एकांडा शिलेदार...

    07-Jun-2026
Total Views |
Ekanda Shiledar Vasant Phene
 
साहित्यिकाचे साहित्य हे ‘कालजयी’ तेव्हाच ठरते, जेव्हा तो काळाच्या पुढील दिशेचा रोख ओळखतो. वसंत नरहर फेणे यांच्या लिखाणात ती पुढची दिशा वाचकांना सापडली होती. २०व्या आणि २१व्या शतकातसुद्धा त्यांची लेखणी तळपत राहिली. दि. २८ एप्रिलपासून वसंत नरहर फेणे यांचे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ झाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या साहित्यातील विचारविश्व उलगडून सांगणारा हा लेख...
 
साधारण ७५ वर्षांपूर्वीचा काळ... भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन काही वर्षेच झाली होती. आपण विकसनशीलतेच्या प्राथमिक अवस्थेत होतो. त्याकाळात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्या व्यतिरिक्त वाचक-लेखकांना साहित्याशी जोडणारी दुसरी साधने नव्हती. पुस्तके, नियतकालिके विकत घेऊन किंवा ग्रंथालयातून आणून वाचण्याशिवाय वाचकांपुढे पर्याय नव्हते.
 
मराठी साहित्य क्षेत्रातील ‘सत्यकथा मासिकाचा जमाना’ असेही आता त्या काळाला म्हटले जाते. अशा परिस्थितीत कोकणात एका गावाच्या ‘एसटी’ स्टॅण्डवर ‘सीनियर लार्क’ म्हणून नोकरी करणारा तेव्हाच्या मराठी मध्यमवर्गीय माणसांचाच जणू असा एक प्रतिनिधी होता. ‘एसटी’ स्टॅण्डवरचा आरडाओरडा, गोंधळ, तणाव, धूळ, भांडणे इत्यादींच्या कोलाहलात सामान्यपणे ज्या नोकरदाराचे आयुष्य असते, तसेच त्याचेही होते. कुटुंब, जबाबदार्‍या, नोकरी आणि आर्थिक ओढाताण या चौकटीतील आयुष्यात त्याने मात्र जपला होता, मराठी साहित्याचा धागा! अपुर्‍या माध्यमांतून पोहोचणारी मराठी साहित्याची गंगा राजापूरच्या गंगेसारखी लुप्त होऊ नये, यासाठी त्याने आपला वाचनाचा आणि थोड्याफार प्रमाणात सुरू झालेल्या लेखनाचाही प्रवाह चालू ठेवला होता. हे त्याचे अलौकिक वेगळेपण होते.
 
मुळातच ‘प्रतिभा’ वा ‘प्रज्ञा’ या संकल्पनांबद्दल अजूनही विचारवंतांचा अभ्यास चालू आहेच, असेल, त्यामुळेच तर माणूस आयुष्यात काही ना काही वेगळे घडवू शकतो, निर्माण करू शकतो. म्हणूनच, ‘एसटी’सारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने रूक्ष क्षेत्रात काम करत असलेल्या माणसांकडून मराठी साहित्यातील अनमोल रचना निर्माण झाल्या. त्या ज्येष्ठ साहित्यिकाचे नाव आहे, वसंत नरहर फेणे!
 
दि. २८ एप्रिलपासून फेणे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू झाले आहे. त्यांचे निधन २०१८ मध्ये, म्हणजे वयाच्या ९२व्या वर्षी झाले. त्यांनी लिहिलेली शेवटची साहित्यकृती म्हणजे जवळपास ६०० पानांची ‘कारवारी माती’ ही बृहत कादंबरी होय. ती २०१७ मध्ये, म्हणजे त्यांच्या नव्वदीत प्रकाशित झाली. याचाच अर्थ, २०व्या आणि २१व्या अशा दोन्ही शतकांत फेणे यांची लेखणी लिहिती राहिली.
 
१९५०च्या आगेमागे लेख, कथा इत्यादी लिहायला सुरुवात करणारे वसंत फेणे हे रूढार्थाने साहित्याचे अभ्यासक नव्हते. पदवीधारकही नव्हते. मात्र, साहित्य आणि त्याच्या विविध प्रकारांची, त्यांच्या घटकांची त्यांना जाण होती. आपल्याला साहित्याची जाण आहे, असे अनेक वाचकांना वाटत असते. पण, ‘आवड असणे’ आणि ‘जाण असणे’ यामध्ये फरक आहे. ‘आवड’ ही विशिष्ट गोष्टींमुळे, प्रासंगिक स्वरूपांत निर्माण होते. त्यामुळे नंतर आवडीने लेखन होऊ शकते. फक्त तिथे ‘सखोलते’चा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ‘जाण’ उपजत असते. मात्र, आपण जे वाचत आहोत, त्यातील भाबडे लेखन कोणते आणि सकस लेखन कोणते, हे समजण्यासाठी एक वेगळ्या पातळीवरची समज असावी लागते. आपल्याला साहित्याची जाण आहे, हे लक्षात आल्यावर वाचनाकडून साहित्यनिर्मितीकडे सहेतुकपणे वळणार्‍या व्यक्तीचे लेखन वाचकप्रिय तर होतेच. पण, ‘कालजयी’ही ठरू शकते. एखाद्या साहित्यिकाचे साहित्य हे ‘कालजयी’ तेव्हाच ठरते, जेव्हा तो काळाच्या पुढील दिशेचा रोख ओळखतो. तो ओळखून वर्तमानकाळातच भविष्यात होणार्‍या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक पातळीवरच्या बदलांना शब्दरूप देतो. त्यामुळे कालांतराने त्याची साहित्यकृती वाचताना ती ‘आऊटडेटेड’ वाटत नाही, तर समकालीनच वाटते. वसंत नरहर फेणे यांच्या अनेक कथानकांमधून आपल्याला हे स्पष्टपणे जाणवते.
 
‘कमल हरण बघ’ इतके वाचता आले, म्हणजे आपल्या स्त्रिया शिकल्या आणि समाजसुधारणा झाली, अशा समजुतीने प्रारंभ झालेल्या २०व्या शतकाची अखेर स्त्री-सुधारणांच्या बाबतीत अर्थार्जन आणि घटस्फोट या पायरीवर येऊन ठेपली. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांत महत्त्वाची पदे सांभाळणार्‍या २१व्या शतकातील स्त्रीची पाऊलवाट ‘एकल’ असेल, तर ती तिची शोकांतिका असेल का?
 
आधुनिक स्त्री-जीवनाबद्दल निर्माण होणारे असे अनेक मूलभूत प्रश्न आपल्या कथांच्या नायिका आणि सह-व्यक्तिरेखांद्वारे कथाकार वसंत नरहर फेणे यांनी सशक्तपणे मांडले. ‘शतकान्तिका’ या १९९९ साली ‘मॅजेस्टिक’ने प्रकाशित केलेल्या कथासंग्रहातील कथा, फेणे यांच्या व्यक्तित्वातील स्त्री-जाणिवांचा वेध घेणार्‍या द्रष्ट्या लेखकाबद्दल साक्ष देतात. त्यातील एक उदाहरण म्हणजे, ‘रागिणी’ ही कथा. या कथेतील नायिका जेव्हा स्वतःला भारतातील पहिली ‘सिंगल मदर’ संबोधते, तेव्हा या शतकातील ‘सिंगल मदर’ म्हणून अभिमानाने मिरवणार्‍या अनेक ‘सेलिब्रिटीं’पासून मध्यम-निम्न मध्यमवर्गीय स्त्रियांपर्यंत अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. ही वसंत नरहर फेणे यांच्या लेखणीची ताकद होती, जिच्यामागे त्यांच्याकडे असलेली साहित्याची ‘खरी जाण’ होती.
 
लेखकाने वास्तवाची मांडणी करावी, लेखक जे जगतो, जे कर्म करतो, तेच त्याच्या लेखनाचे मर्म झाले पाहिजे, हे लेखन-तत्त्व साहित्यक्षेत्रात सातत्याने मांडले जाते. आपल्या जगण्याला, कार्यक्षेत्राला आपल्या ललित लेखनकृतीची विषय-वस्तू करणे हे दिसायला सोपे; पण निभावून न्यायला कठीण असते. कारण, आत्मकथनातले वास्तव ‘फिशन’च्या चौकटीत बसवताना लेखकाला एक वेगळे ‘लेखक-भान’ ठेवून समतोल साधावा लागतो. ‘सेंट्रल बस स्टेशन’ या कादंबरीत फेणे यांनी हे ‘लेखक-भान’ उत्तमरीत्या ठेवल्याचे आपल्याला ठायीठायी जाणवते. सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे, फेणे हे ‘एसटी’मध्ये विविध पदांवर कार्यरत होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नोकरीनिमित्ताने ते वास्तव्यास होते. वेगवेगळ्या बोली बोलणार्‍या माणसांशीही त्यांचा संबंध आला. ‘एसटी’ आणि तिच्याशी निगडित अनेक घटक त्यांच्या जगण्याचे भाग झाले. बस स्टॅण्ड म्हणजे आवाजच आवाज हे समीकरण! त्यामुळे संवाद हे या कादंबरीचे एक सशक्त वैशिष्ट्य. स्टॅण्डवरच्या त्या आवाजातही भरून राहिलेल्या मानवी भाव-भावनांचा पट ‘सेंट्रल बस स्टेशन’ या एका वास्तूमधून कथानकातून आपल्यासमोर उलगडला जातो आणि आपण थक्क होतो.
 
‘काना आणि मात्रा’ या १९७२ साली प्रकाशित झालेल्या फेणे यांच्या पहिल्याच कथासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. १९७२ ते २०११ या चार दशकांत ‘पंचकथाई’, ‘ज्याचा त्याचा क्रूस’, ‘ध्वजा’ असे त्यांचे एकूण १६ कथासंग्रह प्रकाशित झाले. जुन्या-नव्या काळाच्या सांध्यावरचे ते कथाकार होते आणि याची त्यांना पूर्ण जाणीव होती, हे आज त्यांच्या कथा वाचताना लक्षात येते. ‘माणूस’ हा त्यांच्या कथांचा केंद्रबिंदू होता. माणसामाणसांतील जुळणार्‍या, सुटणार्‍या, उलगडणार्‍या नात्यांचा पट त्यांच्या कथा आणि कादंबर्‍यांमधूनही दिसतो. ‘अजोड’, ‘अनामिकेची कहाणी’, ‘र्‍हासपर्व’, ‘विश्वंभरे बोलविले’ अशा एकूण त्यांनी ११ कादंबर्‍या लिहिल्या. समाजजीवनात निर्माण होणार्‍या माणसांच्या नात्यांबद्दल त्यांनी केलेली निरीक्षणे आणि त्यांची कथानकातील मांडणी अतिशय परिपूर्ण आहे. मात्र, ही मांडणी करताना त्यांनी स्वतःच्या कोणत्याही वैयक्तिक विचारांना आपल्या व्यक्तिरेखांवर थोपवले आहे, असे दिसत नाही. त्या-त्या व्यक्तिरेखा आणि वातावरण, भाषा, घटना-प्रसंगांची गुंफण ही सहजरीत्या होत गेलेली दिसते. अर्थात, त्यासाठी लेखक म्हणून त्यांनी कोणतीच ‘कारागिरी’ केली नसेल, असे नाही. मात्र, ती कारागिरीही नैसर्गिक वाटावी, इतकी सहज आहे.
 
वयाची ८० पार केल्यावर फेणे यांनी दीर्घ कादंबरी-लेखनाचे आव्हान स्वीकारले आणि सहा-सात वर्षे व्रतस्थपणे लेखन करून, चिकाटीने ती कादंबरी पूर्ण केली. दीर्घ कादंबरीच्या महाकाशात शिरायचे असेल, तर लेखकाकडे आणि त्याच्या लेखणीतही आवश्यक असतो, ‘दमसांस’, नाहीतर ती फसण्याचीच शयता जास्त. अनमानधपयाने उत्तम दीर्घ कादंबरी लिहिता येत नाही. ‘मुळांना ओढ मातीची’ असे म्हणतात. त्यामुळे ज्या मातीत बालपण गेले, त्या मातीकडेच फेणे यांच्या लेखणीची मुळेही वळली नसती, तरच नवल. त्या मातीचे, मातीतल्या माणसांचे, भाषेचे आणि एकूणच समाजजीवनाचे लोभसवाणे रूप ‘कारवारी माती’ या कादंबरीमध्ये आपल्याला दिसते. ही कादंबरी आपल्याला भारत आणि परदेश अशा मोठ्या प्रदेशात फिरवून आणते. १९०१ ते १९४७ असा या कादंबरीतील काळाचा पट आहे. त्यामुळे साहजिकच, तिच्या कथानकात घडलेल्या उलथापालथी या स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत, हे स्पष्ट होते. आपल्या डोळ्यासमोर तेव्हाच्या भारतातीलच नव्हे; तर जगातील घडामोडी अतिशय प्रभावी घटनांमधून, व्यक्तिरेखांमधून साकार करण्यात कादंबरीकार म्हणून फेणे यशस्वी झाले आहेत.
 
‘मी पुरुष पूर्ण पुरुष’ हे एक नाटक, ‘वैताग वानोळा’ हे विनोदी लेखन, ‘काही प्यादी काही फर्जी’ हे व्यक्तिचित्रण, ‘साम्यवाद : एक अभ्यास’ हे अनुवादित पुस्तक इ. त्यांची इतर लेखनसामग्री आहे. स्थल-मर्यादेमुळे सगळ्या लेखनाचा ऊहापोह इथे शक्य नाही. माणसाच्या अंतरंगात शिरून त्यामध्ये गवसलेल्या आदिम घटकांचा अन्वयार्थ लावून, त्या नव्या परिप्रेक्ष्यात मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.
 
मृत्यू हे आदिम सत्य आहे. आयुष्यात केव्हा ना केव्हातरी या सत्याबद्दल जाणीव होते. पण, तरीही ती नकोशी असते. ना आपल्या मृत्यूबद्दल ना दुसर्‍याच्या! ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा’ ही अनुभूती तशी प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही आणि आली, तरी तिला समर्थपणे शब्दरूप देणेही प्रत्येकालाच जमत नाही. मरणाची कल्पना, विशेषतः आयुष्याच्या मधल्या काळात तर माणसाला नकोशीच वाटते.
 
वयाची साठी उलटल्यावर अगदी लगेचच मृत्यूचा साक्षात्कार झालेल्या फेणे यांच्या लेखणीतून मात्र लिहिला गेला एक आत्मपर लेख. तो वैयक्तिक अनुभवांबद्दल असला, तरी मृत्यूला भिडणार्‍यांच्या मनःस्थितीचे प्रतिनिधित्व करणारा आहे. ‘मृत्युचिये द्वारी’ हा फेणे यांचा लेख मृत्यूबद्दल असणार्‍या मानवीय संवेदना प्रवाहांचे प्रत्ययकारी ऊर्जारूप आहे.
 
फेणे यांच्या कथानकांमधील पात्रे, त्यांची भाषा, बोलींचा वापर, वातावरणनिर्मिती, वाचकांना उत्कंठा वाटेल असे बारकाव्यांसह निवेदन, मानवी मनाचा तळ शोधत जाणारा आशय, समाजजीवनाची वेधक आणि नेमकी प्रतिबिंबे, लेखकाची तटस्थता अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे फेणे यांच्या कथा-कादंबर्‍या, ललित लेख वाचनीय आणि वाचकप्रियही ठरले. लेखनासाठी शांतपणा आणि सवड मिळावी म्हणून फेणे यांनी वयाच्या ५२व्या वर्षी ‘एसटी’च्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. आज ‘साहित्यनिर्मिती’ला मुख्य कार्यक्षेत्राच्या मिळकतीचा जोडधंदा, तोही मिरच्या-कोथिंबिरीसाठी किंवा ऑनलाईन प्रसिद्धीकरिता, हौसेखातर ‘एआय’ मदतीने केलेली निर्मिती असे स्वरूप आलेले असताना, एखाद्या लेखकाने लेखनासाठी नोकरी सोडणे न पटणारे असू शकते. हा काळाचा महिमा! मात्र, फेणे यांनी (त्यांच्या काही समकालीनांनीही) ते धाष्टर्य केले आणि सकस साहित्यनिर्मिती केली.
 
मात्र, समकालीनांना मिळालेल्या मानसन्मानांप्रमाणे फेणे यांना भरभरून पुरस्कार मिळाले नाहीत, हेही खरे. कदाचित, ‘तथाकथित साहित्य-घडामोडीं’मध्ये सामील न होणे, ‘एकला चलो रे’ हे सूत्र अवलंबणे ही कारणे त्यामागे असावीत. आपल्या या मनाजवळच्या मित्राला श्रद्धांजली वाहताना ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी ‘एकांडा शिलेदार’ हे विशेषण वापरले आहे आणि कदाचित, काळाच्या पुढे काही पावले जाऊन लिहिणार्‍या या साहित्यिकाला समजून घ्यायची ‘जाण’ आपल्याकडेच नसावी.

-डॉ. निर्मोही फडके