बेस्ट बसचा पुन्हा अपघात; अनेक वाहनांना धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू;सहा जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर;चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती स्थापन

    08-Jun-2026
Total Views |

ACCIDENT DADAR
 
मुंबई : (Electric Bus Crash) सोमवारी सकाळी बेस्टच्या आणखी एका इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात बेस्टचे दोन निरीक्षक आणि एक वाहक (कंडक्टर) देखील जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टची ४६३ क्रमांकाची बस सकाळी सुमारे ९.३० वाजता वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) येथून धारावी डेपोकडे जात होती. त्यावेळी बसने अपघातग्रस्त ठिकाणी उभ्या असलेल्या क्रेनला, एका टॅक्सीला तसेच अनेक दुचाकींना धडक दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर सायन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. अपघातात दोन दुचाकी, एक टॅक्सी आणि एक खासगी वाहनाचेही नुकसान झाले.
 
घटनेची माहिती मिळताच बेस्टचे सहाय्यक डेपो व्यवस्थापक (वरळी), अपघात अधिकारी आणि इतर वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
 
चौकशीसाठी चार सदस्यीय समिती
 
या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने चार सदस्यीय समिती स्थापन केली असून तिला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
दरम्यान, बेस्ट प्रशासनाने सांगितले की बस चालक विकास पडवे हे २०२० पासून वेट-लीज ऑपरेटरसोबत कार्यरत आहेत आणि मार्च २०२१ पासून इलेक्ट्रिक बस चालवत आहेत. त्यांना इलेक्ट्रिक बस चालविण्याचा पुरेसा अनुभव आहे. तसेच इलेक्ट्रिक बस चालकांसाठी नियमित सुरक्षा प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमही राबवले जातात.(Electric Bus Crash)
 
बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच बेस्ट भवनात सर्व वेट-लीज ऑपरेटरांची बैठक बोलावून रस्ते अपघात रोखणे आणि प्रवासी तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर सूचना दिल्या.
 
बेस्ट प्रशासनाने सांगितले की अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
 
मृत व जखमींची नावे
 
नियाज अहमद (वय २८) – मृत घोषित
अमित म्हात्रे (वय ४१) – रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
वृषभ गुप्ता (वय २२) – रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर
महेश डोइफोडे (वय ५०) – रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
विकास पडवे (वय ४२) – रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
राजेंद्र पेलेकर (वय ५७) – रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
सतीश वाघमारे (वय ४८) – रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर.