जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदलाचे परिणाम आता केवळ भूभागापुरते मर्यादित राहिलेले नाहीत; तर त्यांचे तीव्र पडसाद सागरी परिसंस्थांवरही उमटू लागले आहेत. भारताच्या जैवविविधतेचा अमूल्य ठेवा असलेल्या अंदमान-निकोबार बेटांमध्ये वाढते समुद्री तापमान, प्रवाळ विरंजन, सागरी जीवांचे स्थलांतर आणि समुद्रपातळीतील वाढ यांसारखे बदल चिंताजनक स्वरूप धारण करत आहेत. हवामानबदलामुळे या बेटांतील नाजूक सागरी अधिवास आणि जैवविविधतेसमोर निर्माण झालेल्या गंभीर आव्हानांचा वेध घेणारा हा लेख.
मानवनिर्मित हवामानबदल हे हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे उद्भवलेले एक जागतिक संकट आहे, जे महासागर प्रणालीला कधीही भरून न येणाऱ्या पर्यावरणीय परिवर्तनाकडे ढकलत आहे. ही घटना प्रामुख्याने वेगाने गरम होणारे पाणी आणि मानवनिर्मित कार्बन डायऑक्साईडच्या मोठ्या प्रमाणातील शोषणामुळे होणाऱ्या महासागराच्या आम्लीकरणाच्या स्वरूपात दिसून येते. या पर्यावरणीय-बदलांमुळे गंभीर जैविक संकट ओढवत आहेत, ज्यामध्ये महासागराची उत्पादकता कमी होणे आणि अधिवास निर्माण करणारी प्रवाळ बेटे नष्ट होणे व ध्रुवीय समुद्री हिमनग वितळणे यांचा समावेश आहे. विविध परिसंस्थांमधील प्रजातींच्या वितरणातील बदल आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे सागरी जीवांवर अधिक ताण येत आहे.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, ज्यामध्ये 800 किमीपेक्षा जास्त अंतरात पसरलेली 572 बेटे आहेत, जी भारताला जगातील 17 ‘महा-जैवविविधता’ (megadiverse) देशांपैकी एक म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हा जैविक स्वर्ग सुमारे सहा हजार, 540 प्राणी प्रजाती आणि दोन हजार, 500 वनस्पती प्रजातींना आधार देतो, ज्यामध्ये या क्षेत्रातील एकूण सजीवांपैकी 63.7 टक्के भाग सागरी अधिवासातील आहे. ही बेटे सागरी जीवांचा एक मोठा आधार असून, तिथे माशांच्या एक हजार, 283 प्रजाती आढळतात; ज्या भारताच्या एकूण मत्स्यविविधतेच्या तब्बल 46.5 टक्के आहेत. याव्यतिरिक्त, या केंद्रशासित प्रदेशात 966 किमी क्षेत्रावर खारफुटीची वने असून, ती देशातील एकूण खारफुटीच्या 20 टक्के आहेत. सुमारे 948.8 चौ. किमी क्षेत्रात पसरलेले प्रवाळ (coral reefs) उष्णकटिबंधीय मत्स्यव्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ‘नर्सरी’ म्हणून काम करतात, ज्यातून जगातील मासेमारीच्या अंदाजे दहा टक्के उत्पन्न मिळते. दुर्दैवाने, हवामानबदल आणि मानवी दबावामुळे येथील अधिवास नष्ट होत असल्याने नाजूक प्रवाळ परिसंस्था सध्या पर्यावरणीय-संकटाचा सामना करत आहे. सागरी माशांचे भौगोलिक स्थलांतरण याबाबत पेरी आणि सहकाऱ्यांचे 2005 मधील संशोधन आणि विवेकांदन (2015) यांचा ‘बे ऑफ बंगाल न्यूज’मधील लेख भारतीय मासेमारीवर हवामानबदलाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यासंदर्भातील काही प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत; जसे की- तापमानाची संवेदनशीलता म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या तापमानात केवळ एक अंश सेल्सिअसचा झालेला बदलदेखील सागरी जीवांची विविधता, त्यांचे वास्तव्य आणि जीवनचक्रावर गंभीर परिणाम करण्यासाठी पुरेसा आहे. सोबतच माशांचे स्थलांतर अर्थात, पाणी तापल्यामुळे मासे आता थंड ठिकाणांच्या शोधात आहेत. उदाहरणार्थ, ‘ऑईल सार्डिन (तारली)’सारखे उष्णकटिबंधीय मासे आता भारताच्या उत्तरेकडील अक्षांशांकडे सरकले आहेत, तर ‘मॅकरेल’(बांगडा)सारखे मासे थंड पाण्यासाठी समुद्राच्या अधिक खोलीवर जात आहेत. तापमानातील बदलामुळे माशांच्या अंडी घालण्याच्या वेळेवर परिणाम झाला आहे. चेन्नईसारख्या ठिकाणी काही मासे आता प्रजननासाठी उन्हाळ्याऐवजी वर्षातील तुलनेने थंड महिने निवडत आहेत. जेव्हा माशांची पिल्ले जन्माला येतात, तेव्हा त्यांच्या अन्नासाठी आवश्यक असलेले प्लँक्टन/प्लवक उपलब्ध नसतात. कारण, तापमानामुळे त्यांच्या वाढीची वेळ आधीच बदललेली असते.
अंदमान आणि निकोबार बेटांचे पाणी हवामानबदलामुळे होणाऱ्या पर्यावरणीय परिवर्तनाचे साक्षीदार बनत आहे. निकोबारमधील अलीकडील अभ्यासात दहा ‘फायटो प्लँक्टन’ (वनस्पती प्लवक) आणि तीन प्राणी प्लवक प्रजाती पहिल्यांदाच या उष्णकटिबंधीय प्रदेशात दिसून आल्या आहेत. शास्त्रज्ञांनी असे निरीक्षण केले आहे की, समशीतोष्ण जल प्रजाती आता उष्ण समुद्राशी जुळवून घेत आहेत, ज्यामुळे स्थानिक परिसंस्थेत मूलभूत बदल होत आहेत. विशेषतः, थंड पाण्यातील डायनोफ्लॅजेलेट (Dinophysis acuminate) या उष्णकटिबंधीय पाण्यात स्वतःला सामावून घेताना आढळले आहे. हे स्थलांतर महत्त्वाचे आहे. कारण, भारतीय समुद्रात आधीच 200 ‘डायटम्स’ आणि 90 ‘डायनोफ्लॅजेलेट’ प्रजातींची प्रचंड विविधता आहे. याशिवाय, एक हजार, 925हून अधिक ‘कोपेपॉड’ प्रजातींची उपस्थिती या पाण्याची गुंतागुंत दर्शवते, जिथे पाण्याचे तापमान वाढणे जैविक सीमा पुन्हा आखत आहे. हे बदल स्पष्ट करतात की, हवामानबदलामुळे समशीतोष्ण जीव अंदमान समुद्रात आपला प्रभाव पाडत आहेत.
अंदमानचा समुद्र हवामानबदलासाठी एक मोठा इशारा ठरत आहे. कारण, वाढत्या तापमानामुळे स्थानिक प्रवाळ नष्ट होत आहेत. एप्रिल ते जुलै 2010 दरम्यान, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे संपूर्ण द्वीपसमूहात प्रवाळ विरंजनाची (coral bleaching) मोठी घटना घडली होती. या पर्यावरणीय तणावामुळे बेटांवर सहजीवी शेवाळाचे विस्थापन 80 ± 10.5 टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मायाबंदरसारख्या भागात विरंजनाचे प्रमाण 90.43 टक्क्यांवर पोहोचले होते, ज्यामुळे या महत्त्वाच्या ‘पाण्याखालील वर्षावनांना’ मोठा धोका निर्माण झाला. सुदैवाने, नंतर पाणी थंड झाल्यामुळे विरंजन झालेल्या प्रवाळांमध्ये 81.84 टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली. या घटना आधोरेखित करतात की, प्रवाळ हे ‘पॅरामेट्रिक बायो-इंडिकेटर’ आहेत, जे जागतिक तापमानवाढीचा गंभीर परिणाम दर्शवतात.
अंदमान बेटाला सध्या ‘समुद्र पातळीतील वाढीचा (SLR) मोठा धोका आहे. 2004च्या भूकंपामुळे जरी किनारपट्टीच्या रचनेत बदल झाले असले, तरी भविष्यात समुद्राची पातळी वाढणे हे बेटासाठी कायमस्वरूपी संकट ठरेल. जर समुद्राची पातळी केवळ एक मीटरने वाढली, तर बेटावरील ‘1042 हेक्टर’ जमीन पाण्याखाली जाऊ शकते, ज्यामुळे तिथल्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील परिसंस्था नष्ट होतील. या बदलांमुळे ‘रायझोफोरा’ आणि ‘ब्रुगुइरा’ (Rhizophora and Bruguiera) या मुख्य खारफुटी प्रजाती आणि दुमळ ‘लेदरबॅक’ कासवांच्या घरट्यांच्या जागांना धोका निर्माण होईल. विशेषतः ‘हट बे’ (Hut Bay) मधील स्थानिक लोकवस्ती ‘समुद्र पातळीतील वाढीस अधिक असुरक्षित’ आहे. कमी उंचीवर असलेली लक्षद्वीपची प्रवाळ बेटे मानवनिर्मित हवामानबदलामुळे (anthropogenic climate change) अत्यंत असुरक्षित आहेत. कारण, त्यांची संरक्षणात्मक वाढ सतत होणाऱ्या धूपेमुळे धोक्यात आली आहे (यादव आणि इतर संशोधक, 2018). जरी हे प्रवाळ खडक उष्णतेच्या ताणाविरुद्ध वाढती प्रतिकारशक्ती दर्शवत असले, तरी त्यांची नैसर्गिकरीत्या पुन्हा सावरण्याची क्षमता अलीकडच्या दशकात नाटकीयरीत्या कमी झाली आहे. प्रवाळ संरचनेच्या या हानीमुळे ‘ग्रुपर्स’ सारख्या शिकारी माशांना केवळ काही उरलेल्या स्थिर प्रवाळ खडकांमध्ये (stable reefs) आश्रय शोधावा लागत आहे (करकरे आणि इतर संशोधक, 2024). समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे या संवेदनशील पर्यावरणाची किनारपट्टीवरील असुरक्षितता (coastal vulnerability) अधिकच वाढली आहे. सरतेशेवटी, जर हेच बदल सुरू राहिले, तर बेटावरील रहिवाशांना धूसर भविष्याचा सामना करावा लागू शकतो, जिथे कोसळणारी बेटे त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडतील. समुद्रपातळीतील वाढ आणि बदलणारे तापमान या सागरी जीवांना धोक्यात आणत आहे. अतिउष्ण दिवस आणि दुष्काळासारख्या टोकाच्या हवामानबदलांचे अंदाज जैवविविधतेसमोर मोठे आव्हान उभे करत आहेत. मानवनिर्मित आणि हवामानविषयक धोक्यांपासून या परिसंस्थांचे रक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय उपाययोजना म्हणूनच आता अत्यंत आवश्यक आहेत.
‘विजयन’ (2018) या शोधनिबंधानुसार, भारताची बेटे सध्या जागतिक तापमानवाढीचे परिणाम अनुभवत आहेत. अंदमानमध्ये वाढत्या उष्णतेमुळे ‘किनारपट्टीची धूप’ होत असून, तिथल्या 560 प्रवाळ (कोरल) प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने लक्षद्वीपमधील प्रवाळ बेटांना (लेीरश्र रेींश्रश्री) विरंजन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बदलांमुळे बेटांवरील ‘विदेशी वनस्पती आणि प्राणी’ यांच्या नाजूक संतुलनात अडथळा निर्माण होत आहे, असे प्रतिभा आणि कुमारस्वामी (2018) यांच्या शोधनिबंधामध्ये नमूद केले.
- प्रदीप चोगले
(लेखक सागरी जीवशास्त्रज्ञ आहेत.)
9029145177