राज्यसभेचे ट्विस्ट वाढले, नवनीत राणा की छगन भुजबळ ?

    07-Jun-2026
Total Views |

 Rajya Sabha Election Maharashtra
 
मुंबई : (Rajya Sabha Election Maharashtra) राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना आता यामध्ये नवनीत राणा यांची इंट्री झाली आहे..
 
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांची देवगिरी या मुंबईतील बंगल्यावर भेट घेतली. याबाबतची माहिती राणा यांनी आपल्या एक्स हॅण्डलवरून ७ जून रोजी दिली आहे.यावेळी नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा देखील उपस्थित होते. यापूर्वी नवनीत राणा व रवी राणा यांनी ३ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती.
 
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर बरीच चढाओढ असून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून आहे. एकीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना माजी खासदार नवनीत राणा यांनी घेतलेली ही भेट पुन्हा राज्यसभेसाठी आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी तर नाही ना असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आपल्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांनी काही अटी पक्षास घातलेल्या आहेत.यामध्ये त्यांचे मंत्रिपद पुतणे समीर भुजबळ यांना देण्याची प्रमुख अट आहे.त्यावर अजून निर्णय झालेला नाही.
 
 
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक देखील ६ जून रोजी पार पडली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. या भेटीत राष्ट्रवादीकडून खासदार पार्थ पवार ,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल व स्वतः छगन भुजबळ उपस्थित होते. नुकत्याच लागलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे १७ पैकी ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.(Rajya Sabha Election Maharashtra)
 
त्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची निवड झालेली आहे. तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती मंत्रीपदावर एक आमदार व एक केंद्रात खासदार आहे. तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती मंत्री पदावर व एक खासदार आहे.
 
हाच न्याय भुजबळांना लागू होतो का हे पहावे लागेल. दुसरीकडे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. जर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले तर त्यांच्या येवला विधानसभेवर कुणाची वर्णी लागणार हे देखील पहावे लागेल.(Rajya Sabha Election Maharashtra)