हिमाचल प्रदेश म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहतात बर्फाच्छादित पर्वत, हिरव्यागार दर्या आणि धुक्यात हरवलेली गावे. पण, या निसर्गसंपन्न प्रदेशाच्या कुशीत भारतीय स्थापत्यकलेचा एक असा अद्भुत चमत्कार दडलेला आहे, ज्याबद्दल अजूनही तुलनेने कमी चर्चा होते. दूरवर पसरलेली हिमालयाची शुभ्र शिखरे, समोर शांत जलकुंड आणि त्या पाण्यात पडलेले मंदिराचे प्रतिबिंब, क्षणभर आपण कुठल्यातरी प्राचीन कथेच्या जगात निघून जातो. कांग्रा खोर्यातील मसरूर मंदिर समूह हे असेच एक स्मारक आहे- दगडातून जन्मलेले, पर्वताशी एकरूप झालेले आणि काळाच्या असंख्य आघातांनंतरही अभिमानाने उभे असलेले.
‘धौलाधार’ पर्वतरांगांकडे तोंड करून उभ्या असलेल्या या मंदिरांकडे पाहताना क्षणभर वेरूळच्या कैलास लेण्यांची आठवण येते. कारण, मसरूरचे हे मंदिरसमूहदेखील एका अखंड खडकातून कोरले गेले आहेत. भारतीय स्थापत्यपरंपरेत अशा प्रकारच्या ‘एकाश्म’ (Monolithic) मंदिरांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी उभा असलेला हा मंदिरसमूह केवळ धार्मिक नव्हे, तर स्थापत्य इतिहासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
या मंदिरांची निर्मिती साधारणपणे इ.स. आठव्या शतकात झाल्याचे मानले जाते. अभ्यासकांच्या मते, ही मंदिरे उत्तर भारतीय नागर स्थापत्यशैलीची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे, येथे मंदिर बांधले गेले नाही. उलट, संपूर्ण पर्वताला मंदिराच्या स्वरूपात घडवले गेले. खडकातून बाहेर काढलेले शिखर, मंडप, प्रवेशद्वारे आणि देवालयांची रचना पाहताना त्या काळातील शिल्पकारांच्या कल्पनाशक्तीची व्याप्ती लक्षात येते.
मसरूर मंदिरसमूहात सुमारे १५ स्वतंत्र मंदिररचना दिसतात. मध्यभागी मुख्य देवालय असून, त्याभोवती लहान उपमंदिरे आहेत. संपूर्ण रचना एका नियोजित चौकोनी ग्रीडमध्ये मांडलेली आहे. मुख्य मंदिराभोवती उपमंदिरे मंडलासारख्या रचनेत उभी आहेत. भारतीय मंदिर स्थापत्यातील विश्वरचनेच्या संकल्पनेचे हे एक सुंदर उदाहरण मानले जाते.
कला इतिहासकार मायकेल मेस्टर यांनी या मंदिरांना 'Temple-Mountain Architecture’ असे संबोधले आहे. त्यांच्या मते, येथे मंदिर आणि पर्वत यांच्यामध्ये कोणतीही स्पष्ट सीमा राहत नाही. उलट, मंदिर जणू पर्वताच्या गर्भातूनच उगवले आहे असे वाटते. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना अधिक प्रभावी वाटते.
मसरूरच्या मंदिरांचे सर्वांत मोहक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासमोरील विशाल जलकुंड. भारतीय मंदिर स्थापत्यात जल हे केवळ उपयोगितेचे साधन नसून, पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. मंदिर आणि जलाशय यांचा संबंध हा विश्वरचनेच्या संकल्पनेशी जोडलेला असतो.मसरूरमध्ये हे नाते अत्यंत सुंदरपणे अनुभवता येते. शांत पाण्यावर पडलेले मंदिरांचे प्रतिबिंब, त्यामागे उभ्या ‘धौलाधार’ पर्वतरांगा आणि बदलत्या प्रकाशानुसार रंग बदलणारा दगड- हे दृश्य जणू एखाद्या प्राचीन चित्रकाराने रेखाटलेले वाटते.
मंदिरांची धार्मिक ओळखही तितकीच रंजक आहे. आज मुख्य गर्भगृहात राम, लक्ष्मण आणि सीतेच्या प्रतिमा प्रतिष्ठित आहेत. परंतु, मंदिराच्या विविध भागांवरील शिल्पे आणि उपलब्ध पुराव्यांवरून येथे शिव, विष्णू, देवी आणि सूर्य या सर्व परंपरांची उपासना होत असावी, असे दिसते. प्रारंभिक मध्ययुगीन भारतातील धार्मिक वातावरण हे अनेकदा बहुआयामी होते. एका मंदिरसमूहात विविध देवतांचे अस्तित्व आढळणे, हे त्याकाळातील व्यापक आध्यात्मिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि मंडपांवर कोरलेल्या मूर्ती आज अनेक ठिकाणी भग्नावस्थेत असल्या, तरी त्यातील कलात्मकता अजूनही स्पष्ट जाणवते.
शिल्पांमध्ये देव-देवतांचे विविध रूप, पुराणकथांचे प्रसंग आणि अलंकारिक रचना दिसतात. या सर्वांमधून प्रारंभिक मध्ययुगीन उत्तर भारतीय शिल्पपरंपरेची झलक मिळते. मंदिराच्या काही प्रवेशद्वारांचे काम अपूर्ण राहिलेले दिसते. पुरातत्त्वीय अभ्यासांनुसार, या संकुलासाठी मूळ योजना आज दिसणार्या रचनेपेक्षा अधिक भव्य असावी. काही भाग कोरण्यास सुरुवात झाली होती. परंतु, ते पूर्णत्वास गेले नाहीत. त्यामुळे मसरूर ही एकाच वेळी पूर्ण आणि अपूर्ण अशी दोन्ही भावना निर्माण करणारी वास्तू वाटते.
इथल्या काही शिल्पांचा परिचय आपण करून घेऊयात.
इंद्र- चेहरा, हात, धड भग्न झालेले हे शिल्पं, त्याच्याखाली असणार्या वाहनावरून आपल्याला ओळखता येते. डोयाच्या पाठीमागे प्रभावळ असणारा आणि हत्तीवर बसलेला हा देवराज इंद्र आहे. शिव- इंद्रासारखाच शिव भग्न अवस्थेत आहे. पण, हातामध्ये असणारे त्रिशूळ, पायाशी असणारा नंदी, हातात नाग आणि खांद्यापर्यंत आलेल्या जटा यांच्यामुळे हा शिव आहे, हे आपण ओळखू शकतो.
मसरूर मंदिरांनी काळाचे अनेक आघात सहन केले आहेत. विशेषतः १९०५च्या भीषण कांग्रा भूकंपाने या मंदिरांचे मोठे नुकसान केले. अनेक शिखरे आणि शिल्पभाग कोसळले. आज दिसणारी रचना ही मूळ मंदिरसमूहाची केवळ एक छाया आहे. तरीही, या भग्नतेत एक वेगळे सौंदर्य आहे. कारण, उरलेले अवशेष त्या वास्तूच्या मूळ वैभवाची कल्पना अधिक तीव्रतेने करून देतात.
भारतीय स्थापत्यकलेच्या अभ्यासात मसरूरचे विशेष महत्त्व आहे. कारण, हे मंदिर दाखवून देते की, ‘एकाश्म’ स्थापत्यकला केवळ महाराष्ट्रातील वेरूळ किंवा दक्षिण भारतापुरती मर्यादित नव्हती. हिमालयाच्या पायथ्याशीही अशा भव्य स्थापत्यकल्पना साकार होत होत्या. त्यामुळे मसरूर भारतीय स्थापत्यपरंपरेच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण ठरते.
आजही मसरूरची मंदिरे पर्यटनाच्या मुख्य प्रवाहापासून काहीशी दूर आहेत. येथे अजूनही खजुराहो, कोणार्क किंवा वेरूळसारखी गर्दी दिसत नाही. कदाचित, याच कारणामुळे या ठिकाणची शांतता अजूनही टिकून आहे. येथे येणारा प्रवासी केवळ एक प्राचीन मंदिरसमूह पाहत नाही; तो पर्वत, जल, दगड आणि श्रद्धा यांच्या संवादाचा अनुभव घेतो.
‘धौलाधार’ पर्वतरांगांच्या सावलीत उभ्या असलेल्या या मंदिरांकडे पाहताना जाणवते की, काही वास्तू केवळ बांधल्या जात नाहीत; त्या निसर्गातून जन्म घेतात. मसरूरची मंदिरे अशीच आहेत. पर्वताच्या हृदयातून कोरलेली; शतकानुशतके वारा, पाऊस, भूकंप आणि काळाच्या आघातांना तोंड देत उभी असलेली ही स्मारके आजही भारतीय स्थापत्यकलेच्या अमर परंपरेची साक्ष देतात. त्यांच्या शांत दगडी भिंतींमध्ये इतिहासाचा आवाज अजूनही घुमतो; फक्त तो ऐकण्यासाठी थोडावेळ थांबण्याची तयारी हवी.
-इंद्रनील बंकापुरे