हवामानबदलामुळे पिकांचे बदलते नियोजन

    08-Jun-2026
Total Views |

जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलाचे परिणाम गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रामध्येही प्रकर्षाने दिसून आले. कधी दुष्काळ, तर कधी पूरपरिस्थितीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आणले. या अनुभवांतून आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आता बळीराजाने पिकांच्या निवडीपासून ते लागवडीपर्यंतचे नियोजनही बदलले. तेव्हा, एकूणच हवामानबदलाचा कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...

‌‘एल निनो‌’ आणि हवामानबदलाचा परिणाम

यावर्षी हवामानतज्ज्ञांनी हवामानबदलाविषयी अनेक सूचना दिल्या आहेत. ‌‘एल निनो‌’ ही प्रशांत महासागरातील हवामानविषयक घटना आहे. परंतु, त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगावर होतात. ‌‘एल निनो‌’ची स्थिती उत्पन्न झाल्यावर प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त वाढते. त्यामुळे मोसमी वाऱ्याच्या प्रचलित चक्रात बदल होतात. ‌‘एल निनो‌’ची स्थिती साधारण पाच-सहा वर्षांत पाहावयास मिळते. परंतु, त्याचे स्वरूप सौम्य असते. यावर्षी मात्र हवामानतज्ज्ञांनुसार हे स्वरूप तीव्र राहणार आहे. परिणामी, तापमानामध्ये बदल होऊन काही ठिकाणी कोरडी-अवस्था, तर काही ठिकाणी भीषण पुरावस्था निर्माण होऊ शकते.

जून ते सप्टेंबर हा आपल्या देशाचा पिकांचा महत्त्वाचा हंगाम ‌‘खरीप‌’ म्हणून ओळखला जातो. कारण, अजूनही आपली शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य भारतात म्हणजेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्यांत दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी राहील, उष्णतामान सरासरीपेक्षा जास्त असेल. अशा परिस्थितीमध्ये सर्वाधिक परिणाम हा शेती व शेतीसंलग्न उद्योगांवर होण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावी, शेतीत काय बदल करावे लागतील, याला अनन्यसाधारण महत्त्व राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने या बाबतीत अनेक सूचना केल्या आहेत. त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेततळे, तसेच ‌‘पाणी अडवा पाणी जिरवा‌’ या मोहिमेअंतर्गत जे उपाय करता येतील, त्याचा वापर करणे गरजेचे आहे.

विदर्भात निरनिराळ्या पिकांखालील क्षेत्र

विदर्भात खरिपात साधारण 50 लाख हेक्टर क्षेत्र हे निरनिराळ्या पिकांखाली लागवडी योग्य आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, नाचणी ही पिके घेतली जातात. प्रामुख्याने 17 लाख हेक्टर क्षेत्र हे कापसाखाली असते व जवळजवळ तितकेच क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली असते. त्यामुळे या दोन पिकांवर सर्वसाधारण कोरडवाहू शेतकऱ्याची अर्थव्यवस्था अवलंबून असते. कडधान्यामध्ये तूर हे महत्त्वाचे पीक आहे व त्याची लागवड साधारण चार-पाच लक्ष हेक्टरवर केली जाते. सोयाबीन सोडता कापूस आणि तूर हे दोन्ही पिके पाण्याचा ताण सहन करणारी आहे. महत्त्वाचे म्हणजे, विदर्भाचे कमी पाण्यावर येणारे तृणधान्य पीक ज्वारी याचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात घटले आहे. तेव्हा बदलत्या हवामानात ज्वारी-बाजरीसारख्या पिकांना पुनरुत्थान देणे गरजेचे ठरणार आहे.

पिकामधील बदल : यावर्षीची निकड

पीकबदलासाठी सर्वप्रथम पाणी जास्त लागणारी पिके जसे ऊस, भात या पिकाखाली कमी क्षेत्र ठेवल्यास पाण्याची बचत होऊ शकते. भातासारख्या पिकामध्ये सुधारित मशागत तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य ठरेल. हात रोवणीस पर्याय म्हणून पेरीव पद्धतीने धानलागवड जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत करता येते. त्याकरिता 50-75 किलो बियाणे दोन ओळींत 20 सेंमी व दोन झाडातील अंतर 10-15 सेंमी ठेवून पेरणी केल्यास पाण्याची बचत होऊ शकते. तसेच ऊसपिकासाठी पाटाद्वारे पाणी न देता, ‌‘ड्रीप‌’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर निर्गमित केल्यास कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते. विदर्भात कापूस व सोयाबीन मिळून एकूण 34 लाख क्षेत्र म्हणजेच 68 टक्के क्षेत्र व्यापले जाते. कापूस पीक हे बरेच अंशी पाण्याला तग धरणारे आहे. परंतु, यावेळी कापसाच्या ‌‘हायब्रीड‌’ जाती निवडताना त्या 130-140 दिवसांत पक्व होणाऱ्या जाती निवडाव्या आणि त्या अतिघन लागवड किंवा घन लागवड म्हणजेच 90 सेंमी x 15 सेंमी अथवा 90 सेंमी x 22 सेंमी या अंतरावर लावणे गरजेचे आहे. सोयाबीन पीक हे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामध्ये जर जास्त काळ पावसाचा खंड पडला, तर पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करून पाणी साठविण्याचे तंत्रज्ञान अवलंबिल्यास फायदा होतो. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर ही पिके कमी पाण्यावर येऊ शकतात. त्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात संत्रे लागवड आहे. परंतु, अजूनही दहा टक्क्यांपेक्षा कमी शेतकरी ‌‘ड्रीप‌’ आणि ‌‘सेंसर‌’सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. भवितव्यात पाण्याचा वापर योग्य रितीने करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करणे गरजेचे भासेल.

विदर्भात सर्वसाधारण दि. 15 ते 20 जूनपर्यंत पहिला पाऊस येतो. तेव्हा बरेच शेतकरी उडीद, मूग ही कमी दिवसांत येणारी कडधान्ये घेतात. परंतु, पावसाचे आगमन लांबल्यास या पिकांचे उत्पादन घटते. त्यामुळे हवामानाचा अंदाज पाहून आणि कृषी विद्यापीठाच्या स्थानिक सूचनांनुसारच याची पेरणी करावी. हवामानबदल आता तात्पुरता अभ्यास करण्याचा विषय नसून, हाही दूरगामी धोरण स्वीकारण्याचा भाग झाला आहे. त्यातच आता शेतीनियोजन हे वैयक्तिक पातळीवर करून भागणार नाही. त्यासाठी गावपातळीवर सामूहिक निर्धार कृतीची गरज आहे. गावागावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्याची गरज आहे. सरकारच्या एकट्या भरवशावर अशी कामे शक्य होणार नाही. त्यासाठी समाजाने एकत्र येऊन याचा विचार व कृती करण्याची गरज आहे. गावपातळीवर पिकांचेदेखील नियोजन होऊ शकते. कमी पाण्यावर तग धरणारे पिकांची अनेक वाण शिफारस केली आहेत. त्याचा विचार व्हावा. कृषी विभाग, तसेच कृषी विद्यापीठाद्वारे मोबाईलवर पेरणी, पाऊस, तसेच लागवडीविषयी अनेक सूचना दिल्या जातात. त्या जरूर समजावून घ्याव्या व येणाऱ्या बदलत्या हवामानात पोषक पीकपद्धतीमध्ये बदल केल्यास उत्पादन स्थिर होण्यास मदत होईल.

- डॉ. चारुदत्त मायी
(लेखक कृषिशास्त्रज्ञ असून, ‌‘ॲग्रोव्हिजन फाऊंडेशन‌’, नागपूर येथे सल्लागार आहेत.)