काँग्रेसचे आंदोलन पूर्णपणे फ्लॉप,आता राऊत काँग्रेसचेच प्रवक्ते झालेत : नवनाथ बन

    07-Jun-2026
Total Views |
 
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करत ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा करताना आता राऊत काँग्रेसचेच प्रवक्ते झालेत अशी टीका केली. “नीट प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाई केली असून विद्यार्थ्यांचे हित जपण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.दिल्लीतील विरोधकांच्या आंदोलनाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे संजय राऊत अस्वस्थ झाले असून देशातील तरुणांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आहे.” असे बन यांनी सांगितले.
 
रविवार दि.७ रोजी भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन हे उबाठा खासदार संजय राऊत यांसह विरोधकांच्या टीकेस उत्तर देताना बोलत होते.
 
ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर टीका करत नवनाथ बन म्हणाले की, “ जिथे विरोधक जिंकतात तिथे ईव्हीएम योग्य वाटते आणि पराभव झाला की त्यावर आरोप केले जातात. जनतेशी संपर्क नसल्याने विरोधकांचा पराभव होत आहे.”(Navnath Ban)
 
विधानसभा अध्यक्षांबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. जनतेतून निवडून आलेल्या लोकांवर टीका करण्याआधी स्वतः जनतेतून निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान बन यांनी दिले.वैभव नाईक यांना मिळालेल्या नोटीसबाबत बोलताना बन म्हणाले, “सरकार नव्हे तर संबंधित यंत्रणा कारवाई करतात. काँग्रेसच्या काळात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाला, मात्र भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत नाही.”
 
इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करताना नवनाथ बन यांनी विरोधकांच्या आघाडीवर टीका केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला.सोने तस्करी प्रकरणात भाजप कार्यकर्त्याचा संबंध असल्याच्या आरोपावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. कायद्यापुढे सर्व समान असून दोषी आढळल्यास कारवाई होते, असे सांगत बन यांनी कामगार संघटनांमध्ये भाजपच्या भूमिकेचे समर्थन केले.(Navnath Ban)