राष्ट्रनिष्ठा, समाजसेवा, संघटन कौशल्य आणि लोकहितासाठी अखंड झटण्याची वृत्ती यांमुळे कै. पंढरीनाथ कृष्णाजी नाईक यांनी आपल्या कार्यकाळात असंख्य कार्यकर्ते घडवले आणि समाजजीवनाला नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण जीवन हे त्याग, समर्पण, संघर्ष आणि सेवाभाव यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा हा संक्षिप्त परिचय नव्या पिढीसमोर एक आदर्श ठेवणारा ठरेल.
नालासोपारा पश्चिम येथील नाळेगाव-वाळुंजे (ब्राह्मणवाडी) येथील रहिवासी असलेले कै. पंढरीनाथ कृष्णाजी नाईक हे केवळ एक नाव नव्हते, तर तो वसई तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचा एक धगधगता इतिहास होता. १ जानेवारी १९४१ रोजी एका मोठ्या एकत्र कुटुंबात जन्माला आलेल्या पंढरीनाथजींचे संपूर्ण जीवनच समाजकार्य आणि राष्ट्रसेवेला समर्पित होते.
त्या काळात नालासोपारा परिसरात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. शेती हा मुख्य व्यवसाय आणि त्याला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय केला जाई. घरच्या या कष्टाच्या कामात लहानपणापासूनच पंढरीनाथजींचा सक्रिय सहभाग असे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतच त्यांनी आपले एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात त्यांना कबड्डी खेळाची प्रचंड आवड होती. याच काळात गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी त्यांचा संबंध आला. संघाच्या शाखेतील खेळ असो वा बौद्धिक कार्यक्रम, पंढरीनाथजी नेहमी अग्रेसर असायचे. संघकार्याची ही आवड इतकी वाढली की, तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक संघ कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अवश्य असायची.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी 'डायमेकर'चे तांत्रिक शिक्षण घेतले आणि एका खाजगी कंपनीत नोकरीला लागले. तब्बल ३० वर्षे त्यांनी ही नोकरी प्रामाणिकपणे केली. दरम्यानच्या काळात त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु सामाजिक आणि राजकीय कामातील अतिव्यापामुळे त्यांना व्यवसायात अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर त्यांनी तो व्यवसाय बंद केला, पण जनसेवेचे व्रत कधीच सोडले नाही. अरविंदजी पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला जनसंघ, त्यानंतर जनता पक्ष आणि १९८० पासून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पाहिले.
पक्षाची बैठक असो, एखादा स्थानिक कार्यक्रम असो वा अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींसारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा असोत; पंढरीनाथजी आपल्या सोबत २५-३० कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन तेथे वेळेवर हजर असायचे.
१९७५ मध्ये जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हा लोकशाहीच्या रक्षणासाठी वसई तालुक्यातून ज्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन सरकारच्या विरोधात सत्याग्रह केला, त्यामध्ये पंढरीनाथ नाईक आघाडीवर होते.
या आंदोलनामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला, परंतु त्यांचे मनोधैर्य खचले नाही. पुढे १९७७ मध्ये जेव्हा देशात जनता पक्षाचे सरकार आले आणि उत्तर मुंबई मतदारसंघातून स्व. मृणालताई गोरे निवडणूक लढवत होत्या, तेव्हा पंढरीनाथजींनी स्वतःला झोकून देऊन प्रचार केला आणि त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
आज वसई तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे जे मजबूत संघटन दिसते, त्याचा पाया कै. पंढरीनाथ नाईक, कै. सुरेश जोशी, कै. अरविंद पेंडसे आणि कै. लक्ष्मण (तात्या) पितळे या चौकडीने आपल्या रक्ताचे पाणी करून रचला आहे. पक्षासाठी आणि समाजासाठी दिलेल्या या अमूल्य योगदानाचा आदर ठेवून, २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री स्व. विष्णू सावरा यांच्या हस्ते त्यांचा भव्य 'अमृतमहोत्सवी सत्कार' करण्यात आला होता.
दि.५ जुलै २०१८ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी या महामेरूने जगाचा निरोप घेतला. स्वतःच्या सुखाचा, कुटुंबाचा आणि व्यवसायाचा विचार न करता केवळ राष्ट्र आणि संघटन हिताला प्राधान्य देणारे कै. पंढरीनाथ कृष्णाजी नाईक हे नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहतील. त्यांच्या पश्चात तीन मुले (महेश, उमेश, मंगेश), सुना आणि नातवंडे असा परिवार आहे व परिवार सुध्दा समाजकार्य करत त्यांचा वारसा चालवत आहे!