आडवाटेवरचा अवलिया...

    07-Jun-2026   
Total Views |
Pravin Karkhanis Travel Legacy
 
बर्‍याचदा असं होतं की, एखादी गोष्ट करायची आहे, असं नुसतं मनाशी म्हणत राहतो; पण प्रत्यक्षात ती करतच नाही. ‘आपल्या व्यग्रतेमुळे ती करणं आपल्याला जमत नाही’ अशी आपण स्वतःचीच समजूत घालत राहतो. परंतु, एखादा दिवस असा उजाडतो, जो ‘आपण ती गोष्ट केली नाही’ याची कायमची हुरहूर लावून जातो. दि. २२ मे रोजी प्रवीण कारखानीस नावाचा विलक्षण भ्रमंतीकार सर्वात मोठ्या प्रवासाला निघून गेल्याची बातमी कळली आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट राहून गेल्याची कायमची सल मनाला देऊन गेली.

बहुतां देशां हिंडावे|
नाना कळा शिकत जावें॥
बहुश्रुतपणें विवरावें| बरे वाईट॥
 
हे समर्थवचन प्रवीण कारखानीस शब्दश: जगले! हमरस्ता सोडून आडवाटा तुडवण्यामध्ये ज्यांना विलक्षण ‘थ्रिल’ वाटत असावं, त्यांची पुस्तकं, लेख, फेसबुक पोस्ट्समधून माझ्या मनात तयार झालेली प्रतिमा म्हणजे ‘एक धाडसी दुचाकीवीर’, ‘एक चौकस माणूस’, ‘एक मनस्वी रसिक’, ‘एक उत्तम लेखक’ अशा अनेक छोट्या ‘स्नॅपशॉट्स’चं कोलाजच आहे.
 
कारखानीसांच्या साहसांशी प्रथम परिचय झाला, तो त्यांच्या ‘अष्टचक्री रोमायण’ या पुस्तकातून. मोटारसायकलवरून मुंबई ते रोम असा सलग प्रवास करणार्‍या आठ वेड्या पिरांपैकी एक असणार्‍या कारखानीसांनी लिहिलेलं हे पुस्तक बराच काळ बाजारात उपलब्ध नव्हतं. सुदैवाने त्या पुस्तकाची नवी आवृत्ती आल्याचं सोशल मीडियाच्या कृपेने कळलं. फेसबुकवर सक्रिय असलेल्या कारखानीसांशीच संपर्क करून पुस्तक मिळवलं. वाचताना वाटलं, ‘आज वेगवान सोशल मीडियामुळे इतया सहजतेने मिळालेलं हे पुस्तक प्रत्यक्षात ज्या प्रवासाची कथा सांगतं, तो ५० वर्षांपूर्वीचा प्रवास मात्र अतिशय मर्यादित संपर्क साधनांमुळे केवढा आव्हानात्मक होता!’
 
अपरिचित प्रदेश, प्रतिकूल हवामान, खराब रस्ते, अनुभवाचा अभाव अशा परिस्थितीमध्ये आठ तरुण आपल्या चार मोटारसायकल्सवरून दि. २२ मे १९७७ रोजी ‘गेटवे ऑफ इंडिया’वरून निघाले आणि तब्बल साडेबावीस हजार किमीचं अंतर कापून दीडशे दिवसांनी दि. २९ जुलै रोजी रोमला पोहोचले. अपरिचित मुलखात सहकार्‍यांशी झालेली चुकामूक, इस्तंबूलकडे जात असताना लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी हे दुचाकीस्वार राज कपूरच्या भारतातून आलेले आहेत, हे कळल्यावर त्यांच्यासोबत राज कपूरची गाणी गाऊन ‘सेलिब्रेशन’ करणं, मराठी माणसाला अपरिचित असलेल्या देशांमधलं समाजजीवन अशा अनुभवांमुळे हे प्रवासवर्णन वाचनीय झालं आहे. ‘इस्लामिक-क्रांती’ होण्यापूर्वीच्या अत्यंत खुल्या, आधुनिक वातावरणातल्या इराणचं ‘आज अगदी अविश्वसनीय वाटणारं’ मराठी प्रवाशाने केलेलं वर्णन हे तर मराठी साहित्यातलं एकमेव उदाहरण असावं. (या पुस्तकावर मी ‘महाएमटीबी’साठी लिहिलेला लेख या दुव्यावर वाचता येईल :https://www.mahamtb.com/Encyc/2018/5/5/Book-review-of-Ashtchakri-Romayan-by-Prasad-phatak-.html
 
कारखानीसांनी बँकेची नोकरी सांभाळून आपल्या लाडया ‘येझदी’ बाईकसह अफाट भटकंती केली. ज्यांचा विचारही सर्वसामान्य प्रवासी करणार नाही, अशा केनिया, युगांडा, रवांडा, बुरुंडी, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे, मोझांबिक, मालावी या देशांचा साडेचौदा हजार किमीचा प्रदेश मोटारसायकलवरून त्यांनी अक्षरश: पालथा घातला. झिम्बाब्वेमध्ये रस्त्याने प्रवेश करणारे ते पहिले भारतीय आहेत, अशी नोंद त्या देशाच्या सरहद्दीवर करण्यात आली. ‘भटकंती-देश विदेशांची’ या पुस्तकामध्ये हे अनुभव वाचता येतात.
 
१९८१ मध्ये कारखानीसांची बदली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या कलकत्ता शाखेमध्ये झाली, तेव्हा ते तिथे रुजू होण्यासाठी चक्क मोटारसायकलवरून गेले. कलकत्त्यातली पाच वर्षं त्यांनी बंगाली खानपान, साहित्य, चित्रपट हे सगळं जाणून जाणून घेतलं. संधी मिळताच बांगलादेशही पाहून घेतला.वंगदेशीच्या अनुभवांवर आधारित लेखांचं पुढे ‘हावडा-ब्रिजवरून’ हे पुस्तक झालं. बंगालमध्ये १९३४ सालापासून असलेलं ‘महाराष्ट्र निवास’ आणि कलकत्त्याचे रहिवासी असलेल्या मराठी मान्यवरांची शब्दचित्रं, हा या पुस्तकामधला सर्वांत वेधक भाग आहे.
 
ओठावर हसू, चौकस नजर आणि शिस्त, या शिदोरीच्या बळावर ते मनाची पाटी कोरी ठेवून मनसोक्त हिंडले. मनुष्याच्या चांगुलपणावर विश्वास आणि सहज संवाद साधण्याच्या हातोटीमुळे अनेक जण जोडले. प्रवासातल्या ओळखी, कमीत कमी गरजा यांमुळे त्यांच्या सफरी विश्वास बसणार नाही, इतया कमी खर्चात पार पडत. १९८०च्या दशकात त्यांनी संपूर्ण श्रीलंका अवघ्या ३२० रुपयांमध्ये पालथा घातला होता.
 
२००४ साली भारतीय क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौर्‍याच्या वेळी मोजयाच भारतीयांसाठी ‘विशेष क्रिकेट व्हिसा’ देऊ केला होता. रोमपर्यंतच्या प्रवासाच्या वेळी पाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्याने तो देश पाहण्याची हुकलेली संधी कारखानीसांना मिळाली, तेव्हा पाकिस्तानी वकिलातीतील रणधुमाळीनंतर त्यांनी ‘व्हिसा’ पदरात पाडून घेतला. या प्रवासात पाकिस्तानी मुस्लिमांकडून झालेलं प्रेमळ आदरातिथ्य एकीकडे आणि मानसिकरीत्या दबलेल्या अगतिक पाकिस्तानी हिंदूंचं दर्शन दुसरीकडे, असे दोन टोकांचे अनुभव त्यांना आले. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू जिथे ताठ मानेने फासावर चढले, अशा ठिकाणाची धूळ मस्तकी लावण्याचं भाग्य दि. २३ मार्च या स्मृतिदिनीच कारखानीस यांना लाभलं. अखंड कुतूहलातून जन्मणारं साहस माणसाला कसं अकल्पनीय अनुभव देऊ शकतं, याची प्रचिती कारखानिसांचं ‘मंज़िल-ए-मसूद पाकिस्तान’ हे पुस्तक वाचताना येते.
 
याच अखंड कुतूहलातून कारखानीसांनी अनेक दिग्गजांच्या आवर्जून भेटी घेतल्या. सलीम अलींपासून जनरल अरुणकुमार वैद्यांपर्यंत अनेकांशी त्यांची ओळख झाली. ज्यांच्याशी प्रत्यक्ष परिचय नव्हता, अशांबद्दलही त्यांनी माहिती घेऊन लिखाण केलं. ‘गाथा गुणीजनांची’, ‘ज्योतीने तेजाची आरती’, ‘तेथे कर माझे जुळती’ अशा पुस्तकांमधून त्यांनी परिचित-अपरिचित शंभरेक व्यक्तींची शब्दचित्रं लिहिली. इतकं सगळं पुस्तकरूपाने प्रसिद्ध करूनही कारखानीसांकडे भरपूर खजिना शिल्लक होता. तो ते फेसबुवर नियमितपणे रिता करत. उतारवयातही नव्या माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा त्यांचा गुण त्यांच्या चिरतारुण्याची साक्ष देणारा होता. त्यांच्या फेसबुकवरील निवडक लिखाणाचंही एक पुस्तक झालं.
 
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला पुरस्कार मिळाला अथवा तिचं निधन झालं की, त्यावर कारखानीसांची एखादी तरी फेसबुक पोस्ट हमखास येई. अनेकदा, त्या व्यक्तीसोबत स्वतःची भेट कधी झाली, याच्या आठवणी आणि त्यांच्यासोबतचं छायाचित्रही असे. त्यांचं वर्तुळ नक्की किती मोठं आहे, याचा मला कायमच अचंबा वाटे. त्यांच्या पुस्तकांबद्दल, त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढणार्‍यांमध्ये गो. नी. दांडेकर, विद्याधर गोखले, अरुण टिकेकर इ. अनेक दिग्गजांचा समावेश आहे. ‘हावडा-ब्रिजवरून’ या पुस्तकाचं प्रकाशन तर बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांच्या हस्ते झालं होतं.
 
‘कोमसाप’चा ‘उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार’, ठाण्याचा ‘वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार’ मिळालेल्या कारखानीसांचं ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’वरही प्रेम होतं. त्यांनी तब्बल ५०पेक्षा अधिक संमेलनांना लावलेली उपस्थिती हा बहुधा विक्रमच असावा.
 
प्रवीण कारखानीसांचा जन्म दि. ६ नोव्हेंबर १९४६चा. परंतु, त्यांची कार्यप्रवणता पाहता, त्यांचं या वयात जाणंसुद्धा अकाली आहे, अशीच भावना होत आहे. असा अखंड उत्साहाचा धबधबा आटतो, तेव्हा त्याचं जाणं अधिक रितेपणा देऊन जातं. दरवेळी त्यांचं नवीन लिखाण वाचलं की, अंबरनाथला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर मुलाखत घेण्याची योजना माझ्या मनात आकार घेऊ लागे. पण, ती अर्धवटच राही. आळस करीत राहिलो तर वेळ निघून जाईल, ही शयता मी ध्यानातच घेतली नाही. आपण आळस झटकायला हवा, हे तरी आपण कार्यमग्न कारखानीसांकडून ते हयात असतानाच शिकायला हवं होतं, याची बोचरी जाणीव आता प्रकर्षाने होत आहे.




प्रसाद फाटक

फर्ग्युसन कॉलेजमधून MCA शिक्षणानंतर सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी. माध्यमे, नाट्य, चित्रपट, साहित्य या विषयांत विशेष रस आणि फेसबुक, ब्लॉग आणि आता 'मुंबई तरुण भारत' या माध्यमांतून त्यावर सातत्याने लिखाण सुरू