वाट इथे स्वप्नातील संपली जणू...

    07-Jun-2026
Total Views |

 Suman Kalyanpur Musical Legacy
 
देवाने दिलेली कला आणि विद्या कलावंताने निष्ठेने जपली पाहिजे, हा विचार घेऊन जगणार्‍या गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर. त्यांच्या वयाने त्यांच्या स्वरातील तारुण्य अखेरपर्यंत हिरावून नेलं नाही. त्यांची सौंदर्यवेधक दृष्टी थक्क करणारी होती. स्वरांशी असलेलं त्यांचं नातं अगदी वेगळं होतं. त्यांच्या निधनामुळे स्वरसृष्टीमध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणारी नाही. त्यांच्या संगीत प्रवासाचा, जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
भावगीत’ ही महाराष्ट्राची मिरासदारी. साहित्य आणि संगीताच्या आवडीतून भावगीतांचा प्रवास आपल्याकडे सुरु झाला. भावगीतांना आपल्याकडे एक सांस्कृतिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचं भावगीत सुबोध आहे, सोपं आहे. प्रेम, वात्सल्य, संयमित श्रृंगार, प्रतीक्षा या भावनांचं दर्पण असलेली भावगीतं आपल्याकडे तयार झाली. या भावगीतांमध्ये प्रामुख्याने तीन स्वर उमटलेले दिसतात. त्यात एक लताबाईंचा, दुसरा आशाबाईंचा आणि तिसरा सुमनताईंचा! लताबाई आणि सुमनताईंच्या आवाजात साधर्म्यस्थळं असली, तरी त्यांच्यात फरक लक्षात येईल इतका वेगळेपणा निश्चित आहे. हिंदी संगीतामध्ये श्रेष्ठ आवाज आणि श्रेष्ठ शैली म्हणून लतादीदींचा आवाज आपण सर्वांनी ऐकला. आता दीदींचा स्वर कुठलाही आव्हान अगदी लीलया पेलत होता. सुंदरतेची सारी विशेषणं ज्या स्वराला बहाल करता येतील, असा तो स्वर होता. लतादीदींच्या आधीच्या गायिकांची गायकी वेगळी होती. पण, हा गोड, पातळ, धारदार, तीनही सप्तकात लीलया विहरणारा स्वर आदर्श मानला गेला आणि संगीतकार प्रत्येक गायिकेकडून याच शैलीची अपेक्षा करू लागले. सुमनताई आणि लतादीदी यांच्या स्वरातील काही साम्यस्थळांमुळे प्रथम श्रावणात काही गीतांबद्दल संभ्रम निर्माण झाला असावा.
 
त्या काळामध्ये मोहम्मद शफी, तलत मेहमूद अशा सगळ्या संगीतकारांना सुमनताईंचा आवाज आवडला. त्या काळात बरेच चित्रपट ‘ब’ आणि ‘क’ या दर्जात मोडणारे होते. मात्र, सुमनताईंनी त्याची परवा केली नाही. आपल्याकडे जे गाणं आलं आहे, त्याची चाल सुंदर आहे, वाद्य छान लागली आहेत आणि ‘मला जसं गायला सांगितलं आहे तसं मी गाणार’ अशा त्या गायल्या. आपण जर बारकाईने लतादीदींचं आणि सुमनताईंचं गाणं ऐकलं, तर त्याच्यामध्ये फरक आहे. लतादीदींचा आवाज नाजूक असला, तरी जोरकस आहे. लतादीदींची आणि सुमनताईंची शब्द टाकण्याची शैलीही वेगळी आहे. सुमनताईंचा आवाज सौम्य आहे. एका विशिष्ट शैलीमध्ये आम्हाला अमुक अमुक गीत हवं आहे, अशी संगीतकारांनी कदाचित बंधनं घातली असावी किंवा त्यांनी स्वत:हून ती बंधनं स्वीकारली असावी. मात्र, अशात सुद्धा विशिष्ट चौकटीतून मुक्त झालेली सुद्धा काही गाणी आहेत. उदाहरणार्थ - ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर’, ‘नाविका रे’, ‘आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे’ किंवा ‘मुंबईचा जावई’मधलं ‘कशी करू स्वागता’ हे गीत आहे. आता ही गाणी काळजीपूर्वक ऐकली की आपल्याला सुमनताईंच्या गायकीतला वेगळेपणा लक्षात येतो. त्यामुळे सध्याची जी चर्चा सुरू आहे, तिला काही अर्थ आहे, असं मला वाटत नाही. कारण, दोघीही गायिका आपले आत्मभान जागृत ठेवून गायल्या आहेत. लतादीदी हा सर्वार्थाने युगधर्माचा स्वर. लतादीदींमुळेच सिनेसृष्टीतील पार्श्वगायनाला सुवर्णयोगाची झळाळी मिळाली. त्यामुळे तुलनेची चर्चा अप्रस्तुत आहे.
 
केशवराव भोळे, यशवंत देव, नवरंग नागपूरकर यांनी सुमनताईंवर भावसंगीताचे संस्कार केले. यशवंत देव संगीताचे मर्मज्ञ होते. सुमनताईंची अभिव्यक्ती अधिक कोमल आहे, हे माझं म्हणणं आहे. गाण्यांमध्ये वेगवेगळ्या हरकती त्या सहज घेतात. पण, त्यापेक्षा आपल्या गळ्याची सहज सुंदर फिरक वापरणं त्यांना अधिक आवडतं. त्यांची शैली अधिक स्वरशरण आणि संयमी होती. सुमनताईंनी गाण्यातून जो आपल्याला आनंद दिला, त्याची अनुभूती घेणं जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं. बारीक आणि पातळ आवाज असला की कुठेतरी साधर्म्य असणं स्वाभाविक आहे. मात्र, भावनिक परिपूर्तता करण्याची दोघींची शैली वेगळी आहे आणि दोघींचा स्वरांचा लगावही तितकाच भिन्न आहे.
 
सुमनताईंसमोर जी गाणी आली, त्याचं त्यांनी अक्षरश: सोनं केलं. सुमनताईंच्या गाण्यांमध्ये किंचित कंपनयुक्तता आहे. त्यामुळे ते जे एक कंपन आहे ना, ते भावनेची अभिव्यक्ती करताना अलंकार होऊन जातं. त्या काळात यशवंत देव त्यांच्याकडून एखाद् दुसरे गाणे गाऊन घेत होते किंवा केशवराव भोळे त्यांच्याकडून गाऊन घेत होते. दशरथ पुजारी हे सुमनताईंकडे आलेले पहिले संगीतकार. यानंतर ‘सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’, ‘नंदा घरी नंदनवन फुलले’ अशी एक एक गाणी करीत जवळपास ४० ते ४५ गाणी झाली.
 
त्यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तक लेखनाच्या प्रवासामध्ये सुमनताई अनेकदा माझ्यासमोर आपलं मन मोकळं करायच्या. त्या एकेक गोष्ट सांगायच्या आणि मी दुसर्‍या दिवशी लिहून आणायचे. त्यामध्ये कधीकधी काही अप्रिय गोष्टी असायच्या, त्यावेळी सुमनताई म्हणायच्या, "जाऊ दे ना, आपण कशाला आता कुणाला दुखवायचे? आता माझं काय वय आहे, तू हे पुसून टाक!” असं म्हणत अत्यंत निग्रहाने त्या गोष्टी काढून घ्यायच्या. एक लेखिका म्हणून मला त्यावेळी वाटायचं की, आपल्याला किती छान गोष्टी मिळत आहेत. वाचकाला सुद्धा त्याची अधीरता असते. आता सुमनताईंबद्दल लिहिताना, सुमनताई ही व्यक्ती म्हणून त्या पुस्तकामध्ये येणं अपेक्षित आहे. त्यांचं कुटुंब, नातेवाईक यांना असलेलं स्थान मर्यादित असेल, म्हणून मी पुन्हा पुन्हा ताईंना सांगायचे की, "ताई, जरा तुमच्याबद्दल सांगा.” मात्र, ताईंना ते आवडायचं नाही. ताई म्हणायच्या, "माझा भाऊ लाडका आहे. त्याच्याबद्दल अजून या दोन ओळी लिही.” म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये हा एकप्रकारचा भाबडेपणा होता.
 
सुमनताईंबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसताना, मी त्यांच्यावर पुस्तक लिहीलं आणि त्याचा परिणाम असा झाला की, त्या पुस्तकाने वाचकांना प्रवृत्त केलं. त्यातून पुढे मग सुमनताईंची जी अनवट गाणी होती, ती त्यांच्या चाहत्यांनी मला पाठवायला सुरुवात केली आणि त्यानंतर सुमन कल्याणपूर या नावाबद्दल एक सुंदर, साक्षेपी अशी चर्चा घडू लागली. ‘सुमनसुगंध’ (पुस्तकाचे नाव) नंतर या गोष्टी सुरु झाल्या. त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या पुस्तकानंतर त्या रसिकांना भेटायला लागल्या. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपलं काम जे आपण इतकी वर्षं करुन ठेवलेलं आहे, ते रसिक विसरलेले नाही. त्याचा रसिक शोध घेत आहेत. कलावंताने रसिकांपासून वेगळे राहता कामा नये, याची जाणीव त्यांना यानंतर व्हायला लागली. त्यामुळे त्यांच्या न कळलेल्या अनेक गोष्टी मलाही नंतर कळल्या. त्यांची शिस्तशीर वागणूक मला ठाऊक होतीच. मात्र, त्यांचं अकृत्रिम प्रेम, स्नेह मला नंतर कळत गेला.
 
सुमनताईंना पूर्वीपासून प्रवासाची फार आवजड होती. मात्र, कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारा प्रवासाचा आनंद त्या घ्यायला लागल्या. त्या आपल्या गाण्यांबद्दल सुद्धा मला सांगायला लागल्या. त्यामुळे पुस्तक लेखनाच्या काळामध्ये कळलेल्या सुमनताई मला नंतरच्या काळात अधिक कळल्या, असं मला वाटतं.
 
‘कोरोना’च्या काळामध्ये अनेक माणसं हताशपणे आढ्याकडे डोळे लावून बसली होती. मात्र, सुमनताईंजवळ त्यांची कला होती आणि या कलेचा उपयोग त्यांनी रमण्यासाठी केला. त्यांची सौंदर्यवेधक दृष्टी मला नंतर कळायला लागली. जगण्याची प्रत्येकाची एक शैली असते. पानं, फुलं, त्यांचे रंग घेऊन सुमनताई जगल्या. सकाळी डोळे उघडले की फुलाकडे लक्ष जायला हवं. झाडाकडे बघायला हवं. निसर्ग त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य होता. सुमनताई मनसोक्त पूजा करायच्या. अत्यंत पारखून देवाला फूल वाहायच्या, देवापुढे गायच्या. सर्वार्थाने त्या आपलं नाव जगत होत्या. जगण्याची एक वेगळी शैली मला त्यांच्याकडून कळली. दुसरी एक गोष्ट म्हणजे, आहाराबद्दलही त्या कायम जागरुक होत्या.
 
आपला देह आणि आपलं मन एकमेकांपासून वेगळं नाही. त्यामुळे देहाला सुद्धा चांगलं ठेवायला पाहिजे, असं त्या म्हणायच्या. देवाने दिलेली कला आणि विद्या कलावंताने निष्ठेने जपली पाहिजे, हा विचार घेऊन त्या जगल्या. कला ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे, ती मलीन होईल, असं वागणं योग्य नाही. कलाकार संपूर्ण निष्ठेने, कणाकणाने आपल्या कलेची वास्तू उभी करत असतो. त्या वास्तूला तडा जाणार नाही ना, याची काळजीसुद्धा कलाकाराला स्वत:लाच घ्यायची आहे, यावर त्यांचा नितांत विश्वास होता.
एका बाजूला रसिकांचं प्रेम, लोभ होतं, तर दुसर्‍या बाजूला त्यांची तब्येत त्यांना त्यांच्या मर्यादा सांगायची. त्यांच्या वयाने त्यांच्या स्वरातील तारुण्य अखेरपर्यंत हिरावून नेलं नाही. आता जेव्हा त्या अंथरुणाला खिळल्या, तेव्हा नाकाने श्वास घेणं त्यांना जड जाऊ लागलं. तोंडाने श्वास घेतल्यामुळे अगदी शेवटी त्यांचा आवाज बदलला.
 
मागच्या वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या घरी भेटायला गेला होतो. त्यावेळी आम्ही त्यांना गाण्यासाठी गळ घातली. माझ्या अंदाजाप्रमाणे त्या दिवशी त्यांनी ‘जिथे सागरा धरणी मिळते’ आणि ‘ठहरिये होश में आ लू’ या दोन्ही गाण्यांचा मुखडा गायला. आम्ही तो रेकॉर्ड केला आणि ताईंना ऐकायला दिला. एखाद्या तरूण मुलीलाही लाजवेल असा त्यांचा आवाज होता. सुमनताई आपण गायलेलं गाणं ऐकून म्हणाल्या, "असं काही नाही हं, हे तुमचं प्रेम बोलतयं!”
 
सुमनताईंच्याच मनामध्ये जर असंतोष नसेल तर आपण तो का आणायचा? निर्मळ मनाने एका निर्मळ जीवनाला, निर्मळ सुराला आपण अलविदा म्हणूया! सुमनताईंच्या सहवासाने मला खूप श्रीमंत केलं. एक निरपेक्ष असं सुंदर नातं मला अनुभवायला मिळालं. सुंदरता ही स्वभावात असते आणि मग ती आपल्या वृत्तीत येते आणि वृत्तीतली सुंदरता आपल्या कलेमध्ये येते. त्या आविष्कारामध्ये उतरते आणि सगळीकडे पसरते, त्यातून त्याची आभा तयार होते. सुमनताई यामुळेच वेगळ्या होत्या!
 
-मंगला खाडिलकर