिन्यात मध्य-पश्चिम घाटात तुफान पाऊस झाला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ज्याठिकाणी साधारण 100च्या आसपास फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद होते, त्याच ठिकाणी प्रजातींच्या संख्येचा आकडा 80 पार जाऊ शकला नाही. पावसाचे प्रचंड प्रमाण, हेच कारण यामागे असेल असे नाही. मात्र, वातावरणबदल आता कीटकांना मारक झालाय, याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल.
भटके चतुर अर्थात ‘वॉण्डरिंग ग्लायडर’ हे नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांसोबत भारतात प्रवेश करतात. मात्र, 2025 साली मान्सूनचे आगमन अचानक झाल्याने या चतुरांचे स्थलांतर खंडित झाले. जूनच्या मध्यापर्यंत भारतात भटक्या चतुरांचे थवे प्रवेश करत. परंतु, 2025 साली ऑगस्ट महिन्यापर्यंत हे चतुर गटागटाने भारतात फिरत राहिले व त्यांचे आफ्रिकेकडे जाणारे स्थलांतरही खंडित झाले. वरवर पाहायला गेल्यास ही घटना छोटीशी वाटते. मात्र, मोठ्या संख्येने हे चतुर ज्यावेळी पुन्हा आफ्रिकेकडे जायला निघतात, तोपर्यंत भारतात पीक-कापणीचा हंगाम सुरू होतो आणि या चतुरांना पिकांवरचे कीटक हे आयते खाद्य मिळते. 2025 साली भटक्या चतुरांची एकंदर संख्या कमी झाल्याने, या अन्नसाखळीवर परिणाम झाला. तो दृश्यस्वरूपात पाहण्यासाठी दुर्दैवाने आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा अभ्यास झालेला नाही.
सन 2023 साली ज्युडिथ फेकेटे व इतर शास्त्रज्ञांनी ‘पट्टचतुर’ (Goldenring) प्रजातीच्या युरोपातील दोन प्रदेशनिष्ठ चतुरांवर वातावरणबदलाचा होणारा परिणाम अभ्यासला. बाल्कन पट्टचतुर व दोन-काट्यांचा पट्टचतुर या दोन चतुरांच्या वागणुकीवर वातावरणबदलामुळे मोठा प्रभाव पडत असल्याचे त्यांनी सिद्ध केले. पट्टचतुर हे सामान्यपणे 500 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात आढळून येतात. मात्र, युरोपातील उन्हाळा दिवसेंदिवस कडक होत चालल्यामुळे पट्टचतुरांनी त्यांचा अधिवास अजून उंचीवर नेण्यास सुरुवात केली. एक हजार मीटरपेक्षाही जास्त उंचीच्या प्रदेशात हे चतुर प्रजनन करू लागले. मात्र, 500 मीटरच्या उंचीवर असणारा पाण्याचा प्रवाह हा एक हजार मीटर उंचीवरील पाण्याच्या प्रवाहापेक्षा संथ असतो. शिवाय, जास्त उंचीवर शेवाळाचे प्रमाणही कमी होऊ लागते. त्यामुळे पट्टचतुरांच्या प्रजननावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. हे चतुर वालुकामय दगडांतून वाहणाऱ्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांमध्ये अंडी घालतात. मात्र, अतिउंच प्रदेशात अशा जागा कमी असल्याने चतुरांची पुढील पिढी किती प्रमाणात जिवंत राहील, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शिवाय, अतिउंच प्रदेशात आधीपासून राहणाऱ्या कीटकांसाठी पट्टचतुर आल्याने नवीनच स्पर्धा निर्माण झाली. परंतु, उन्हाळा कडक होऊ लागल्याने चतुरांना थंड हवेच्या शोधात जाणे भाग पडले. वातावरणबदलाचा कीटकांवर होणारा परिणाम दृश्यस्वरूपात मांडणारे हे संशोधन युरोपचे सध्याचे वास्तव दाखवते. थोड्याफार फरकाने भारतीय हिमालयात हेच सुरू आहे.
वरवर पाहता हे संकट आपल्या दाराशी आलेले नाही, असेच वाटेल. पण, सध्या अनेक पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जागा जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत. हवामानबदल थांबवण्याची वेळ कधीच टळून गेलेली आहे. त्यामुळे कितीही आशावादी राहायचे म्हटले, तरी येणारे भविष्य हे सुखावह नाही, हे मान्य करावेच लागेल. ज्या परिसंस्था वाचल्या आहेत, त्यांचे विनाविलंब संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय, आपण स्वतःहून काटकसर करण्याची सवय लावून घ्यावीच लागणार आहे. नाहीतर जी नैसर्गिक साधनसंपत्ती शिल्लक आहे, ती संपून जायला फार वेळ लागणार नाही आणि वातावरणबदल तो दिवस काही वर्षांतच आपल्या पुढ्यात आणून टाकेल.
2025 साली मान्सूनचे वारे चक्रीवादळाच्या मदतीने पार तिबेटपर्यंत पोहोचले. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच हिमालयात रेकॉर्ड ब्रेक बर्फवृष्टी झाली. मात्र, हिवाळ्याच्या उत्तरार्धात हिमालय कोरडा पडला. हे सगळे बदल तिथे जगू पाहणाऱ्या कीटकांच्या क्षमतेपलीकडचे आहेत. यामुळे कीटकांना वातावरणदृष्ट्या सुरक्षित जागा शोधणे किंवा मरून जाणे, हेच पर्याय शिल्लक राहतात. कारण, कीटकांच्या अनुकूलन क्षमतेला हा हवामानबदलाचा वेग खूपच जास्त आहे. हिमालयातले कित्येक मोठे चतुर हे हिवाळ्यातला बर्फ वितळल्यावर जे झरे प्रवाहित होतात, त्यात वाढणाऱ्या शेवाळाच्या आधाराने अंडी घालतात. केवळ 15 दिवस ते एक महिना एवढ्याच कालावधीसाठी ही सुयोग्य परिस्थिती असते. जर पुरेसा बर्फ पडला नाही किंवा बर्फ उशिरा पडला, तर ही साखळी नष्ट होते व चतुरांना अंडी घालायला जागाच शिल्लक राहत नाही. सबब त्या भागातून तो चतुर कायमचा नष्ट होण्याचा धोका वाढतो. हे केवळ ज्ञात प्रजातींचे दाखले आहेत. पर्वतीय भागातील अनेक प्रजाती अजून आपल्याला माहीतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवनावर कोणता परिणाम होत आहे, याची पुसटशी कल्पनादेखील आपल्याला नाही.
डॉ. दत्तप्रसाद सावंत
(लेखक चतुर आणि टाचणी या कीटकांवर संशोधन करतात.)
8793839148