हवामानबदलाशी उभयचरांचा संघर्ष

    08-Jun-2026
Total Views |
Climate Change Amphibians India 
 
पावसाळ्याच्या रात्री ऐकू येणारा बेडकांचा सामूहिक स्वर हा निसर्गाच्या सजीवतेचा आणि परिसंस्थेच्या आरोग्याचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. मात्र, हवामानबदल, तापमानवाढ, बदलते पर्जन्यमान आणि अधिवासांचा ऱ्हास यांमुळे जगभरातील उभयचर प्रजाती अभूतपूर्व संकटांचा सामना करीत आहेत. पर्यावरणातील सूक्ष्म बदलांना सर्वप्रथम प्रतिसाद देणारे हे जीव आज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. उभयचरांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेला हा संघर्ष केवळ एका प्राणिगटाचा प्रश्न नसून, संपूर्ण जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलनासाठीचा गंभीर इशारा आहे. उभयचरांवर हवामानबदलाचे वाढते परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने यांचा वेध घेणारा हा लेख.
 
पावसाळ्याच्या पहिल्या जोरदार सरीनंतर एखाद्या डबक्याच्या काठावर उभे राहिलात, तर काही मिनिटांतच आजूबाजूचा परिसर बेडकांच्या आवाजांनी भरून जातो. वर्षभर फारसे न दिसणारे हे प्राणी अचानक जणू जमिनीतून बाहेर येतात. पण, कल्पना करा; भविष्यात एखाद्या पावसाळी रात्री अशाच डबक्याजवळ उभे राहिल्यावर तुम्हाला एकाही बेडकाचा आवाज ऐकू आला नाही तर? जगभरातील शास्त्रज्ञांना सध्या हाच प्रश्न सतावत आहे. उभयचर (Amphibians) हे पृथ्वीवरील सर्वांत जुन्या पृष्ठवंशी प्राण्यांपैकी एक आहेत. साधारण ३७० दशलक्ष वर्षांपूव जलचर माशासारख्या पूर्वजांपासून त्यांची उत्क्रांती झाली आणि प्रथमच पृष्ठवंशी प्राण्यांनी जमिनीवर पाऊल ठेवले. बेडूक, भेक (toad), सॅलमॅन्डर आणि सिसिलियन हे या गटातील प्रमुख प्राणी आहेत. त्यांच्या आयुष्याचा काही भाग पाण्यात, तर उर्वरित भाग जमिनीवर व्यतित होतो. म्हणूनच, त्यांना ‌‘उभयचर‌’ म्हटले जाते.
 
उभयचरांवर हवामानबदलाचा परिणाम किती गंभीर आहे, याचे चित्र अलीकडील जागतिक अभ्यासांमधून समोर आले आहे. २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या दुसऱ्या 'Global Amphibian Assessment' मध्ये जगातील आठ हजार ०११ उभयचर प्रजातींचे मूल्यांकन करण्यात आले. या अभ्यासानुसार, जगातील तब्बल४०.७ टक्के उभयचर प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्यात आहेत. म्हणजे, पृथ्वीवरील प्रत्येक पाच उभयचरांपैकी जवळपास दोन प्रजाती संकटात आहेत. सस्तन प्राणी, पक्षी आणि सरीसृप यांच्या तुलनेत हा धोका अधिक आहे. २००४ नंतर ज्या प्रजातींची स्थिती अधिक खराब झाली, त्यांपैकी ३९ टक्के प्रजातींसाठी हवामानबदल हे प्रमुख कारण ठरत असल्याचे संशोधकांनी नोंदवले आहे.
 
आपल्या त्वचेवर जाड संरक्षक थर असतो. उभयचरांची त्वचा मात्र अत्यंत पातळ आणि पारगम्य असते. अनेक उभयचर त्वचेच्या माध्यमातून श्वसन करतात. त्यामुळे वातावरणातील तापमान, आर्द्रता, प्रदूषण आणि पाण्याची गुणवत्ता यांचा त्यांच्यावर तत्काळ परिणाम होतो. एखाद्या जंगलातील आर्द्रता थोडीशी कमी झाली किंवा पाणवठा काही आठवडे आधीच आटला, तरी त्याचा परिणाम त्यांच्या प्रजननावर होऊ शकतो. उभयचरांचे जीवनचक्रही त्यांना अधिक असुरक्षित बनवते. बहुतेक बेडूक पाण्यात अंडी घालतात. या अंड्यांवर पक्षी किंवा सरीसृपांच्या अंड्यांप्रमाणे कठीण कवच नसते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाली, तर अंड्यांची वाढ थांबू शकते. हवामानबदलामुळे पावसाळ्याचे वेळापत्रक बदलत आहे. अनेक भागांमध्ये पाऊस उशिरा पडतो, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होते. अशा परिस्थितीत प्रजननासाठी योग्य काळ आणि योग्य अधिवास उभयचरांना मिळत नाही.
 
जगातील अनेक भागांत याची उदाहरणे दिसू लागली आहेत. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ढगाळ जंगलांमध्ये (cloud forests) राहणाऱ्या अनेक बेडकांच्या प्रजाती तापमानवाढ आणि बदलत्या आर्द्रतेमुळे झपाट्याने कमी झाल्या आहेत. चिलीमधील प्राचीन 'Helmeted Water Toad' या विशाल बेडकाच्या संख्येत 1990 पासून 30 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असून, हवामानबदल हे त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक मानले जात आहे.
 
हवामानबदलाचा आणखी एक अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे रोगांचा प्रसार. जगभरातील उभयचरांमध्ये 'Chytrid fungus' नावाच्या बुरशीजन्य रोगाने मोठ्या प्रमाणावर मृत्यू घडवून आणले आहेत. बदलते तापमान आणि आर्द्रता काही भागांमध्ये या रोगाच्या प्रसारासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहेत. संशोधनानुसार, १९८० ते २००४ या काळात रोग आणि अधिवास नाश हे उभयचरांच्या ऱ्हासामागील प्रमुख कारण होते. परंतु, आता हवामानबदल हा वेगाने वाढणारा धोका बनला आहे.
 
उभयचरांचे महत्त्व केवळ जैवविविधतेपुरते मर्यादित नाही. ते कीटक नियंत्रणात देखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. डासांसह असंख्य कीटकांवर त्यांची उपजीविका असते. अनेक परिसंस्थांमध्ये ते भक्षक आणि भक्ष्य या दोन्ही भूमिका निभावतात. त्यामुळे उभयचरांची संख्या कमी होणे म्हणजे संपूर्ण अन्नसाखळीवर परिणाम होणे. शास्त्रज्ञ उभयचरांना ‌‘पर्यावरणाचे जिवंत थर्मामीटर‌’ म्हणतात. पर्यावरणातील अगदी सूक्ष्म बदलांचे संकेत सर्वप्रथम उभयचर देतात. म्हणूनच, उभयचरांचे संकट हे केवळ एका प्राणिगटाचे संकट नसून, संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्याबद्दलचा इशारा आहे.
 
आज जगभरातील अनेक संशोधक बेडकांच्या आवाजांचा अभ्यास, संख्येचे सर्वेक्षण, ‌‘डीएनए‌’ संशोधन आणि अधिवास संरक्षणावर काम करत आहेत. भारतामध्येही पश्चिम घाटातील अनेक नवीन प्रजाती अजूनही शोधल्या जात आहेत. महाराष्ट्रातील सातारा परिसरातून नुकतीच 'Gegeneophis valmiki' ही दुमळ सिसिलियन प्रजाती शोधण्यात आली. पण, दुर्दैवाची गोष्ट अशी की, काही प्रजातींचे अस्तित्व आपल्याला कळण्यापूवच त्या नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगलातील वाघ दिसेनासा झाला, तर आपल्याला लगेच कळते. पण, बेडकांची संख्या कमी होत असेल, तर त्याची चाहूल अनेकदा उशिरा लागते. म्हणूनच, शास्त्रज्ञ बेडकांना ‌‘निसर्गाची पूर्वसूचना देणारी घंटा‌’ म्हणतात.
 
पावसाळ्याच्या रात्री डबक्यांमधून येणारा बेडकांचा कोरस हा केवळ निसर्गाचा आवाज नाही; तो एका निरोगी परिसंस्थेचा पुरावा आहे. जर हवामानबदलाचा वेग असाच कायम राहिला, तर भविष्यात हा आवाज अनेक ठिकाणी कायमचा शांत होऊ शकतो.
कदाचित, पुढच्या काही दशकांत आपण वाघ, हत्ती किंवा गेंडे वाचवण्याबद्दल चर्चा करत राहू. पण, त्याच वेळी एखाद्या छोट्या, नावही माहीत नसलेल्या बेडकाची शेवटची पिढी सह्याद्रीतील एखाद्या झऱ्याजवळ जगण्यासाठी संघर्ष करत असेल. कारण, नामशेष होणाऱ्या प्रत्येक बेडकासोबत आपण फक्त एक प्रजाती गमावत नाही; आपण लाखो वर्षांची उत्क्रांती, एका परिसंस्थेचा आवाज आणि निसर्गाने लिहिलेल्या एका अद्वितीय कथेला कायमचे हरवून बसतो आणि कदाचित, भविष्यात पावसाळ्याच्या एखाद्या रात्री, जेव्हा जंगलात शांतता असेल, तेव्हा आपल्याला त्या हरवलेल्या आवाजांची किंमत कळेल.
 
भारतातही परिस्थिती वेगळी नाही!
 
भारत हा उभयचरांच्या दृष्टीने जगातील सर्वांत समृद्ध देशांपैकी एक. आज भारतात ४५० हून अधिक उभयचर प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत आणि त्यांपैकी सुमारे ८० टक्के प्रजाती जगात इतरत्र कुठेही सापडत नाहीत. म्हणजे, जर त्या भारतातून नाहीशा झाल्या, तर त्या पृथ्वीवरून कायमच्या नाहीशा होतील. पश्चिम घाट हा जगातील महत्त्वाच्या जैवविविधता ‌‘हॉटस्पॉट‌’पैकी एक आहे. येथील अनेक बेडूक अत्यंत मर्यादित क्षेत्रात आढळतात. काही प्रजाती तर केवळ एका डोंगररांगेपुरत्या मर्यादित आहेत.
 
सह्याद्रीच्या जंगलात पावसाळ्याच्या रात्री चालताना पायाखाली असंख्य जीवांची दुनिया दडलेली असते. एखादा लहानसा 'Bush Frog' झाडाच्या पानावरून आवाज देत असतो, तर एखादा 'Dancing Frog' झऱ्याच्या काठावर मादीला आकर्षित करण्यासाठी पाय हलवत असतो. यांपैकी अनेक प्रजातींचे संपूर्ण जग काही चौरस किलोमीटरमध्येच सामावलेले आहे. जगातील अनेक बेडकांना हजारो किलोमीटर स्थलांतर करण्याची संधी असते. पण, सह्याद्रीतील अनेक बेडकांसाठी संपूर्ण विश्व म्हणजे एक डोंगर, एक झरा किंवा एक जंगलाचा तुकडा. तो अधिवास गेला की, त्यांचे जग संपते. पश्चिम घाटातील आंबोली, महाबळेश्वर, कास पठार, सह्याद्रीतील उंच डोंगर आणि लहान झरे हे अनेक दुमळ उभयचरांचे घर आहे. पण, हवामानबदलामुळे पर्जन्यमानाच्या पद्धती बदलत आहेत. काही भागांत अतिवृष्टी होत आहे, तर काही भागांत पावसाचे दिवस कमी होत आहेत. उभयचरांच्या अंडी घालण्याच्या आणि प्रजननाच्या चक्राशी हा बदल थेट संबंधित आहे.
 
- निनाद गोसावी
(लेखक उभयचरांचे अभ्यासक आहेत.)
7057390134