देशात ‘हाय इथेनॉल पेट्रोल’ची विक्री सुरु!; पहिल्या ‘ई-85’ पेट्रोलपंपाचे नवी दिल्लीत उद्घाटन

    07-Jun-2026
Total Views |
Green Fuel India
 
नवी दिल्ली : (Green Fuel India) देशात ‘हाय इथेनॉल’ इंधनाची विक्री सुरु झाली असून, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘ई-85’ पेट्रोलपंपाचे उद्घाटन केले. केंद्र सरकार दीर्घकाळ पेट्रोलमधील इथेनॉल वाढवण्याच्या धोरणावर काम करत असून, ‘ई-85’ पेट्रोल पंपाचे उद्घाटन याच प्रयत्नाचा भाग मानले जात आहे.
 
केंद्रीय पेट्रोलिय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीतील पहिल्या ‘ई-85’पेट्रोलपंपाचे उद्घाटन केले. या इंधानाचे दर दिल्लीमध्ये 82.12 रुपये प्रति लीटर निश्चित करण्यात आले असून, दिल्लीत विकल्या जाणार्‍या नियमित ‘ई-20’ पेट्रोलपेक्षा, 20 रुपयांनी हे दर कमी आहे. पेट्रोलपंपांवर ग्राहकांना कोणत्याही गोंधळाचा सामना करावा लागू नये, यासाठी ‘ई-85’ इंधनाच्या मशीनवर स्पष्ट दिसणारे लेबल लावले जाणार आहे.
 
सध्या देशभरात मिळणारे इंधन ‘ई-20’ प्रकाराचे असून, त्यात 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल मिश्रण आहे, तर नवीन ‘ई-85’ प्रकारामध्ये 85 टक्क्यांपर्यंत इथेनॉल आणि फक्त 15 टक्के पेट्रोल असणार आहे. ‘ई-100’ म्हणजे 100 टक्के इथेनॉलसारख्या ‘फ्लेक्स’ इंधनाकडे वाटचाल करण्यावर काम करत असून, कच्च्या तेलावरील अवलंबित्त्व कमी करण्याच्या सरकारी धोरणाचा तो एक भाग आहे. जागतिक युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने, भारतीय अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.(Green Fuel India)
 
इथेनॉलची निर्मिती उसाचा रस, मका आणि खराब झालेल्या धान्यांसारख्या कृषी उत्पादनांपासून होत असल्याने, त्याची किंमत कमी असते. यामुळे त्याचा लाभ ग्राहकांना होण्याबरोबरच, कमी कार्बन उत्सर्जनामुळे पर्यावरणालाही होणार आहे.
 
दिल्लीच्या पूसा मार्गावर सुरु झालेला हा पहिलाच पेट्रोल पंप असून, याचा विस्तार अधिक वेगाने करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. या विस्ताराच्या सुरुवातीच्या टप्प्यात सरकार दिल्ली-एनसीआर आणि मुंबई-पुणे-नागपूरसारख्या शहरांमध्ये सुमारे 50 ते 100 असे ‘ई-85’ पेट्रोलपंप सुरु करणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात 500 पेट्रोल पंपांचे जाळे उभारण्याचे सरकारने निश्चित केले आहे, तर 2027 अखेरपर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सुमारे पाच हजार पंप सुरु करण्याचे सरकारचे उदिष्ट आहे. सरकारने अलीकडेच ‘ई-22’, ‘ई-25’, ‘ई-27’ आणि ‘ई-30’ सारख्या अधिक इथेनॉल मिश्रित इंधन मानकांना मान्यता दिली आहे.
 
निवडक वाहनांमध्येच चालणार ‘ई-85’ पेट्रोल!
 
‘ई-85’ इंधन हे सगळ्याच वाहनांमध्ये चालणार नसून, त्यासाठी विशेष प्रकारची वाहने असण्याची गरज असल्याचे सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले. ‘ई- 85’ साठीचे विशेष इंजिन असलेल्या वाहनांमध्येच याचा वापर करता येणार आहे. यासाठी विशेष अशा कॅलिब्रेट फ्लेक्स-फ्यूएल वाहनांची आवश्यकता आहे. भारतात सध्या काहीच फ्लेक्स-फ्यूएल वाहने उपलब्ध आहेत.(Green Fuel India)